गाझामध्ये लढणाऱ्या इस्रायली सैनिकांमध्ये एक गंभीर आजार पसरू लागलाय. इस्रायली डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या आजाराचं नाव आहे- शिगेला.असं म्हटलं जातंय की, रणांगणातील अस्वच्छ परिस्थिती आणि दूषित अन्नामुळे हा आजार पसरतोय.
असुता अशदोद युनिव्हर्सिटी रुग्णालयातील संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. टाल ब्रोच यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली संरक्षण दलाच्या (आयडीएफ) अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे की, गाझामध्ये तैनात असलेल्या सैनिकांमध्ये पोटाचा गंभीर आजार आढळून आला आहे. ते म्हणाले की, या आजाराचं नाव शिगेला आहे.
यामुळे आजारी पडलेल्या सैनिकांना विलग (क्वारंटाईन) करून उपचारासाठी परत पाठवण्यात आलं आहे.
डॉ. ब्रोच म्हणतात की, रोगाचा प्रसार वेगाने होण्यामागे एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे गाझामधील सैनिकांना पाठवलं जाणारं अन्न. इस्रायली नागरिक हे अन्न तयार करून पाठवत आहेत.
ते म्हणतात की, या अन्नात शिगेला आणि इतर हानिकारक जीवाणूंचा संसर्ग झाला असावा. अशी ही शक्यता आहे की, वाहतूक करत असताना ते अन्न किमान तापमानात ठेवलेलं नसावं किंवा ते गरम न करताच सेवन केलं असावं.
ते म्हणतात, "एका सैनिकाला जुलाब झाले. युद्धभूमीवरील खराब अस्वच्छ परिस्थितीमुळे हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित होऊ शकतो."
डॉ. ब्रोच म्हणतात की सैनिकांना केवळ कोरडे खाद्यपदार्थ पाठवावेत.
जसं की, हवाबंद डब्यातील अन्न, बिस्कीट, प्रोटिन असलेले पदार्थ आणि सुकामेवा इ.
या आजाराची लक्षणं काय आहेत?
शिगेला हा एक जीवाणूंचा प्रकार आहे. तो शरीरात गेल्यावर आमांश होतो, ज्याला "शिगेलोसिस" म्हणतात.
याच्या लक्षणांमध्ये ताप येणं, जुलाबातून रक्त पडणं, पोटात तीव्र वेदना आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवते.
ज्या लोकांची तब्येत फारशी चांगली नाही किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती एचआयव्ही सारख्या आजारांमुळे कमी झाली आहे अशांना या लक्षणांचा त्रास दीर्घकाळ होऊ शकतो.
या रोगाचा उपचार न केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होते. यात रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकते.
हा जीवाणू रक्तात गेल्यावर मृत्यूचा धोका आणखी वाढतो. लहान मुले, एचआयव्हीचे रुग्ण, मधुमेह किंवा कर्करोगाने ग्रस्त लोक आणि कुपोषित लोक याला सहज बळी पडतात.
शिगेला कसा पसरतो?
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार, शिगेला संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काद्वारे हा आजार पसरतो.
शिगेला प्रसाराची काही मुख्य कारणं आहेत...
शिगेला संसर्ग झालेल्या व्यक्तीने जेवण तयार केलं असेल.
पिण्याचे पाणी सांडपाण्यामुळे दूषित झाले असेल.
शिगेला संक्रमित व्यक्तीने दूषित केलेल्या इतर गोष्टी किंवा
शौचालयांच्या संपर्कात कोणीही आल्यास.
शिगेला संक्रमित मुलाची लंगोट बदलताना संसर्ग झाल्यास.
लैंगिक संबंधादरम्यान संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यास.
शिगेला सामान्यतः बेघर लोकांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये, पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये आढळतो.
शिगेला सामान्य आजार आहे का?
सीडीसीच्या अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी 8 कोटी ते 16.5 कोटी लोक शिगेलामुळे प्रभावित होतात. सहा लाख लोकांचा यात मृत्यू होतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2022 मध्ये शिगेला संक्रमणांपैकी 99% संक्रमित रुग्ण कमी किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळले.
बहुतेक शिगेलाचे मृत्यू सहाराच्या खाली असलेल्या आफ्रिकन देशांत आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये नोंदवले गेले आहेत. 60% मृत्यू हे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे झाले आहेत.
दक्षिण कोरियातील इंटरनॅशनल व्हॅक्सिन इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांना एका अभ्यासात असं आढळून आलंय की बांगलादेश, चीन, पाकिस्तान, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि थायलंड यांसारख्या आशियाई देशांमध्ये शिगेला आजार 100 पट सामान्य आहे.
शिगेलावर उपचार आहे का?
सीडीसीच्या म्हणण्यानुसार, नियमित हात धुसल्यास शिगेला प्रतिबंधित केला जाऊ शकतो. जसं की,
स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी
शौचालयातून परत आल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर
लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी
पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन आणि विश्रांती घेतल्याने बहुतेक रुग्ण बरे होतात.
या आजारावर पाच प्रकारचे अँटिबायोटिक्स खूप प्रभावी आहेत.
मात्र अमेरिकेतील आरोग्य अधिकार्यांनी शिगेला बॅक्टेरियामधील असा एक प्रकार शोधला आहे जो प्रतिजैविकांना प्रतिरोधक करतो. याला शिगेला एक्सडीआर किंवा शिगेला सोनेई म्हणतात.
सीडीसीच्या मते, 2022 मध्ये अमेरिकेत आढळलेली शिगेलाची पाच टक्के प्रकरणं औषध-प्रतिरोधक स्ट्रेनशी संबंधित होती. सीडीसीने याला सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका असल्याचं म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने 2020 पासून संपूर्ण युरोप आणि यूकेमध्ये एक्सडीआर स्ट्रेनशी संबंधित प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे.
Published By- Priya Dixit