Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘बॉयफ्रेंडला खूश करण्यासाठी मी नितंब वाढवणारी शस्त्रक्रिया केली आणि नशिबी आल्या फक्त वेदना’

‘बॉयफ्रेंडला खूश करण्यासाठी मी नितंब वाढवणारी शस्त्रक्रिया केली आणि नशिबी आल्या फक्त वेदना’
, शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (15:04 IST)
- वँलेटिना ओरपेझा कोलोमेनारेस
यादिरा परेझ यांनी त्यांची नितंबं पुन्हा रिकामी करून घेतली आहेत.
 
चार महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी काढलेल्या टिश्यूचा फोटो दाखवला तेव्हा त्यांनी पिवळ्या, लहान गोल आकाराकडे इशारा केला.
 
"लहान बॉल म्हणजे बायोपॉलिमर्स आहेत," असं व्हेनेझुएलाच्या 43 वर्षीय फोटोग्राफर म्हणाल्या. ते साचलेले टिश्यू आणि वाळलेलं रक्त जणू त्यांचं नव्हतंच, असं त्यांनी सांगितलं.
 
"या लहान बॉलपैकी काही माझ्या उजव्या ग्लुटसच्या स्नायूमध्ये शिरले आणि त्यामुळं मला असह्य वेदना होऊ लागल्या."
 
यादिरा यांनी 26 वर्षांच्या असताना त्यांच्या नितंबांमध्ये बायोपॉलिमर्स इंजेक्ट करून घेतले होते.
 
खरंतर यादिरा स्वतःला चांगलं फिगर असलेली आणि सुंदर महिला समजत होत्या. पण त्यावेळी त्यांचा जो बॉयफ्रेंड होता त्याला यादिरा यांची "मोठी नितंबं" असावी असं वाटत होतं.
 
यादिरालाही बॉयफ्रेंडला खुश करायचं होतं.
 
नितंबांमध्ये बायोपॉलिमर्स इंजेक्ट करून घेतल्यानंतर त्यांना जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली त्यावेळी त्यांची नितंबं लाल, कडक आणि गरम झाली. त्यांना बसता किंवा लोटताही येत नव्हतं.
 
त्यानंतर जेव्हाही त्यांना मासिक पाळी आली तेव्हा त्यांना अशी लक्षणं जाणवली.
 
बायोपॉलिमर हा एक असा सिंथेटिक पदार्थ असतो ज्यामुळं ओठ, स्तन किंवा नितंबांचा आकार वाढतो.
 
2021 मध्ये म्हणजे यादिरा यांच्या शस्त्रक्रियेच्या 14 वर्षांनंतर व्हेनेझुएलाच्या प्रशासनानं कॉस्मेटिक सर्जरीमध्ये "फिलर्स"चा वापर करण्यास बंदी घातली होती. त्याच क्षेत्रातील कोलंबिया, ब्राझील आणि मेक्सिको अशा देशांमध्येही यावर बंदी होती.
 
शक्यतो अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया अनाधिकृत किंवा गोपनीय पद्धतीनं केल्या जातात, त्यामुळं बायोपॉलिमर इंजेक्ट केलेल्या रुग्णांचे जागतिक स्तरावरील आकडे उपलब्ध नाहीत.
 
बीबीसी मुंडोनं यादिरा यांनी ज्याठिकाणी बायोपॉलिमर इम्प्लान्ट केले होते, त्या कराकास ब्युटी सलोनशी संपर्क साधला, पण त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
 
इम्प्लान्ट केल्यानंतरच्या 16 वर्षांमध्ये यादिरा यांना दोन लेझर लिपोसक्शन आणि बायोपॉलिमर काढण्यासाठीची शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
 
अखेरच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांनी उपचार आणि रिकव्हरी याचे दस्तऐवज म्हणून स्वतःचे फोटो काढून ठेवायचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या फ्लोरिडातील मियामीमध्ये ही शस्त्रक्रिया आणि उपचार घेण्यासाठी यादिरा यांना कर्जही काढावं लागलं. मियामीमध्ये त्या दोन वर्ष राहिल्या.
 
मूळच्या क्युबा, कोलंबिया आणि व्हेनेझुएलाच्या असलेल्या पण अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या 44 महिलांनी एक ग्रुप तयार केला आहे. या सर्व महिलादेखिल इम्प्लान्ट काढण्यासाठीच्या शस्त्रक्रिया करण्याची तयारी करत आहेत. यादिराही या ग्रुपमध्ये आहेत.
 
त्यांनी स्वतः केलेल्या या अनुभव कथनामध्ये त्यांनी रुग्णालयं, क्लिनिक आणि तज्ज्ञांकडे माराव्या लागलेल्या चकरांबद्दल माहिती दिली आहे.
 
ही लक्षणं त्यांच्या इम्प्लान्टमुळंच आहेत का? याचा नेमका अंदाज त्यांना लावता येत नव्हता. तसंच त्यांच्यापैकी कुणीही त्यांना या वेदनांपासून मुक्ती मिळावी म्हणून चांगले उपचारही दिले नाहीत.
 
'तुझ्या नितंबाचे इम्प्लान्ट करुया!'
2007 मध्ये कराकसमध्ये कॉस्मेटिक सर्जरीची बूम होती.
 
त्यावेळी मी माझ्या मुलाचा पिता असलेल्या हेन्रीबरोबर राहत होते.
 
हेन्री नेहमी वृत्तपत्रं आणायचा आणि त्यामध्ये या सर्जरीसंदर्भातील जाहिराती असायच्या.
 
"हे बघ ते नितंबाची शस्त्रक्रिया करतात, आपणही तुझी करून घेऊ. कल्पना कर, तुला मोठी नितंबं मिळतील," असं तो मला एका दिवशी म्हणाला.
 
सुरुवातील मी नकार दिला, पण शेवटी त्याला खूश करण्यासाठी मीही हो म्हटलं.
 
आम्ही एका ठिकाणी गेलो. ते साधं क्लिनिकही नव्हतं. पण त्याठिकाणी एक ऑपरेशन रूम होती. त्याठिकाणी स्तनाचे इम्प्लान्ट आणि लिपोसक्शन करत होते. कराकसच्या बेलो मोंटेमध्ये ते ठिकाण होतं.
 
आम्ही कोणाचाही सल्ला न घेता एक जाहिरात पाहून गेलो होतो. जाहिरातीत त्यांनी अमेरिका आणि युरोपातील सर्जन करत असलेल्या इम्प्लान्ट मटेरियलचा वापर करणार असं म्हटलं होतं.
 
माझं शरीर तसं चांगलं होतं. त्यामुळं मला कधीही इम्प्लान्ट करण्याचा विचार आला नव्हता. माझी नितंबही लहान किंवा मोठी नव्हती. ती माझ्या शरिराच्या उंची आणि आकारानुसार योग्य होती.
 
पण हेन्रीची अशी इच्छा होती की, माझी नितंबं मोठी असावी. आमची रिलेशनशिप नेमकीच सुरू होत होतो. आम्ही अंदाजे वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होतो.
 
मी आधीही एक इम्प्लान्ट केलेले होते. मी 21 वर्षांची असताना स्तनांची शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी माझ्या स्तनांमध्ये एक गाठ होती. तिची तपासणी झाली तेव्हा त्यात घातक पेशी असल्याचं समोर आलं होतं.
 
मी दोन्ही स्तनांवर काही प्रमाणात मास्टेक्टॉमी केली होती. तसंच प्रोस्थेसिस (कृत्रिम अवयव) लावून घेतले होते.
 
टेप चिटकवला
हेन्री आणि मी पहिल्यांदा चौकशी करण्यासाठी गेलो, त्यावेळी त्याठिकाणी बायोपॉलिमर इंजेक्ट करण्यासाठी आलेल्या महिलांची रांग लागलेली होती.
 
आमच्यावर ट्रिटमेंट करणाऱ्यानं आम्हाला तो डॉक्टर असल्याचं सांगितलं होतं. त्यानं आम्हाला काहीतरी लिक्विड असलेली एक छोटी बाटली दाखवली होती. ते लिक्विड माझ्या नितंबांमध्ये इंजेक्ट केलं जाणार होतं.
 
पण त्यांनी त्याला बायोपॉलिमर म्हटलं नाही. त्यानं म्हटलं की, त्या छोट्या आकार वाढवणाऱ्या पेशी असून त्यामुळं नितंबांना आकार मिळेल.
 
डॉक्टरनं आमची त्यांच्या पत्नीबरोबर भेट घालून दिली. त्याही डॉक्टरसारख्या वृद्ध महिला होत्या. त्यांच्या नितंबांमध्येही 15 वर्षांपासून अधिक काळ हा पदार्थ असून काहीही त्रास झाला नसल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं.
 
त्यांनी लायक्रा पँट आणि घट्ट फ्लॅनल परिधान केलं होतं. त्या छान दिसत होत्या.
 
मला हे इम्प्लान्ट करण्याची गरज नव्हती तरीही जोपर्यंत मी तयार होणार नाही तोपर्यंत हेन्री आग्रह करत राहील हे मला माहिती होतं. त्यामुळं मी हो म्हटलं.
 
मी खूपच विश्वास ठेवला होता. मी त्याबद्दल काहीही वाचलं नव्हतं किंवा मी काय करत आहे, याबाबत काही माहितीही घेतली नव्हती.
 
डॉक्टरांनी आधी मला पोव्हिडीननं (अँटिसेप्टिक) स्वच्छ केलं त्यानंतर मला लोकल अॅनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं. मी स्ट्रेचरवर चेहरा खालच्या दिशेला करून झोपले होते, त्यामुळं काहीही पाहू शकत नव्हते.
 
त्यांनी ज्याच्या मदतीनं इम्प्लान्ट केलं ते उपकरण नेमकं कसं होतं किंवा मला कशाने इंजेक्ट केलं हेही मला पाहायला मिळालं नाही. मला त्याच्या वेदनाही जाणवल्या नाहीत.
 
त्यांनी ज्याठिकाणाहून बायपॉलिमर इंजेक्ट केलं होतं, त्या प्रत्येक छिद्रावर एक छोटी पट्टी लावली आणि मी घरी आले.
 
मी जेव्हा आरशात स्वतःला पाहिलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं. हेन्रीनंदेखिल मी सुंदर दिसत असल्याचं सांगितलं.
 
सुरुवातीला मला ते खूपच हॉट वाटलं. सेक्स करताना अधिक सुरक्षित वाटू लागलं. याचा माझ्या आत्मसन्मानाशी काही संबंध नव्हता तर सेक्सदरम्यान मिळणाऱ्या समाधानाशी होता.
 
पण त्यानंतर काही दिवसांनी काहीतरी द्रव पदार्थ बाहेर येऊ लागला आणि त्यामुळं माझी पँट ओली होऊ लागली होती. मला डॉक्टरांनी त्यावर टेप चिटकवायला सांगितलं आणि लिक्विड बाहेर येणं बंद झालं.
 
दुष्परिणाम जाणवू लागले
मला एक छोटं छिद्र जाणवलं आणि ते सेल्युलाइटसारखं दिसत होतं. हेन्रीनं मला डॉक्टरांकडे जाऊन ते ठिक करून घेण्यास सांगितलं.
 
डॉक्टरांनी तिथं आणखी लिक्विड भरलं पण ते लहान छिद्र कधीही बुजलं (भरलं) नाही.
 
ते दुसरं इंजेक्शन घेतल्यानंतर आठवडाभरानं माझी नितंबं सुजली. ती लाल, कडक आणि गरम झाली होती.
 
त्यानंतर माझी कंबर आणि पाठ अगदी वरपर्यंत (खांद्यापर्यंत) सुजली होती.
 
मला झोपता येत नव्हतं. स्तनांच्या प्रोस्थेसिसमुळं मला पालथं झोपता येत नव्हतं तर नितंबांतील बायोपॉलिमरमुळं मी पाठिवर झोपू शकत नव्हते.
 
बसणं तर माझ्यासाठी एखाद्या कठिण कामासारखं होतं. प्रचंड वेदना होत होत्या. मला त्यानं स्पर्श केला तर मला त्याठिकाणी भाजल्यासारखं झालं.
 
मला हा त्रास होऊ लागला तेव्हा हेन्रीबाबत मात्र सगळं काही बदललं होतं. मला प्रचंड वेदना होत होत्या, त्यामुळं आम्ही सेक्स करू शकत नव्हतो.
 
त्यानं यासाठी मला जबाबदार ठरवलं. त्याच्यात संयम नव्हता. कोणत्याही स्थितीत त्याला शारीरिक सुख हवं होतं. मला होणाऱ्या वेदना किंवा माझा आराम आणि आरोग्या याच्याशी त्याला काहीही घेणं नव्हतं.
 
'तुम्ही म्हटले होते हे सुरक्षित आहे'
डॉक्टरांना मला वेदना आणि सूज कमी होण्यासाठी इंजेक्शनद्वारे औषध देण्यास सुरुवात केली.
 
प्रत्येक महिन्यात जेव्हा मला पिरियड येत होते, तेव्हा मला हाच त्रास व्हायचा. माझी नितंबं, कंबर आणि पाठ सुजायची. लाल व्हायचे, कडक व्हायचे आणि प्रचंड वेदना व्हायच्या.
 
ते मला प्रत्येक महिन्यात औषध द्यायचे पण त्रास फक्त पुढच्या महिन्यापर्यंतच कमी व्हायचा.
 
हेन्री माझ्याबरोबर डॉक्टरांकडं आला. "तुम्ही आम्हाला हे सुरक्षित असून. काही रिअॅक्शन होणार नाही, असं सांगितलं होतं," असं तो डॉक्टरांना म्हणाला.
 
डॉक्टर त्याला म्हणाले, "काळजी करू नका. काहीवेळा असं होत असतं. पण आपण त्यावर उपचार करून त्रास दूर करू."
 
डॉक्टरांनी जवळपास वर्षभर दर महिन्याला इंजेक्शन दिले.
 
शेवटी एकदिवस डॉक्टरांनी मला सांगितलं की, वारंवार इंजेक्शन देणं त्यांना महागात जात आहे. कारण डॉक्टर त्यासाठी माझ्याकडून पैसे घेत नव्हते.
 
गिनी पिगसारखे प्रयोग?
सूज, वेदना, कडकपणा आणि लाल होणं असा त्रास मला दर महिन्याला पिरियडदरम्यान होत होता. मला बसता येत नव्हतं. कामाला जाता येत नव्हतं. मला त्याचं फार वाईट होत होतं.
 
मी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेऊ लागले. ते मला अँटिबायोटिक्स आणि अॅलर्जीवरील औषधं द्यायचे पण त्यानं काहीही फरक पडत नव्हता.
 
अखेरीस एक वेळ असा आला जेव्हा मला कोणीही मदच करू शकत नव्हतं, कारण नेमकं काय होत आहे हेच त्यांच्या लक्षात येत नसायचं.
 
पण मला बायोपॉलिमरवर संशोधन करणारे एक डॉक्टर भेटले. त्यांनी मला रुमेटोलॉजिस्टकडं जाऊन तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला काही चाचण्या करण्यास सांगितलं आणि मला कंबरेत रुमेटॉइड आर्थरायटिस असल्याचं निदान झालं.
 
मी तेव्हा फार तर 27 किंवा 28 वर्षांची असेल.
 
डॉक्टरांनी मला हे बायोपॉलिमरमुळं होत आहे किंवा इतर कशामुळं हे सांगितलं नाही, मात्र त्यांनी मला सूज कमी करणारं प्रेडनिसोन औषध लिहून दिलं.
 
काही काळासाठी मी कराकसमधील सोशल सेक्युरिटी फार्मसीमधून औषधी घेत होते.
 
त्यानंतर कंबर आणि नितंबावर असलेली सूज काहीशी कमी झाली. पण तेही औषध काम करत होतं, तोपर्यंतच.
 
मी जवळपास वर्षभर बायोपॉलिमरवर संशोधन करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण त्यांनाही नेमकं काय करायचं कळत नव्हतं. पण त्यांनी इतर डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि मला लेझर लिपोसक्शन करण्याचा सल्ला दिला.
 
त्यांनी स्वतः मान्य केलं की, ते माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी कॅनुलाच्या माध्यमातून शक्य तेवढे ओढून काढणे हा सर्वात चांगला उपाय होता.
 
त्या डॉक्टरांकडे फक्त दोन पेशंट होते. एक मी आणि दुसऱ्या एक महिला. जणू आम्ही गिनी पिग होतो आणि आमच्यावर प्रयोग सुरू होते.
 
मी एवढी कंटाळले होते की, नितंबातील सर्वकाही काढून टाका असं सांगण्याची घाई मला झाली होती. मला चालायला त्रास होत नव्हता. पण माझी कंबर आणि मणक्याचं मात्र नुकसान झालं होतं.
 
'इम्प्लान्ट करू नका'
हेन्री आणि मी पुन्हा एकदा ज्या डॉक्टरांनी मला बायपॉलिमर इंजेक्ट केलं त्यांना भेटायला गेलो. कारण नेमकं काय घडत आहे, हे मला त्यांना सांगायचं होतं. तेव्हाही त्याठिकाणी इम्प्लान्टसाठी महिलांची रांग लागलेली होती.
 
एके दिवशी मी वेटिंग रूममध्ये असलेल्या महिलांना पँट खाली करून लाल आणि कडक तसंच गरम झालेले नितंब दाखवले.
 
"तुम्ही इम्प्लान्ट करून घेऊ नका, नसता तुमच्याबरोबरही असं होईल," असं मी सर्वांना सांगू लागले.
 
तेव्हा त्यांच्यापैकी एक म्हणाली, ही तर लॉटरी आहे. सर्वांबरोबर असं घडत नाही.
 
डॉक्टरांनी अखेर मला ते काहीही मदत करू शकणार नसल्याचं सांगून टाकलं. "एक तर तुम्ही माझ्यावर उपचार करून मला बरं करा. अन्यथा मी रोज इथं येऊन, काय झालं हे सांगून इतरांना पळवून लावेल," असं मी डॉक्टरांना म्हणाले.
 
त्यानंतर त्यांनी पहिल्या लिपोसक्शनसाठीचा खर्च उचलला. संशोधन करणाऱ्या दुसऱ्या डॉक्टरांनी 2011 मध्ये ती शस्त्रक्रिया केली. एमआरआय केल्यानंतर माझ्या निबंबांमध्ये किती मटेरियल आहे ते लक्षात आलं होतं.
 
डॉक्टरांनी माझ्यासमोर मेयोनिजची एक बाटली आणली त्यात बायोपॉलिमरचे बॉल भरलेले होते.
 
मोठं नुकसान
वर्षभरासाठी मला बरं वाटलं. पण 2012 मध्ये पुन्हा मला पिरियडदरम्यान तशीच लक्षणं जाणवू लागली.
 
माझ्या पाठीवर फारशी सूज नव्हती पण नितंब अगदी दगडासारखे कडक झालेले होते. डॉक्टरांनी मला पुन्हा एमआरआय करायला सांगितलं. अजूनही नितंबांमध्ये अंदाजे 15% बायपॉलिमर शिल्लक असल्याचं मला सांगण्यात आलं.
 
मी स्वतः खर्च करून दुसऱ्यांदा लिपोसक्शन केलं. त्यानंतर तीन महिने मला गिर्डल (कमरेला गुंडाळलेला एक प्रकारचा बेल्ट) वापरावं लागलं.
 
त्यानंतर काही काळातच मी पुन्हा गर्भवती राहिले.
 
मी 17 वर्षांची असताना मला पहिली मुलगी झाली होती. तेव्हा मला गर्भधारणेबाबत काहीही समस्या नव्हत्या. पण यावेळी 32 व्या वर्षी माझा गर्भ टिकू शकला नाही.
 
डॉक्टरांनी हाशिमोटो थायरॉइडिटिस (प्रतिकारक्षमता जेव्हा थायरॉइडवर हल्ला करते) झाल्याचं सांगितलं. थायरॉइडच्या असंतुलनामुळं हे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कदाचित तेही घडलं होतं बायोपॉलिमरमुळंच.
 
थायरॉइडमुळं माझ्या शरिरानं बायोपॉलिमर स्वीकारण्यास नकार दिला होता, की बायोपॉलिमरमुळं प्रतिकारशक्ती एवढी अनियंत्रित झाली होती की त्यानं थायरॉइडचं नुकसान केलं, हेही डॉक्टरांच्या लक्षात येत नव्हतं.
 
पण माझ्या शरिरानं स्तनावरील प्रोस्थेसिस स्वीकारलं होतं, या तथ्यामुळं ते आश्चर्यचकित झाले होते. त्यानं बायोपॉलिमर मात्र स्वीकारले नव्हते.
 
त्यानंतर मी पुन्हा जुलै 2014 मध्ये गर्भवती राहिले. तेव्हा काहीही अडचण न येता मी मुलगा लिओला जन्म दिला.
 
पुन्हा वेदनांची सुरुवात
दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर माझं जीवन बदलून गेलं. मला जवळपास 10 वर्ष काहीही वेदना झाल्या नाहीत. पण गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सर्वकाही बदलून गेलं.
 
पण यावेळी केवळ नितंब किंवा पाठिवर नव्हे तर चेहरा आणि हातावरही लक्षणं दिसू लागली होती. प्रथमच मला सांध्यांमध्ये वेदना होत होत्या.
 
मला ताप आल्यासारखं जाणवत होतं. शरिरावर खाज येत होती. माझ्या डोक्याचा स्फोट होईल, असं मला वाटत होतं.
 
मी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा इमर्जन्सी रूममध्ये असताना माझा नंबर येइपर्यंत अक्षरशः माझा थरकाप होत होता.
 
मी डॉक्टरांना कदाचित ही बायोपॉलिमरची रिअॅक्शन असू शकते, असं सांगितलं. पण डॉक्टरांना मी नेमकं काय म्हणत होते तेच कळत नव्हतं.
 
त्यांनी इलेक्ट्रोकार्डिओग्राम केलं आणि त्यात काहीही निघालं नाही. डॉक्टरांनी कोव्हिड आणि फ्लूची चाचणी केली, त्यातही काही निघालं नाही.
 
मी त्यांना हे बायोपॉलिमरमुळं होत असल्याचं सांगत राहिले. पण त्यांनी माझं काहीही न ऐकता तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि चाचण्या करत राहिले. अशी एकही चाचणी शिल्लक नव्हती जी माझ्यावर झाली नाही.
 
डॉक्टरांनी मला ते माझ्यावर ऑपरेशन करू शकत नसल्याचं सांगितलं. मला त्यांनी खासगी सर्जनकडे जाऊन सल्ला घेण्यास सांगितलं.
 
हॉस्पिटलमधली आणीबाणीची स्थिती आणि विमा असल्यामुळं त्यांना ऑपरेशन करता येणार नव्हतं. कारण ही कॉस्मेटिक सर्जरी होती. जोपर्यंत माझ्या नितंबांमधून स्त्राव होत नाही, तोपर्यंत तरी त्यांना काही शक्य नव्हतं. ते शस्त्रक्रिया करू शकत नव्हते.
 
त्यांनी मला दहा दिवसांसाठी दर आठ तासांनी घेण्यासाठी अँटिबायोटिक्स दिले. त्यानंरत माझ्यात सुधारणा होऊ लागल्या.
 
नैराश्याचा काळ
मी नेमकं काय होत आहे, हे समजून घेण्यासाठी डॉक्टरांकडं गेले. त्यांनी मला दोन पर्याय सांगितले. एक तर माझ्या शरिरात शिल्लक असलेले बायोपॉलिमरमुळं हे घडत असावं किंवा माझ्या स्तनांमध्ये असलेल्या प्रोस्थेसिस असं ते म्हणाले.
 
त्यांनी मला स्तनांमधील प्रोस्थेसिस काढण्याचाही सल्ला दिला.
 
मी आधीच जवळपास दीड वर्षापासून मियामीमध्ये होते. त्यामुळं माझी चिंता, घबराट वाढत होती. मला कुटुंबाला भेटण्यासाठी व्हेनेझुएलाल परत जायचं होतं. मी रुग्णालयात असताना मला आई आणि भावांकडून सहकार्य मिळालं नाही. त्यामुळं माझ्यावर त्याचा प्रचंड परिणाम झाला. कारण आम्ही एकमेकांच्या खूप क्लोज होतो.
 
डॉक्टरांनी मला नैराश्य कमी करण्यासाठीची औषधं दिलं. माझं शरीर नैराश्यामुळं अशी प्रतिक्रिया देत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. "ही एक एक छोटी गोळी घ्या तुम्हाला बरं वाटेल," असं त्यांनी मला सांगितलं.
 
मी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांनी मला इशारा दिला की त्या गोळ्यांनी माझं प्रचंड नुकसान होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. तुमचा मुलाबरोबरचा संवाद संपून जाईल, तुम्हीच काय ते ठरवा असं त्यांनी सांगितलं.
 
त्यामुळे मी त्या गोळ्या न खाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नेमकं काय चुकत आहे, हे शोधण्यासाठी मी बायोपॉलिमर मधील तज्ज्ञ डॉक्टरांचा शोध घेऊ लागले.
 
मला कोलंबियामध्ये एक डॉक्टर सापडले. माझ्या इमिग्रेशनच्या कारणांमुळं मी तेव्हा अमेरिका सोडू शकत नव्हते. पण मी आरोग्याच्या कारणाने परवानगी मिळवण्याचा विचार करत होते. म्हणजे मला जाऊन शस्त्रक्रिया करता आली असती.
 
मला एवढ्या प्रचंड वेदना होत होत्या की, त्या कमी करण्यासाठी मी काहीही करायला तयार होते. अगदी इमिग्रेशनच प्रक्रियेबाबतचा धोकाही पत्करायची माझी तयारी होती. पण मला हळू-हळू बरं वाटू लागलं आणि मी याबाबत थोडा जास्त विचार करायचं ठरवलं.
 
शस्त्रक्रिया आणि व्रण
मी मित्राबरोबर ओहियोला एका रोड ट्रिपवर गेले. त्यावेळी मी अनेक तास बसून राहिले. त्यामुळं माझी नितंबं पुन्हा सुजली ते पुन्हा लाल आणि दगडासारखे कडक झाले.
 
मला पुन्हा ताप आणि थकव्यासारखं जाणवू लागलं. कोव्हिड झाला असावा असं वाटू लागलं. मी बेडवरून उठणार नाही असं वाटायला लागलं होतं.
 
मी ओहियोला असताना हेन्री व्हेनेझुएलावरून रोज लिओला फोन करायचा तेव्हा मला फोन उचलायचीच इच्छा नसायची. मी ज्या परिस्थितीचा सामना करत आहे, त्याला तो कारणीभूत आहे, हे जोपर्यंत मी त्याला सांगत नाही, तोपर्यंत मला त्याच्याशी काही बोलायचं नव्हतं.
 
तो मला म्हणाला, "मला वाटतं हा आपल्या दोघांचा निर्णय होता."
 
लिओच्या वडिलांमुळं मी अनेक गोष्टींसाठी तयार झाले. मी खूप काही शिकलेही, पण त्याचबरोबर मी स्वतःची ओळखही विसरले.
 
मी विमानानं मियामीला परतले. कारण मला अनेक तास बसून राहणं शक्य नव्हतं. परतण्यापूर्वी माझ्या एका मित्राने मला डॉक्टर नायर नारायणन यांचा नंबर दिला आणि ते बायपॉलिमरमधील तज्ज्ञ असल्याचं सांगितलं. योगायोगानं तेही मियामीत होते, आणि मला तेच हवं होतं.
 
मी डॉक्टरांना भेटले आणि नेमकी स्थिती समजून घेण्यासाठी त्यांनी मला काही चाचण्या करण्यास सांगितलं. शस्त्रक्रियेपूर्वी ऑपरेटिंग रूममध्ये मला मुलगा लिओसाठी मरणाची खूप भीती वाटत होती.
 
इन्शुरन्समध्ये शस्त्रक्रिया होणार नसल्यामुळं मला पुन्हा मोठं कर्ज घ्यावं लागलं.
 
अखेर डॉक्टरांनी माझ्यावर ओपन सर्जरी केली आणि त्वचा कापून सर्वकाही बाहेर काढलं. त्यांना माझ्या स्नायूंमध्ये लहान आकाराचे बॉल अडकलेले आढळून आले.
 
या सर्वानंतर बरं होण्याची प्रक्रिया अत्यंत मोठी आणि वेदनादायी होती. शस्त्रक्रियेनंतर पहिले तीन आठवडे बसताही येत नव्हतं. लघवीही उभं राहूनच करावी लागत होती.
 
मला झोपण्यातही अनेक अडचणी येत होत्या. मी पोटाखाली उशी ठेवून झोपण्यचा प्रयत्न करत होते. कारण नळ्या काढलेल्या होत्या. त्यामुळं मला एका कुशीवर झोपणं शक्य नव्हतं.
 
मुलगा लिओनं मला उपचारादरम्यान खूप मदत केली. प्रत्येक कामात त्यानं मदत केली. मला दोन महिने ड्राइव्ह करता येत नव्हतं, त्यामुळं मी त्याला कुठंही नेऊ शकले नाही.
 
मी घरून काम केलं. शक्य तेवढं कम्प्युटरसमोर उभं राहून काम करत होते.
 
माझ्या शरिरावर काही मोठे व्रण आहेत. पण त्या खुणांमुळं वेदना होत नाहीत, तर मी काय काय अनुभवलं याची आठवण ते करून देतात.
 
आता मला बायोपॉलिमरमुळं होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करायची आहे.
 
ज्या लोकांना ते करण्याची इच्छा असेल त्यांना मी सांगेल की, असं करू नका. अशाप्रकारे स्वतःला त्रास देऊ नका.
 
तसंच जे या वेदना सहन करत जगत आहेत त्यांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, यालाही पर्याय आहेत. हार मानू नका.
 
बायोपॉलिमर काय असते आणि त्यामुळं काय होऊ शकतं?
प्लास्टिक सर्जन डॉ. नारायणन नायर म्हणाले की, इम्प्लान्टमध्ये नेमकं काय असतं ते जाणून घेणं कठिण आहे.
 
यादिरा यांच्या शरिरातील इम्प्लान्ट काढणारे डॉ. नायर यांच्यामते, "बायोपॉलिमर कशापासूनही तयार झालेले असू शकतात."
 
"बहुतांश महिला सिलिकॉनचा वापर करतात. पण त्याचबरोबर ते बोन सिमेंटपासूनही तयार केलेले असू शकते. त्याचा वापर हाडे किंवा कवटीच्या उपचारासाठी केला जाऊ शकतो," असं तज्ज्ञ सांगतात.
 
नारायणन यांनी नुकतेच मियामीमध्ये पेरूमधील एका रुग्णावर उपचार केले. त्यांच्या नितंबांमध्ये मोटर ऑइल इंजेक्ट केलेले होते.
 
बायोपॉलिमरमुळं जाणवणाऱ्या लक्षणांची तज्ज्ञांनी एक यादी तयार केली आहे.
 
पायात वेदना किंवा चालण्यास त्रास होणे
सुन्न होणे
स्नायू किंवा सांधेदुखी
दीर्घकाळ बसायला किंवा पडून राहाण्यास त्रास होणे
मानसिक संभ्रम
त्वचेचा रंग आणि इतर गोष्टींमध्ये बदल, त्वचा रखरखीत होणं
डॉक्टरांनी सांगितलं की, यादिरा यांना अॅडजुवंट-इन्ड्युस्ड इनफ्लेमॅटरी ऑटोइम्युन सिंड्रोम किंवा एशिया सिंड्रोम झाला आहे. यात रोगप्रतिकारक शक्ती फॉरेन एजंट्सच्या विरोधात आक्रमक प्रतिसाद दर्शवते.
 
"माझ्या सिद्धांतानुसार शरीर प्रतिकार शक्तीला अधिक सक्रिय होण्याची सूचना देतं, त्यामुळं इम्प्लान्टच्या आसपासच्या भागात अशा समस्या निर्माण होऊ लागतात."
 
याबाबत ठरावीक प्रकरणांचा अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढलेला नाही, त्यामुळं हा सिद्धांत आहे असंही ते ठळकपणे म्हणाले.
 
"सिलिकॉनचा शरिरावर कसा परिणाम होतो, हे अद्याप सिद्ध झालेलं नाही," असं ते म्हणाले.
 
पण त्याचवेळी त्यांनी यादिरा यांनी बायोपॉलिमरमुळंचं त्यांचं बाळ गमावलं होतं, हे मात्र खात्रीशीरपणे सांगितलं.
 
"यादिरा अशा सुंदर महिला होत्या ज्यांना चांगलं दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीची गरजच नव्हती. अशा प्रकारची अनेक प्रकरणं माझ्यासमोर येत आहेत. विशेषतः लॅटिन आणि व्हॅनेझुएलाच्या महिलांची ही प्रकरणं आहेत," असंही ते म्हणाले.
 
अमेरिकन सोसायची ऑफ प्लास्टिक सर्जननं सिलिकॉन इम्प्लान्ट काढण्यासाठीच्या किंवा त्याच्या उपचारासाठी काही तज्ज्ञांचा ग्रुप तयार करावा, असा प्रस्ताव नारायणन यांनी दिला आहे.
 
"याला मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला लॅटिन अमेरिकेहून बायोपॉलिमरवर संशोधन करण्यासाठी अमेरिकेत डॉक्टरांना बोलवण्यासाठी पुरेसा निधी मिळवता येईल, अशी मला आशा आहे," असंही ते म्हणाले.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बलात्कार पीडितेचे मूल दत्तक घेतल्यानंतर डीएनए करणे योग्य नाही- मुंबई उच्च न्यायालय