Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वडिलांनी घरी राहून मुलांची काळजी घेण्याची पद्धत अमेरिकेत आहे, भारतात का नाही?

father daughter
, शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (19:23 IST)
स्त्रीने घर, मुलं आणि कुटुंबाची काळजी घेणं हे सामान्यपणे नैसर्गिक मानलं जातं, परंतु जर एखाद्या पुरुषाने म्हटले की तो घर आणि मुलांची काळजी घेतो, तर काही लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही किंवा त्यांना ते विचित्रही वाटेल.
 
परंतु “स्टे-अॅट-होम डॅड” हा ट्रेंड अनेक देशांमध्ये वाढताना दिसतोय. “स्टे-अॅट-होम डॅड“ म्हणजे घरी राहून मुलांची काळजी घेणारे वडील.
 
समाजात यापूर्वीही असं घडत होतं आणि आत्ताही घडतंय, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. फरक एवढाच आहे की लोकं आता याबद्दल मोकळेपणाने बोलू लागली आहेत.
 
पण यावर खरंच उघडपणे चर्चा झालीय का? आजही पुरुष घरी राहतो, घर सांभाळतो, मुलांची काळजी घेतो हे ऐकल्यावर आपल्याला काही क्षण काय बोलावं हे सुचत नाही किंवा अनेकदा त्याला दाद कशी द्यायची हे आपल्याला कळत नाही.
 
"मी माझी ओळख 'घरी राहणारे बाबा' अशी देणार नाही"
तमिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी व्यंकट चालपाठी म्हणतात, "मी घरीच असतो. मी घरी राहाणारा बाबा आहे.
 
व्यंकट पूर्वी नोकरी करायचे पण त्यांच्या आयुष्यानं असं काही वळण घेतलं की, त्यांना नोकरी सोडावी लागली.
 
व्यंकट सांगतात की, "2010 पासून ते घरी राहणाऱ्या बाबांची भूमिका पार पाडत आहेत. 2006 मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म आणि 2010 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर व्यंकट यांनी विचार केला की, आता आपण जे काही करू ते फक्त आपल्या मुलीसाठीच असेल."
 
 ते म्हणतात, "मी स्वत:ची ओळख ‘घरी राहणारे बाबा’ म्हणून करुन देईन, असं मला वाटत नाही."माझ्या घरात राहण्याविषयी पूर्वी लोक बोलायचे, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्या गोष्टींचा मला त्रास व्हायचा. पण कालांतरानं सगळं शांत झालं.
 
अमेरिकेत “स्टे-अॅट-होम डॅड” ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. भारतातही व्यंकटसारखे बाबा सापडतील, पण किती पुरुष घरुन काम करतात याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाहीए.
 
परंतु बीबीसी वर्क लाईफमध्ये अमांडा रुगेरी या बीबीसी प्रतिनिधींच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात असं म्हटलंय की 1989 ते 2012 दरम्यान अमेरिकेत 'स्टे-अॅट-होम बाबां’ची संख्या झपाट्याने वाढलेय. पण तरीही अशा कुटुंबांची संख्या नगण्यच आहे.
 
अमेरिकेत 5.6 टक्के कुटुंबं अशी आहेत जिथे महिला नोकरी करण्यासाठी घराबाहेर जातात आणि पुरुष घरीच असतात.
 
28.6 टक्के कुटुंबांमध्ये पुरुष नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात आणि महिला घरीच असतात.
 
या आकडेवारीत अशा लोकांचाही समावेश आहे जे बेरोजगार आहेत आणि कामाच्या शोधात आहेत.
 
आपण जर युरोपियन युनियनचा विचार केला तर ही संख्या आणखी कमी आहे. एका अंदाजानुसार, 100 पैकी एक पुरुष आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या करिअरमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेतात, तर महिलांमध्ये हे प्रमाण तीनपैकी एक महिला, असं आहे.
 
वडिलांची बदललेली भूमिका
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील वरिष्ठ व्याख्याते ब्रेंडन चर्चिल म्हणतात, "अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये वडिलांकडून अशी अपेक्षा केली जाते की आदर्श वडील या नात्याने त्यांनी आपल्या मुलांच्या संगोपनात पूर्वीपेक्षा जास्त रस घेतला पाहिजे. "
 
ब्रेंडन चर्चिल समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक असून ‘पालकत्व’ या विषयावर त्यांनी संशोधन केलंय.
 
 ते म्हणतात, “घरी राहून मुलीची काळजी घ्यायची असेल तर मला असं कोणतंही काम करता येणार नाही ज्यासाठी मला दररोज ऑफिसला जावं लागेल. पैसे कमावण्यासाठी मी घरबसल्या लहानमोठ्या नोकऱ्या करतो. लोक विचारायचे, मी पुन्हा लग्न का नाही करत, घर सांभाळण्यासाठी कुणीतरी येईल. पण लोकांच्या अशा प्रश्नांची मी कधीच उत्तरं दिली नाहीत.
 
घरून काम करणारे बाबा
बंगळुरूमधील डॉक्टर आणि पालक सल्लागार डॉ. देबमिता दत्ता यांनी सांगितलं की, अमेरिकेत वडिलांनी पूर्णवेळ घरीच राहणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. परंतु भारतात अजूनही असे पुरुष फारसे नाहीत पण हे चित्र हळूहळू बदलतंय.
 
त्या म्हणतात, “गेल्या काही वर्षांत आणि विशेषत: कोविडनंतर ‘स्टे-अॅट-होम’ वडिलांची संख्या अनेक पटींनी वाढलेय. मी त्यांना 'घरी राहणारे बाबा' न म्हणता ‘घरुन काम करणारे बाबा’ असं म्हणेन. मी ज्या पुरुषांसोबत काम करते, ते बहुतेक जण घरून काम करतात आणि हे सर्व पुरुष घरातल्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात.
 
 अमेरिकेतील सेंट लुईस येथे राहणारे मयांक भागवत हे व्यवसायाने पत्रकार आहेत. भारतात वीस वर्षे पत्रकारिता केल्यानंतर ते आता अमेरिकेत राहतात.
 
ते म्हणतात, “माझी पत्नी इथे संशोधन करतेय. तिला पाठिंबा देण्यासाठी मी येथे आलोय. मी पूर्णवेळ घरीच असतो आणि घरुनच काम करतो."
 
मयांक भागवत 2021 मध्ये पत्नीसह अमेरिकेत आले.
 
ते म्हणतात, “इथे आल्यानंतर आम्ही काही गोष्टी बदलण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला. घरुन काम करण्याच्या माझ्या निर्णयामुळे मी खूश आहे.”
 
घरात राहण्याची आव्हानं
घरुन काम करणारे व़डील केवळ त्यांचं कार्यालयीन कामंच करत नाहीत तर घरच्या जबाबदाऱ्याही पार पाडत असल्याचं निरीक्षण डॉ. देबमिता दत्ता यांनी नोंदवलंय.
 
देबमिता दत्ता या व्यवसायाने डॉक्टर आणि पालक प्रशिक्षक आहेत.
 
त्या म्हणतात, “आपल्या समाजात पुरुषांना घरातली कामं करण्यात हातभार लावण्याच्या दृष्टीने वाढवलं जात नाही. अनेकदा अशी तक्रार केली जाते की घरातील कामाचा जास्तीचा भार त्यांच्यावर पडतो.
 
“पण मी पाहिलंय की आत्ताच्या काळातील नवरे आणि वडिल घरातील काम शिकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. माझ्याकडे येणारी बहुतेक पुरुष मंडळी घरुनच काम करतात. त्यांना खरोखर सर्व गोष्टी शिकण्यात रस असतो, पण हा ट्रेंड मी शहरांमध्ये जास्त पाहिलाय.
 
वर्क लाइफमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, पुरूष एखाद्या व्यक्तीची काळजी घेण्यात महिलांपेक्षा कुठेही कमी पडत असल्याला कोणताही पुरावा नाही.
 
नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं दिसून आलंय की, महिलांप्रमाणेच पुरुषांमध्येही पालक झाल्यानंतर हार्मोनल बदल होतात. शरीरातील हा बदल एखाद्या व्यक्तीला मुलांचे पालनपोषण करणे किंवा काळजी घेणे आणि सहानुभूतीशील बनवण्यास मदत करतो.
 
व्यंकट सांगतात, सुरुवातीला जेव्हा ते पूर्णवेळ घरी राहू लागले तेव्हा सर्व काही खूप कठीण वाटायचं.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, 'रोज जेवण बनवणं अतिशय मोठं काम वाटायचं. एकतर आपण जेवण बनवण्यात इतका वेळ घालवतो आणि नंतर अन्नपदार्थ खाण्यालायक बनत नाहीत. आई-वडील एकत्र राहायचे तेव्हा थोडीफार मदत व्हायची. पण आता इतक्या वर्षांनंतर हळूहळू सर्वकाही सोप्प झालंय. आता मी माझ्या मुलीच्या आवडीचं जेवण बनवतो आणि घरातील बाकीची कामंही करतो.
 
इथे मयंक आपला अनुभव सांगताना म्हणतात, “अमेरिकेत सगळ्या गोष्टी स्वतःच कराव्या लागतात. गेल्या दहा महिन्यांत मी घरातून काम करण्याबरोबरच घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळतोय. बायकोही घरच्या कामात मदत करते. कधी कधी मला कंटाळा येतो मग ती काम करते. मात्र ऑफिसमधून आल्यानंतर तिला फारसं काम करावं लागणार नाही, असा माझा प्रयत्न असतो. पण घर चालवणं सोपं काम नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
 
समाजाचा दृष्टीकोन
डॉ. देबमिता दत्ता सांगतात की, “सेट-अॅट-होम डॅड” किंवा “वर्क फ्रॉम होम डॅड” या संकल्पना बहुतांश मोठ्या आणि लहान शहरांमध्ये दिसून येतात. जिथे घरातील पुरुष घरून काम करतात किंवा त्यांचा व्यवसाय चालवतात आणि महिला ऑफिसला जातात.
 
मयांक सांगतात की, अमेरिकन समाज खूप मोकळा आहे, इथली कुटुंब फार छोटी असतात. इथे घरून काम करायचं असो वा ऑफिसमध्ये जाऊन, आई-वडिल दोघांनाही घरातली कामं करावीच लागतात. चांगली गोष्ट म्हणजे माझ्या निर्णयावर कुटुंबातील कुणीही शंका घेतली नाही.
 
पण सर्वांना हे लागू होतंच असं नाही.
 
व्यंकट सांगतात, “माझी मुलगी आता बारावीत आहे. मी घरी राहण्याचा निर्णय का घेतला हे तिला समजतं. जेव्हा लोकं असं बोलतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा न ऐकल्याचं नाटक करतो. घरात राहून आपल्या मुलांची काळजी घेण्याचा अधिकार पुरुषांना नाही का?, असा प्रश्न मी त्यांना विचारतो.
 
आपण आपल्या मुलींना जास्त वेळ देऊ शकतो याबद्दल मयंाक आणि व्यंकट याची मतं जुळतात आणि ते याबाबत अतिशय समाधानी आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Onion Price: कांदा पुन्हा स्वस्त होणार!