नेपाळची राजधानी काठमांडूहून जाणारे विमान आज बुधवारी सकाळी (24 जुलै) त्रिभुवन विमानतळावर कोसळल्याचं सौर्य एअरलाइन्सने सांगितलं. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
सौर्य एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानात क्रू मेंबर्स आणि एअरलाइनचे कर्मचारी असे एकूण 19 जण होते.या दुर्घटनेत केवळ पायलट बचावला आहे. पायलटवर सध्या उपचार सुरू आहेत.
बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार फ्लाइटमध्ये केवळ कर्मचारीच होते. विमानाची सी-चेक म्हणजेच चाचणी सुरू होती.
अपघातानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. नेपाळी लष्करानेही बचावकार्यासाठी आपली टीम विमानतळावर तैनात केली आहे.
बीबीसी नेपाळीने दिलेल्या माहितीनुसार- त्रिभुवन एअरपोर्टच्या प्रमुखांनी सांगितलं की काठमांडूहून पोखरा येथे जाणाऱ्या विमानाने चुकीचं वळण घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
एअरपोर्ट प्रमुख जगन्नाथ निरौला यांनी बीबीसी नेपाळीला सांगितलं, “उड्डाण घेतानाच विमान उजवीकडे वळलं, त्याला डावीकडे वळायचं होतं. या अपघाताचं कारण चौकशीअंती कळेल. उड्डाण केल्यानंतर एका मिनिटाच्या आतच हा अपघात झाला."
नेपाळ नागरी उड्डयनचे सहप्रवक्ते ज्ञानेंद्र भूल यांनी बीबीसीला सांगितलं की, विमानात दोन क्रू सदस्य आणि एअरलाइन्सचे कर्मचारी होते.
सौर्य एअरलाइन्सच्या मते मृतांमध्ये एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे.
पायलटचा अभूतपूर्व बचाव
काठमांडू येथील पोलीस अधिकारी दिनेशराज मैनाली यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 11.15 वाजता विमान अपघाताची माहिती मिळाली.पेट घेतलेल्या विमानातून पायलटची सुटका करण्यात आली आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या काठमांडू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
आतापर्यंत दोन मृतदेह सापडल्याचं विमानतळावरील बचाव कार्य टीमने सांगितलं आहे.
अपघातानंतर काही क्षणांतच धावपट्टीजवळ धुराचे लोट उडाले. विमानतळावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोसळण्याआधी विमानातून "काही कर्कश आवाज ऐकू आले".
नेपाळमधील विमान दुर्घटना
जानेवारी 2023: 4 क्रू मेंबर्स आणि 68 प्रवाशांसह काठमांडूहून उड्डाण करणारे यति एअरलाइन्सचे ATR 72 विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले, त्यात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला.
मे 2022: पोखरा ते जोमसोमला जाणारे हवाई प्रवासी TwinOtter 9NAET विमान क्रॅश होऊन 22 जणांचा मृत्यू झाला.
एप्रिल 2019: लुक्ला विमानतळावर धावपट्टीजवळ समिट एअरचे विमान दोन हेलिकॉप्टरला धडकल्याने किमान तीन जण ठार झाले.
फेब्रुवारी 2019: ताप्लेजुंगमधील पाथीभराजवळ एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन नेपाळ सरकारमधील तत्कालीन मंत्री रवींद्र अधिकारी यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर 2018: गोरखा ते काठमांडूला जाणारे अल्टिट्यूड एअर हेलिकॉप्टर जंगलात कोसळले. त्यात एक जपानी पर्यटक आणि इतर पाच जण ठार झाले.
मार्च 2018: बांगलादेशहून नेपाळला जाणारे यूएस-बांगला एअरलाइन्सचे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले, 51 जणांचा मृत्यू झाला.
फेब्रुवारी 2016: पोखराहून जोमसोमला जाणारे तारा एअरचे विमान कोसळले, त्यात 23 जणांचा मृत्यू झाला
मे 2015: भूकंपानंतरच्या मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर चरीकोटजवळ क्रॅश झाले; यात सहा अमेरिकन सैनिक, दोन नेपाळी लष्करी अधिकारी आणि पाच नागरिक ठार झाले
जून 2015: सिंधुपालचौक येथे भूकंप मदत आणि बचावासाठी डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सने चार्टर्ड केलेले हेलिकॉप्टर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला.
मार्च 2015: तुर्की एअरचे विमान धावपट्टीवरून घसरल्याने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ चार दिवसांसाठी बंद झाले.
फेब्रुवारी 2014: नेपाळ एअरलाइन्स कॉर्पोरेशनचे विमान अर्घाखांची येथे कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर 2012: सीता एअरचे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले, त्यात विमानातील सर्व 19 लोक ठार झाले.
मे 2012: भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारे अग्नी एअरचे विमान जोमसोम विमानतळाजवळ कोसळले, त्यात 19 जणांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर 2011: काठमांडूजवळील कोटदंडा येथे बुद्ध एअरचे विमान डोंगराळ उड्डाणावर कोसळले; नेपाळी, भारतीय आणि इतर नागरिकांसह 14 लोकांचा मृत्यू झाला
ऑगस्ट 2010: काठमांडूहून लुक्लाला जाणारे विमान कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला.
ऑक्टोबर 2008: लुक्ला विमानतळावर लँडिंग अपघातात 18 ठार.
सप्टेंबर 2006: श्री एअरचे हेलिकॉप्टर संखुवासभेच्या घुंसा येथे कोसळून 24 जणांचा मृत्यू झाला.
Published By- Priya Dixit