रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या बाळाचा आईच्या पोटातच मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की प्रसव वेदनेने कळवळत असलेली ही महिला उपचाराशिवाय रुग्णालयाबाहेर ओरडत होती परंतु रुग्णालय प्रशासनाने तिला कोविड चाचणी न करता आत जाण्यास नकार दिला. यानंतर अखेर या महिलेच्या पोटात असलेल्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनावर टीका झाल्यानंतर येथील उच्च आरोग्य अधिकाऱ्याने माफी मागितली आहे. ही घटना चीन मध्ये घडली आहे.
सध्या चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. मध्य चीनमधील शिआन शहरात सुमारे 13 दशलक्ष लोक आहेत आणि येथे कोरोनाला पराभूत करण्यासाठी लोकांना त्यांच्या घरात कैद राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
ही घटना याच चीन शहरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. 1 जानेवारी रोजी पीडित महिलेच्या एका नातेवाईकाने सोशल मीडियावर पोस्ट करून संपूर्ण घटनेचा उल्लेख केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. ज्यामध्ये प्रसूती वेदनांनी ओरडणारी महिला रुग्णालयाबाहेर प्लास्टिकच्या स्टूलवर बसलेली असून सर्वत्र रक्त सांडल्याचे दिसून आले. मात्र, नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली पण तोपर्यंत लाखो लोकांनी ती पाहिली होती. यानंतर लोकांनी रुग्णालय प्रशासनावर जोरदार टीका केली होती.
पीडित महिलेच्या एका नातेवाईकाने एका सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ही संपूर्ण घटना सांगितली होती. कोविड-19 निगेटिव्ह रिपोर्ट नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गर्भवती महिलेला सुमारे 2 तास रुग्णालयात दाखल केले नाही, असे सांगण्यात येत आहे. अद्याप याची पुष्टी झालेली नाही.
त्यानंतर सोशल मीडियावर लोकांचा रोष उसळला शिआनच्या आरोग्य आयोगाचे संचालक पुढे आले आणि त्यांनी संपूर्ण घटनेबद्दल माफी मागितली.
ते म्हणाले की, रुग्णालय प्रशासनाला पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी, येथील प्रशासनाने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, शिआनमधील रुग्णालयात जे काही घडले ते अतिशय गंभीर बाब आहे आणि स्थानिक आरोग्य विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या महाव्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले आहे.