Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा अखेरचा प्रवास असा असेल

Queen Elizabeth II
, शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (23:54 IST)
ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं आहे. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दरम्यान राजपरिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. या अंतिम काळात ब्रिटनच्या जनतेची महाराणींप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम आपल्याला दिसून आली.
 
अखेरचा प्रवास
महाराणींचं पार्थिव त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या 4 दिवस आधी लंडनमधल्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात येईल. इथं सामान्य जनतेला त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे.
वेस्टमिन्स्टर हॉल ब्रिटिश सत्तेचं केंद्रस्थान असलेल्या वेस्टमिन्स्टर पॅलेसचा सर्वांत जुना भाग आहे.
 
2002 साली महाराणी एलिझाबेथ यांच्या आईचं निधन झालं. त्यावेळी त्यांचं पार्थिव या हॉलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तेव्हा ब्रिटनमधील 2,00,000 हून अधिक लोकांनी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं होतं.
 
या हॉलमधल्या कॅटाफल्क म्हणून ओळखल्या जाणार्‍या एक उंच प्लॅटफॉर्मवर महाराणींचं पार्थिव ठेवण्यात येईल.
 
राजघराण्याच्या सेवेत असलेले सैनिक या कॅटाफल्कच्या प्रत्येक कोपऱ्यावर तैनात केले जातील.
 
महाराणींचं पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमधून वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आणलं जाईल. त्यावेळी सोबत राजघराण्यातील सदस्यही असतील. महाराणींना अभिवादन करण्यासाठी लष्करी संचलनही असेल.
 
महाराणींच्या पार्थिवाची अंत्ययात्रा लंडनच्या रस्त्यावरून निघेल. सर्वांना अंत्ययात्रा पाहाता यावी यासाठी मोठ्या स्क्रीन्सवर ती प्रसारित करण्यात येईल.
 
या स्क्रीन्स सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येतील, जसं की लंडनचं रॉयल पार्क. जेणेकरून ब्रिटनच्या जनतेला महाराणींचं अंतिम दर्शन होईल.
 
महाराणींचं पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आणल्यानंतर राजघराण्यातील नियमांप्रमाणे त्यावर इम्पिरियल स्टेट क्राउन, ओर्ब आणि राजदंड ठेवण्यात येईल.
 
महाराणींचं पार्थिव हॉलमध्ये ठेवल्यानंतर एक छोटासा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी लोकांना प्रवेश देण्यात येईल.
 
महाराणींवर अंत्यसंस्कार कधी?
महाराणींवर वेस्टमिन्स्टर अॅबे येथे अंत्यसंस्कार होतील. यासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी लागण्याची अपेक्षा आहे. मात्र अंत्यसंस्कार कोणत्या दिवशी करण्यात येईल याची अधिकृत घोषणा बकिंगहॅम पॅलेसद्वारे केली जाईल.
 
वेस्टमिन्स्टर अॅबे हे ऐतिहासिक चर्च असून ब्रिटनचे महाराज किंवा महाराणींचे राज्याभिषेक याच ठिकाणी पार पडतात.
 
1947 साली याच ऐतिहासिक चर्चमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचा विवाहसोहळा पार पडला होता.
 
1953 मध्ये महाराणींचा राज्याभिषेकदेखील याच चर्चमध्ये पार पडला होता.
 
2002 सालचा अपवाद वगळता 18 व्या शतकानंतर राजघराण्यातील कोणत्याही व्यक्तीचे या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेले नाहीत.
 
2002 साली महाराणींच्या आईंवर याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
 
जगभरातील राष्ट्रप्रमुख महाराणींना शेवटचं अभिवादन करण्यासाठी लंडनमध्ये दाखल होतील. तसंच यावेळी ब्रिटनमधील ज्येष्ठ राजकारणी आणि माजी पंतप्रधानही उपस्थित असतील.
 
महाराणींचं पार्थिव रॉयल नेव्हीच्या स्टेट गन कॅरेजवर ठेऊन वेस्टमिन्स्टर हॉलपासून ते वेस्टमिन्स्टर अॅबेपर्यंत नेण्यात येईल.
प्रिंस फिलिप यांचे काका लॉर्ड माउंटबॅटन यांचं 1979 मध्ये निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी रॉयल नेव्हीच्या 142 खलाशांनी शेवटचं गन कॅरेज वाहून नेलं होतं.
 
महाराणींच्या अंतिम यात्रेत ब्रिटनचे नवीन महाराज आणि राजघराण्यातील काही वरिष्ठ सदस्य दिसण्याची शक्यता आहे.
 
वेस्टमिन्स्टरचे डीन डेव्हिड हॉयल या अंत्यसंस्काराचं आयोजन करतील. यावेळी कँटरबरीचे मुख्य बिशप जस्टिन वेल्बी चर्चमधील प्रवचन देतील. पंतप्रधान लिझ ट्रस यांनाही संबोधित करण्यासाठी आमंत्रित केलं जाऊ शकतं.
 
त्यानंतर महाराणींचं पार्थिव विंडसरला नेण्यात येईल. पण त्याआधी अॅबे ते लंडनच्या हायड पार्क कॉर्नर येथील वेलिंग्टन आर्कपर्यंत अंत्ययात्रा जाईल.
 
दुपारी महाराणींचे पार्थिव विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्जेस चॅपलमध्ये नेण्यात येईल.
 
दफनविधी करण्यापूर्वी विंडसर कॅसलमध्ये एक यात्रा काढण्यात येईल. यात ब्रिटनचे नवे महाराज आणि राजघराण्यातील सदस्य सामील होण्याची शक्यता आहे.
 
सेंट जॉर्जेस चॅपलमध्ये राजघराण्यातील विवाहसोहळा, नामकरण आणि अंत्यविधी केले जातात.
 
याच चर्चमध्ये ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स, प्रिन्स हॅरी आणि मेघन यांचा विवाहसोहळा पार पडला होता. तर महाराणींचे दिवंगत पती प्रिन्स फिलीप यांचे अंत्यसंस्कार याच चर्चमध्ये पार पडले होते.
शेवटी रॉयल व्हॉल्टमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात येईल.
 
याच रॉयल व्हॉल्टमधल्या इतर भागांमध्ये यापूर्वी निधन झालेल्या शाही कुटुंबातल्या सदस्यांचं आणि यापूर्वी राज्य करणाऱ्या राजांचं दफन करण्यात आलेलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋषिकेश -बद्रीनाथ मार्गावर मुंबईच्या भाविकांवर काळाची झडप, कार दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू