तब्बल 35 दिवसांनंतर अमेरिकेतील आंशिक शटडाऊन समाप्त झाला आहे. अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी तशी घोषणा केली. मात्र शटडाऊन समाप्ती म्हणजे तीन आठवड्यांकरिता सिनेटर्सबरोबर केलेला समझोता आहे. जर या तीन आठवड्यात योग्य अटींवर समझोता झाला नाही, तर आंशिक शटडाऊन पुन्हा लागू केला जाऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी ते अध्यक्षांना मिळालेल्या खास अधिकारांचा वापर करू शकतील असे त्यांनी सांगितले आहे.
शटडाऊन बंद करून 15 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा कामकाज सुरू करण्याच्या आदेशावर आपण सही करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या घोषणेनंतर आठ लाख कर्मचारी पुन्हा कामावर हजर होऊ शकणार आहेत.
आपण शटडाऊन समाप्त करण्याबाबत सहमती दिली असली, तरी मेक्सिको भिंतीबाबत आपण मुळीच समझोता करणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. आपल्या पक्षाच्या त्याचप्रमाणे विरोधी पक्षाच्या सिनेटर्सबरोबर आपण देशहिताच्या दृष्टीने चर्चा केली असल्याचे आणि सर्वांनी मिळून देशहितासाठी एकत्र येऊन काम करण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.