Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पाकिस्तान : इम्रान खान तुरुंगात, तरीही निवडणुकीच्या निकालात दबदबा, पण सत्तेचं समीकरण कसं जुळवणार?

पाकिस्तान : इम्रान खान तुरुंगात, तरीही निवडणुकीच्या निकालात दबदबा, पण सत्तेचं समीकरण कसं जुळवणार?
, शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (15:30 IST)
पाकिस्तानातील निवडणुकीत आज (10 फेब्रुवारी) समोर आलेले निकाल अगदी स्पष्ट आणि गुंतागुंतीचे दोन्हीही आहेत.यात अपक्षांनी मोठ्या संख्येनं विजय मिळवला आहे. या अपक्षांमध्ये प्रामुख्यानं अशा उमेदवारांचा समावेश आहे, जे कदाचित पीटीआय पक्षाकडून निवडणूक लढले असते. पण त्यांना तसं करण्यापासून रोखण्यात आलं होतं.
 
दुसरीकडे, निवडणुकीपूर्वी विजयाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या नवाज शरीफ यांच्या नेतृत्वातील पीएमएल-एन पक्ष जास्त जागा मिळाल्यानं सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा करू शकतो.
 
पण यात एक बाब अगदी स्पष्ट आहे, ती म्हणजे इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाची प्रसिद्धी म्हणजे केवळ सोशल मीडियावरील बुडबुडा नाही, तर त्यांना लोकांचा भक्कम आणि स्पष्ट पाठिंबा असल्याचं समोर आलं आहे.
 
विशेष म्हणजे पक्षाचे संस्थापक आणि प्रमुख नेते इम्रान खान यांना अपात्र ठरवलेलं आहे, तसंच ते तुरुंगात (भ्रष्टाचार प्रकरणी ते तीन वर्षांची शिक्षा भोगत आहेत, तसंच नुकतीच त्यांना आणखी शिक्षाही सुनावण्यात आलेली आहे) आहेत. तसंच त्यांचं क्रिकेट बॅट हे चिन्हंही गोठवण्यात आलं आहे. कमी साक्षरता असलेल्या देशात निवडणुकीच्या दृष्टीनं हा मोठा फटका समजला जातो. अशा सर्व परिस्थितीत हा पक्ष निवडणूक लढवत आहे.
 
इम्रान खान यांना 2022 मध्ये पंतप्रधान पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यांच्यावर सुरू असलेली बहुतांश प्रकरणं राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा नाईलाज असल्यामुळे पीटीआय पक्षाच्या उमेदवारांना प्रचार किंवा मोठ्या सभाही घेणं अशक्य झालं होतं. काही उमेवार तुरुंगात आहेत, तर काही लपत फिरत आहेत.
 
पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस त्यांना त्रास देत होते आणि पकडून नेत होते, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलीस आणि प्रशासनानं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
पण या सर्वानंतरही पीटीआयशी संबंधित उमेदवारांना इतर कोणत्याही गटापेक्षा अधिक जागा जिंकण्यात यश मिळालं आहे.
 
बहुतांश निरीक्षकांच्या मते, पीएमएल-एन या पक्षाला लष्कराचा पाठिंबा आहे. पण तरीही हा पक्ष दुसऱ्या स्थानी आहे.
 
दरम्यान, पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि आणि हत्या झालेल्या माजी पंतप्रधान बेनझिर भुत्तो यांचा मुलगा बिलावल भुत्तो झरदारी यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान पीपल्स पार्टी तिसऱ्या स्थानी आहे.
 
पण आता खरी स्पर्धा असेल ती पुढं काय घडणार याबाबतची.
 
आगामी काही दिवसांत विविध पक्षांचे उमेदवार निकालावर आक्षेप घेतील. त्यामुळं निकालांमध्ये काही बदल घडू शकतात. पण फक्त त्यावरच नजर ठेवणं गरजेचं असेल असंही नाही.
 
पाकिस्तानात अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना तीन दिवसांच्या आत एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणं अनिवार्य असतं. अन्यथा त्यांना अपक्ष म्हणूनच राहावं लागतं. त्यामुळं पीटीआयला लवकरच काहीतरी तोडगा काढणं गरजेचं ठरणार आहे.
 
इतर पक्ष सुरुवातीपासूनच सर्व उमेदवारांवर नजर ठेवून आहेत. एक-एक करून त्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करून घेण्यात यश मिळेल अशीच आशा त्यांना आहे.
 
दरम्यानच्या काळाच पीएमएल-एन हा पक्ष बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी इतरांबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न करेल. तर पीटीआयलाही त्यांचं नेतृत्व नेमकं कोण करेल? हे ठरवावं लागणार आहे. कारण इम्रान खान लवकर तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता फार कमी आहे.
या निकालातून आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, तीनवेळा पंतप्रधान राहिलेले पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाज शरीफ यांनी लष्कराला विरोध केलेला आहे. तरीही सध्या त्यांना लष्कराचा पाठिंबा आहे. पण तसं असलं तरी इम्रान खान यांचा पाठिंबा असलेल्या उमेदवारांचा विजय झाला. यावरून पाकिस्तानचं आणि त्यांच्या शक्तीशाली लष्कराचं नातं नेमकं काय आहे, हे लक्षात येतं.
 
पाकिस्तानात सगळी चाकं एकमेकांत अडकलेली असल्याचं नेहमी म्हटलं जातं. त्यात कट-कारस्थानं, शह-काटशहा, आघाड्या आणि द्वेष या सगळ्यांचा समावेश असतो.
 
अनेकांना वाटलं होतं की, पाकिस्तानात एका ठराविक दिशेनं निवडणुकीचा निकाल लागेल. पण जे घडलं ते काही वेगळंच आहे.
 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ENG: विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर