Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अफगाणिस्तान भूकंपात 1000 जणांचा मृत्यू, तालिबानने केले मदतीचे आवाहन

Afghanistan - earthquake
, गुरूवार, 23 जून 2022 (08:55 IST)
अफगाणिस्तानमध्ये पाक्तिका भागात 22 जूनला पहाटे शक्तिशाली भूकंप झाला असून यामध्ये 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1500 हून अधिकजण जखमी झाले आहेत, या भूकंपानंतर तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे.
 
22 जून रोजी अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी भूकंप झाला. येथील बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. त्याच वेळी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने आंतराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे.
 
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदली गेल्याचं अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटलं आहे.
 
जीवितहानीची संख्या वाढू शकतं असं स्थानिक प्रशासनाने बीबीसीशी बोलताना सांगितलं. खोस्त नावाच्या शहरापासून साधारण 44 किलोमीटरच्या अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
 
भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या बहुतांश भागांसह पाकिस्तान आणि भारतातही जाणवले असं युरोपियन मेडिटेरिअन सेसमोलॉजिकल सेंटरने म्हटलं आहे.
 
अफगाणिस्तानची राजधानी काबूल तसंच पाकिस्तानचे राजधानी इस्लामाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
 
काल रात्री पाकटिका प्रांतात चार जिल्ह्यांमध्ये शक्तिशाली भूकंप झाला आहे.
 
या भूकंपात असंख्य घरं उद्धस्त झाली आहेत असं अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल करिमी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. दुर्घटनाग्रस्त भागाला त्वरित मदत पुरवण्याचं आवाहन संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
 
पहाटेच्या वेळेस भूकंप झाल्याने अनेकजण झोपेत होते.
 
सर्वाधिक बळी गयान आणि बारमल जिल्ह्यात गेले आहेत, असं एका स्थानिक डॉक्टरने बीबीसीला सांगितलं. स्थानिक माध्यमांनुसार गयानमधलं एक संपूर्ण गाव गाडलं गेलंय.
 
या भूकंपाचे धक्के पाकिस्तान आणि भारतातही जाणवले, पण तिथे जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये.
 
अफगाणिस्तानात नेहमीच भूकंप होत असतो, कारण टेक्टोनिक प्लेट्स सक्रिय असणाऱ्या भूमीवर हा देश वसला आहे. अनेक फॉल्ट लाईन्स (भूकंप होती अशा जागा) इथून जातात. यातल्या काही फॉल्ट लाईन्सची नावं आहेत चामान फॉल्ट, हरी रूद फॉल्ट, सेंट्रल बदक्षां फॉल्ट आणि दरवेज फॉल्ट.
 
गेल्या 10 वर्षांत अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपांमुळे सुमारे 7000 लोकांचे जीव गेलेले आहेत, असं संयुक्त राष्ट्रांच्या एका विभागाचा अहवाल सांगतो.
 
इथे दरवर्षी सरासरी 560 लोकांचे जीव भूकंपामुळे जातात. तालिबानी अधिकाऱ्यांनी सरकारी यंत्रणांनी मदतीसाठी तत्परतेने धावून जावं असं म्हटलं आहे.
 
कित्येक दशकं सततच्या संघर्षामुळे भूकंपविरोधी यंत्रणा तयार करण्यात या देशाला अपयश आलेलं आहे.
 
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याआधीही अफगाणिस्तानच्या आपत्ती निवारण सेवेला नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदतकार्य पोहचवण्यात अडचण यायची. या विभागाकडे फारच कमी विमानं आणि हेलिकॉप्टर्स आहेत, त्यामुळे लोकांचा बचाव करण्यात अडथळे येतात.
 
पाक्तिकामधल्या एका डॉक्टरांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांचाही या भूकंपात बळी गेला आहे."
 
"आमच्याकडे आधीच आरोग्य कर्मचारी आणि सोईसुविधांची वानवा होती. त्यात या भूकंपाने होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं आहे. मला हेही माहिती नाही की माझे सहकारी जिवंत आहेत की नाही."
 
अफगाणिस्तानातल्या संदेशवहनाच्या सुविधांवरही मोठा परिणाम झाला आहे. भूकंपामुळे अनेक मोबाईल टॉवर्स भुईसपाट झाले आहेत. इथल्या एका स्थानिक पत्रकारांनी सांगितलं की मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो.
 
"कित्येकांना आपल्या नातेवाईकांची परिस्थिती नक्की काय आहे हे माहिती नाहीये. लोकांचा एकमेकांशी संपर्कच होऊ शकत नाहीये. माझा भाऊ आणि त्याचं संपूर्ण कुटूंब ठार झालं पण मला हे कित्येक तास समजलंच नाही. अनेक गावंच्या गावं उद्धस्त झालीयेत."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदेंच्या तावडीतून 'असे' निसटले शिवसेना आमदार कैलास पाटील