Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'भारताच्या एजंटकडून शीख नेत्याची हत्या', कॅनडाच्या पंतप्रधानांचा आरोप भारतानं फेटाळला

Webdunia
मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (12:53 IST)
'कॅनडामधील शीख नेते हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असू शकतो', असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे.भारत सरकारने मात्र निज्जर यांच्या हत्येचे आरोप फेटाळले आहेत.
 
निज्जर यांच्या हत्येतील भारताच्या सहभागाच्या संशयावरून कॅनडातील भारताच्या वरिष्ठ मुत्सद्दी अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. त्यापाठोपाठ भारतानेही कॅनेडाच्या भारतातील वरिष्ठ मुत्सद्दी अधिकाऱ्याची हकालपट्टी केली असून त्याला 5 दिवसांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
 
या वर्षी 18 जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील गुरुद्वाराबाहेर निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
 
काही दिवसांपूर्वीच ट्रुडो G-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. या दौऱ्यात ट्रुडो यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी कॅनडातील शीख फुटीरतावादी कारवाया आणि भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला.
 
ट्रुडो देशात परतल्यानंतर काही वेळातच कॅनडाच्या वाणिज्य मंत्री यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, कॅनडाने भारतासोबतच्या द्विपक्षीय मुक्त व्यापार करारावरील वाटाघाटी थांबवल्या आहेत.
 
भारत सरकारनं फेटाळले आरोप
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेले आरोप भारत सरकारनं फेटाळले आहेत.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं यासंदर्भात आपली भूमिका मांडणारं पत्रक जारी केलंय. त्यात परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की, “कॅनडातील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप करणे हास्यास्पद आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. तसंच, कॅनडाच्या पंतप्रधानांनी आमच्या पंतप्रधानांवर आरोप केले होते आणि आम्ही तेही पूर्णपणे फेटाळत आहोत. आम्ही लोकशाही मूल्यांसाठी वचनबद्ध आहोत."
 
"कॅनडाच्या पंतप्रधानांनी संसदेत जे काही सांगितलं, ते आम्ही फेटाळत आहोत. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे विधानही आम्ही फेटाळून लावतो," असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
 
"असे निराधार आरोप खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यांकडून लक्ष हटवण्यासाठी आहेत. भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला धोका असलेल्या अशा खलिस्तानी दहशतवाद्यांना आणि अतिरेक्यांना कॅनडाने आश्रय दिला आहे," असा प्रत्यारोपही भारताने केला.
 
या पत्रकात भारताचं पररष्ट्र मंत्रालय पुढे म्हणालंय की, "खालिस्तानी प्रकरणांमध्ये कॅनडा सरकारकडून कारवाई केली जात नाही. हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. कॅनेडियन नेते उघडपणे अशा गोष्टींना सहानुभूती दाखवत आहेत, ही आमच्यासाठी गंभीर चिंतेची बाब आहे.
 
"कॅनडामध्ये खून, मानवी तस्करी आणि संघटित गुन्हेगारी असे प्रकार घडतायत. कॅनडाच्या भूमीतून चालणार्‍या भारतविरोधी कारवायांविरुद्ध आम्ही कॅनडा सरकारला त्वरित आणि प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करतो."
 
कॅनडाचे पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत बोलताना म्हटलं की, “कॅनडाचे नागरिक हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट असण्याचे ठोस पुरावे कॅनडाच्या तपास संस्थांना मिळाले आहेत. कॅनडा हे कायद्याचं राज्य आहे. आमच्या नागरिकांचं संरक्षण करणं आणि देशाचं सार्वभौमत्व टीकवणं हे आमचं मुलभूत काम आहे.”
 
"आपल्या देशाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमागे परदेशी सरकारचा हात असणं अस्वीकार्य आहे आणि हे आपल्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे," असं कॅनडाच्या संसदेत जस्टिन ट्रुडो म्हणाले.
 
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सोमवारी (19 सप्टेंबर) सांगितले की, या प्रकरणाच्या तपासामुळे कॅनडातील भारतीय राजदूत पवन कुमार राय यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
ट्रुडो सरकारच्या या निर्णयानंतर बीबीसीने कॅनडातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिसाद मिळाला नाही.
 
यापूर्वी निज्जर यांच्या हत्येप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी हा कट असल्याचे सांगितले होते.
 
 
निज्जर हे कॅनडातील शीख नेते होते आणि त्यांनी खलिस्तानचे जाहीर समर्थन केले होते.
 
निज्जर यांच्या समर्थकांनी सांगितले की, त्यांच्या कारवायांमुळे त्यांना यापूर्वीही अनेक धमक्या आल्या होत्या.
 
निज्जर यांना दहशतवादी आणि फुटीरतावादी संघटनांचा प्रमुख असल्याचं भारत सरकारनं म्हटलं होतं. मात्र, निज्जर यांच्या समर्थकांनी हे आरोप फेटाळले होते.
 
अलिकडच्या काही महिन्यांत मरण पावलेले निज्जर हे तिसरे शीख नेते होते.
 
जून महिन्यातच अवतार सिंग खांडा हेही युकेतील बर्मिंगहॅममध्ये गूढ परिस्थितीत मृतावस्थेत सापडले होते. ते खलिस्तान लिबरेशन फोर्सचे प्रमुख होते.
 
परमजीतसिंग पंजवार यांचीही लाहोरमध्ये हत्या झाली होती. भारत सरकार परमजीतला दहशतवादी म्हणतं.
 
ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत सांगितले की, निज्जर यांच्या हत्येचा मुद्दा दिल्लीत उच्च पातळीवर उपस्थित करण्यात आला होता.
 
हा मुद्दा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडेही मांडण्यात आल्याचे कॅनडाने सांगितले.
 
भारत सरकारने या प्रकरणी कॅनडाला सहकार्य करावे, असे आवाहन ट्रुडो यांनी केलं आहे.
 
'G-20 नंतर भारत-कॅनडा संबंध बिघडले'
G-20 नंतर कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो मायदेशी परतताच भारतासोबतचे संबंधांमध्ये तणाव वाढला आहे.
 
15 सप्टेंबर रोजी कॅनडाने भारतासोबतच्या द्विपक्षीय मुक्त व्यापार करारावरील वाटाघाटी थांबवल्या होत्या.
 
2022 मध्ये भारत हा कॅनडाचा दहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता.
 
2022-23 मध्ये भारताने कॅनडाला $4.10 अब्ज किमतीच्या वस्तूंची निर्यात केली. 2021-22 मध्ये हा आकडा 3.76 अब्ज डॉलर होता. तर कॅनडाने 2022-223 मध्ये भारताला 4.05 अब्ज डॉलरच्या मालाची निर्यात केली. 2021-22 मध्ये हा आकडा 3.13 अब्ज डॉलर होता.
 
 
कॅनडाच्या किमान 600 कंपन्या भारतात कार्यरत आहेत.
 
"ट्रुडो जोपर्यंत सरकारमध्ये आहेत, तोपर्यंत परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही. मला वाटते ट्रुडो यांनी हा वैयक्तिक मुद्दा बनवला आहे. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले होत असल्याचे त्यांना वाटते,” असं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ हर्ष व्ही पंत यांनी बीबीसीला सांगितलं.
 
शीख धर्म आणि भारत
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने शीख हा एक छोटासा धार्मिक गट आहे. जगभरात शीख धर्माचे सुमारे 25 दशलक्ष अनुयायी आहेत आणि त्यापैकी बहुतेक भारतात आहेत.
 
1980 च्या दशकात शीख कट्टरवाद भारतात मूळ धरू लागली. या काळात पंजाब आणि भारत सरकारमध्ये सहभागी असलेल्या अनेकांच्या हत्या झाल्या.
 
भारत सरकारवर आरोप होत आलेत की, शीख कट्टरतावादावर नियंत्रण ठेवण्यासाठी उघडपणे मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोपही आहे.
 
1984 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात सैनिक पाठवले होते. सुवर्णमंदिर हे शीखांचे पवित्र स्थान आहे. सुवर्ण मंदिरात सशस्त्र शीख हल्लेखोर जमा झाले होते. लष्करी कारवाईत शेकडो लोक मारले गेले.
 
त्यानंतर त्याचवर्षी म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली.
 
कॅनडातील शीख समुदाय आणि तणाव
1985 मध्ये टोरंटोहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट झाला. त्यात 329 लोक मारले गेले. कॅनडातील सर्वात मोठा प्राणघातक दहशतवादी हल्ला आणि हत्याकांड म्हणून याकडे पाहिले जाते.
2005 मध्ये ब्रिटिश कोलंबियातील दोन शीख फुटीरतावाद्यांना दीर्घ तपासानंतर सोडण्यात आले. या खटल्यातील अनेक साक्षीदारांची हत्या करण्यात आली किंवा त्यांना साक्ष देण्यापासून धमकवण्यात आले.
या प्रकरणात तिसरा शीख व्यक्ती बॉम्ब बनवल्याप्रकरणी आणि खुनाच्या खटल्यात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी दोषी आढळला होता.
2005 मध्ये या प्रकरणी सुटका झालेल्या रिपुदमन सिंह मलिकवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नंतर दोन जणांना अटक करण्यात आली.
खलिस्तान चळवळीला भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानतो. विशेषत: कॅनडा आणि ब्रिटनमधील खलिस्तानी कारवायांवर भारताचा तीव्र आक्षेप आहे.
2021 च्या जनगणनेनुसार कॅनडामध्ये 7 लाख 70 हजार शीख आहेत.
2015 मध्ये ट्रुडो पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण चार शीख होते.
मध्य-डाव्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे जगमीत सिंग हे देखील शीख आहेत.
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार जगमीत सिंग पक्षाचे नेते बनण्यापूर्वी खलिस्तानी रॅलीत सहभागी होत असत.
 



Published By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करणार -राहुल गाँधी

अमित शहांनी केला भाजपचा जाहीरनामा जाहीर

महाराष्ट्रात महाआघाडीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार शरद पवार म्हणाले-

Donald Trump: डोनाल्डट्रम्प यांनी सात स्विंग राज्य जिंकून इतिहास रचला

पुढील लेख
Show comments