लेबनॉनमध्ये इस्रायल सातत्याने प्राणघातक हल्ले करत आहे. दरम्यान, दक्षिण-पूर्व लेबनॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन मीडिया कर्मचारी ठार झाले आहेत.
बेरूतस्थित अल-मायादीन टीव्हीने सांगितले की, शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये त्यांचे दोन कर्मचारी आहेत. अल-मायादीनने सांगितले की, कॅमेरा ऑपरेटर घसान नजर आणि ब्रॉडकास्ट टेक्निशियन मोहम्मद रिदा या हल्ल्यात ठार झाले.
लेबनॉनच्या हिजबुल्लाह गटाच्या अल-मनार टीव्हीने सांगितले की, त्याचा कॅमेरा ऑपरेटर विसम कासिम हसबाया देखील या भागात झालेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पत्रकारांनी सांगितले की, हे लोक ज्या घरामध्ये झोपले होते त्या घराला थेट लक्ष्य करण्यात आले.
हल्ल्यापूर्वी इस्रायली लष्कराने कोणताही इशारा दिला नव्हता.गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला लेबनॉन-इस्रायल सीमेवर गोळीबार सुरू झाल्यापासून अनेक पत्रकार मारले गेले आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये, अल-मायादीन टीव्हीचे दोन पत्रकार ड्रोन हल्ल्यात ठार झाले. याशिवाय महिनाभरापूर्वी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली गोळीबारात रॉयटर्सचे व्हिडिओग्राफर इसाम अब्दुल्ला मारले गेले आणि फ्रान्सची आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था 'एजन्सी फ्रान्स-प्रेस' आणि कतारच्या 'अल-जझीरा टीव्ही'चे पत्रकार जखमी झाले.