Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

तुर्कीत पुन्हा भूकंपाचा झटका, आधीच्या भूकंपातील आकडा 1000 वर

तुर्कीत पुन्हा भूकंपाचा झटका, आधीच्या भूकंपातील आकडा 1000 वर
, सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (19:34 IST)
तुर्कीत सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा आता भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला आहे. नव्या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी आहे.
सकाळी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 1000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या भूकंपात नेमकी काय हानी झाली आहे याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाहीये.
दुसरा भूकंप हा स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.24 झाला आहे. पहिल्या केंद्रापासून 80 मैल दूर असलेल्या एल्बिस्टान या ठिकाणी झाला आहे.
 
हा आकडा वेगाने वाढत आहे असंही त्यांनी सांगितलं. 3000हून अधिक नागरिक या भूकंपात जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
दरम्यान, सीरियात भूकंपामुळे 42 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
 
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.8 अशी नोंदली गेली. भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. भूकंपात अडकलेल्या लोकांच्या सुटकेचं काम सुरु आहे.
भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन अमेरिकेने तुर्कीला मदतीची घोषणा केली आहे. "तुर्कीत अतिशय विनाशकारी असा भूकंप आला. अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. तुर्की प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. आम्हाला कोणत्या पद्धतीने आणि वेगवान पातळीवर कशी मदत पोहोचवता येईल याचं नियोजन सुरु आहे", असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं.
 
पहिल्या धक्क्यानंतर काही मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. यानंतरही अनेकदा धक्के बसत राहिल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
 
तुर्कीसह लेबनॉन, सीरिया, सायप्रस, इस्रायल या शेजारी देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाची झळ बसलेल्या भागातील इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती बीबीसी तुर्कीच्या प्रतिनिधींनी सांगितलं.
अमेरिकेच्या भूगर्भाची माहिती देणाऱ्या युएसजीएस संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीच्या सीरियाच्या सीमेनजीक गाजिएनटेपच्या जवळच्या कहमानमारश इथे होता.
 
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पहाटे 4.17 वाजता तुर्कीत भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. थोड्या वेळानंतर दुसरा धक्का जाणवला. तुर्कीची राजधानी अंकारासह अन्य ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले.
 
टर्की, भूकंप
तुर्कीतील 10 प्रमुख शहरांना भूकंपाची झळ बसली आहे. कहमानमारश, हैटी, गाजिएनटेप, ओस्मानिये, अदियामान, सनलिऊर्फा, मलेटिया, अदाना, दियारबाकिएर, किलिस या शहरांमध्ये भूकंपाने प्रचंड नुकसान झालं आहे.
 
मलेटिया शहराच्या गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागात भूकंपामुळे आतापर्यंत 23जणांचा मृत्यू झाला आहे. 42 नागरिक जखमी झाले आहेत. 140 इमारतींचं नुकसान झालं आहे.
उस्मानिये शहरात आतापर्यंत पाचजणांचा भूकंपामुळे मृत्यू झाला आहे. सनलिउर्फा या शहरात 17 तर दियारबाकिएर शहरात 6 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
दक्षिण पूर्व भागात 50 इमारती कोसळल्याचं वृत्त आहे.
 
अर्दोआन यांनी भूकंपासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. "भूकंपाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या वेदनेप्रति मी संवेदना व्यक्त करतो. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. गृह मंत्रालय सुटकेच्या मोहिमांवर लक्ष ठेऊन आहे", असं त्यांनी म्हटलं आहे.
भूकंपामुळे अनेक इमारती कोसळून लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एक शॉपिंग मॉल भुईसपाट झाल्याचं बीबीसी तुर्कीच्या प्रतिनिधीने सांगितलं.
 
गाझा पट्टीतही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं बीबीसी प्रतिनिधीने सांगितलं. 45 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते असं या प्रतिनिधीने म्हटलं आहे.
भूकंपाची शक्यता असलेल्या संवेदनशील क्षेत्रात तुर्की मोडतं. गेल्या काही वर्षांपासून तुर्कीत नियमितपणे भूकंप येत आहेत. 2020 जानेवारीत एलाजिग इथे 6.8 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप आला होता. या दुर्घटनेत 40 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
2022 मध्ये एजियन सागरात आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.0 एवढी होती. यामध्ये 114 लोकांचा मृत्यू झाला होता. हजारहून अधिक नागरिक जखमी झाले होते.
 
1999 साली दूजा इथे 7.4 क्षमतेचा भूकंप आला होता. 17 हजारहून अधिक नागरिकांनी यामध्ये जीव गमावला. हजारहून अधिक लोक इस्तंबूल शहरातच गेले.

Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

INS विक्रांतवर LCA नौदलाचे यशस्वी लँडिंग