Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशियाच्या वॅगनर फायटरची जागा घेणारा 'आफ्रिका कॉर्प्स' हा नवा गट काय आहे?

Webdunia
गुरूवार, 27 जून 2024 (11:47 IST)
मागच्या वर्षी वॅगनर ग्रुपने रशियाच्या सरकार विरोधात बंड करून जगाला हादरवून सोडलं होतं. मात्र पुतीन यांनी प्रभावीपणे या वॅगनर ग्रुपचं विघटन केलं. काही तज्ञांनी बीबीसीशी बोलताना याची पुष्टी केली आहे.
 
मॉस्कोमधील लष्कर प्रमुखांसोबत असलेल्या तणावामुळे वॅगनर गटाचे नेते येवगेनी प्रिगोझिन यांनी 23 जून 2023 रोजी युक्रेनमधून सीमा ओलांडली आणि दक्षिणेकडील रोस्तोव्ह शहर ताब्यात घेतले.
 
यानंतर त्यांच्या सैन्याने काही अंतर मॉस्कोच्या दिशेने कूच केली. आपण न्यायासाठी मोर्चा काढला असल्याचं प्रिगोझिन यांनी म्हटलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी हा मोर्चा थांबला.
 
या घटनेच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर, विमान अपघातात प्रिगोझिन आणि अनेक वरिष्ठ वॅगनर सदस्यांचा मृत्यू झाला आणि वॅगनर समूहाचे भविष्य अनिश्चिततेत सापडले.
 
युनायटेड नेशन्स वर्किंग ग्रुप ऑन मर्सिनरीज सदस्य आणि कोपनहेगन विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. सोर्चा मॅक्लिओड म्हणतात की, यानंतर वॅगनर ग्रुपचे माजी सैनिक संपूर्ण रशियामध्ये विखुरले.
 
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "वॅगनर गट पूर्वीसारखा नसेलही पण या गटाचे काही भाग अजूनही अस्तित्वात आहेत. ते रशियामध्ये अशाप्रकारे विखुरलेले आहेत की त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही."
 
त्या सांगतात, "वॅगनर ग्रुप रशियासाठी भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या इतका महत्त्वाचा होता की काही लोक म्हणतात की, तो कधीच संपणार नाही."
 
रशियासाठी वॅगनर ग्रुप का महत्त्वाचा होता?
बऱ्याच वर्षांपासून, आफ्रिका आणि सीरियामध्ये रशियन ऑपरेशन्सच्या केंद्रस्थानी प्रिगोझिनचं सशस्त्र सैन्य आहे. मात्र त्यांनी हे वेळोवेळी नाकारलं.
 
पण रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर किव्हमध्ये घुसण्यासाठी रशियन सैन्य धडपडत असताना प्रिगोझिनच्या वॅगनरचे लढवय्ये पुढे आले.
 
2022 च्या उत्तरार्धात आणि 2023 च्या सुरुवातीस, वॅगनर ग्रुपने रशियाच्या काही मोर्चांवर जबाबदारी सांभाळली. बखमुतच्या अनेक महिन्यांच्या लढाईत अडकण्याआधी, बहुतेक माजी कैद्यांचा समावेश असलेल्या या गटाने पूर्वेकडील सोलेदार शहर काबीज केले होते.
 
अमेरिकन नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या मते, "त्यावेळी वॅगनरकडे युक्रेनमध्ये अंदाजे 50,000 भाडोत्री सैनिक होते."
 
तज्ञ म्हणतात, पण आता युक्रेनमधील वॅगनरचे युनिट्स रशियन सरकार आणि निमलष्करी दलाने ताब्यात घेतले आहेत.
 
वॅगनरच्या एका माजी कमांडरने अलीकडेच बीबीसी रशियन सेवेला सांगितलं की, "भाडोत्री सैनिकांना संरक्षण मंत्रालयात सामील होण्याचे किंवा तेथून निघून जाण्याचे आदेश देण्यात आले होते."ब्रिटीश गुप्तचर अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, या गटाच्या काही पायदळ तुकड्या रोस्ग्वार्डिया किंवा नॅशनल गार्डमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत. 2016 मध्ये स्थापन झालेल्या या युनिटला पुतिन यांचं 'खाजगी सैन्य' म्हटलं जातं. यावर पुतिन यांचे माजी अंगरक्षक व्हिक्टर झोलोटोव्ह यांचे नियंत्रण होते.
 
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय की, वॅगनर ग्रुपचे सैनिक ऑक्टोबर 2023 मध्ये नॅशनल गार्डच्या नियंत्रणाखाली येऊ लागले.
 
माजी वॅगनर सैनिकांना सहा महिन्यांच्या करारावर युक्रेनमध्ये आणि नऊ महिन्यांच्या करारावर आफ्रिकेत तैनात केले जाणार होते.
 
मात्र, बखमुतमध्ये भाडोत्री सैनिकांच्या रक्तरंजित ऑपरेशन्सचे नेतृत्व करणारे सेनानी अँटोन येलिझारोव्ह यांनी वॅगनर गटाच्या एकीकरणाची पुष्टी करण्यास सुरुवात केली आहे.
 
वॅगनरशी संबंधित टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका छावणीच्या बांधकामात व्यस्त असल्याचं दिसत होतं. ते यात म्हणाले की, वॅगनर सैनिक रशियाच्या भल्यासाठी कार्य करतील आणि नवीन फॉर्मेशनमध्ये नॅशनल गार्ड युनिट्ससह एकत्र येतील.
 
ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या मते, वॅगनरच्या पूर्वीच्या युनिट्सचे रोसग्वार्डिया व्हॉलंटियर कॉर्प्समध्ये विलीनीकरण केल्याने वॅगनर गटावर रशियन सरकारचं नियंत्रण वाढलं आहे.
 
अलीकडील बीबीसी रशियन सेवेच्या तपासणीत असं आढळून आलं की, इतर माजी वॅगनर सैनिक, रमझान कादिरोव्ह आणि चेचेनियातील त्यांच्या अखमत आर्मीसोबत लढण्यासाठी तयार आहेत.
 
जेव्हा वॅगनरचा कमकुवतपणा समोर आला
सेंट पीटर्सबर्ग या रशियन शहरातील टॉवर ब्लॉकमधून वॅगनर ग्रुपचा लोगो काढून टाकल्यानंतर वॅगनर ग्रुप आता कमकुवत झालाय हे समोर आलं होतं.
 
बंडानंतरच्या काही दिवसांत, प्रिगोझिन यांनी पुतिन यांच्याशी करार केला असल्याचं म्हटलं जातं जेणेकरुन आफ्रिकेवर लक्ष केंद्रित करता येईल. सोबतच रशियासाठी संसाधने सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करता येईल.
 
प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर, रशियाचे उप-संरक्षणमंत्री युनूस-बेक येवकुरोव्ह यांनी आफ्रिकन राजधान्यांना भेट दिल्याची माहिती आहे.
 
भेटीदरम्यान त्यांनी वॅगनर ग्रुपकडून दिल्या जाणाऱ्या सेवा बंद होणार नाहीत, असं आश्वासन अधिकाऱ्यांना दिलं आहे.
 
या महिन्याच्या सुरुवातीला पोलिश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स थिंक टँकच्या मते, प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर रशियन सरकारनं आपलं आफ्रिकेवरील लक्ष आणखी वाढवलं आहे.
 
फेब्रुवारीमध्ये, बीबीसीने मिळवलेल्या दस्तऐवजात असं दिसून आलंय की, रशिया सामरिकदृष्ट्या महत्त्वाची नैसर्गिक संसाधनं वापरण्याच्या बदल्यात आफ्रिकेला 'राजकीय पॅकेज' देत आहे. या संकल्पनेला वॅगनर ग्रुपचाही पाठिंबा होता.
 
आफ्रिका कॉर्प्स म्हणजे काय?
ही योजना तथाकथित रशियन मोहीम गटाने पुढे ठेवली होती, त्याचंच नाव आफ्रिका कॉर्प्स होतं.
 
जीआरयूचे माजी जनरल आंद्रे एव्हेरियानोव्ह यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. या मोहिमेपूर्वी, एव्हेरियानोव्ह हे टार्गेट किलिंग आणि परदेशी सरकारं अस्थिर करणाऱ्या विशेष गुप्त मोहिमांवर लक्ष ठेवून असायचे.
 
तज्ञांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आफ्रिका कॉर्प्सने पश्चिम आफ्रिकेत वॅगनरची जागा घेतली आहे. टेलीग्रामवर युनिटने भर्ती करणाऱ्यांना दरमहा 110,000 रूबल पर्यंत पगार देण्याचा दावा केला आणि दीर्घ लढाईचा अनुभव असलेल्या कमांडरच्या सेवा देणार असल्याचं म्हटलंय.
 
जानेवारीमध्ये, आफ्रिका कॉर्प्सने बुर्किना फासोमध्ये 100 सैनिकांच्या पहिल्या तैनातीची घोषणा केली. एप्रिलमध्ये आणखी 100 सैनिक नायजरमध्ये दाखल झाले.
 
अटलांटिक कौन्सिलचे सुरक्षा विश्लेषक रुस्लान ट्रेड यांनी बीबीसीला सांगितलं की, वॅगनर हे प्रत्यक्षात आफ्रिका कॉर्प्स बनले आहेत आणि आता त्यांना लष्करी गुप्तचर आणि संरक्षण विभाग प्रदान करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
 
रुस्लान ट्रेड यांच्या म्हणण्यानुसार, "आफ्रिकेतील हे सैन्य वॅगनरच्या गटासारखेच काम करत आहेत. व्यापारी मार्गांचे रक्षण करणे, रशियन निर्बंधांपासून दूर राहण्यासाठी आणि स्थानिक लोकांना सेवा देण्यासाठी आणि स्थलांतरितांच्या हालचालींचे मार्गदर्शन करण्यासाठी सैन्याचा वापर केला जातोय."
 
पीआयएसएमने अहवाल दिला की, आफ्रिका कॉर्प्सचा वापर वॅगनरपेक्षा अधिक उघडपणे केला जातोय. आफ्रिकेतील पाश्चात्य आणि विशेषतः फ्रेंच प्रभाव कमी करणं हा त्याचा उद्देश आहे.
 
बीबीसी रशियन सर्व्हिसने अशी नोंद केली आहे की, फक्त सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (सीएआर) मध्ये वॅगनर अजूनही प्रिगोझिन यांचा मुलगा पावेलच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत.
 
येवजिनी प्रिगोझिन यांच्यासोबत काम करणाऱ्या एका सूत्राने बीबीसी रशियन सेवेला सांगितले की, "खरं तर, रशियानेच पावेलला त्याच्या वडिलांचे काम आफ्रिकेत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण त्याच बरोबर रशियन हिताच्या विरोधात जाणार नाही अशी अट देखील घातली आहे."
 
वॅगनरचा वर्धापनदिन
गेल्या आठवड्यात 'ले मोंडे' ने अहवाल दिला होता की सुमारे 1,500 वॅगनर सैनिकांनी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागांवर हल्ले करण्यासाठी स्थानिक सुरक्षा दलांना मदत केली होती. मात्र, पीआयएसएमच्या मते, रशियाच्या धोरणात्मक विचारात सीएआरचे महत्त्व कमी होत आहे.
 
डॉ. मॅकलियोड यांच्या मते, "सीएआरमध्ये वॅगनरचं खरं उद्दिष्ट हे होतं की, या संकल्पनेला सिद्ध करणं की, भाडेकरू गट दहशतवादविरोधी कारवाईसाठी यशस्वीपणे वापरला जाऊ शकतो. मात्र, रशियाचं म्हणणं आहे की, हे उद्दिष्ट आता पूर्ण झालंय."
 
पण मॅकलियोड पुढे सांगतात, "वॅगनर सीएआरमध्ये गुंतला होता, ज्यामुळे त्याल नवीन आफ्रिका कॉर्प्समध्ये आणणं कठीण काम होतं."
 
प्रिगोझिन यांच्या बंडखोरीतून निर्माण झालेला धोका असतानाही रविवारी वॅगनरचा वर्धापनदिन मोठ्या प्रमाणात पार पडला.
 
ओवीडी-इंफो मॉनिटरिंग ग्रुपचे डॅन स्टोरीव्ह यांनी बीबीसीला सांगितलं की, प्रिगोझिन वारसा हा क्रेमलिनशी संबंधित लोकांशी आहे.
 
ते म्हणाले, "सर्वसाधारणपणे, वॅगनर बंडखोरांना तळागाळात फारसा पाठिंबा मिळाला नाही आणि जरी पाठिंबा मिळाला असला तरी तो मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यासाठी मिळाला. या आयोजनात युद्धविरोधी संदेश नव्हता. रशियामध्ये निषेध आयोजित करणारे लोक आहेत, परंतु ते युद्धविरोधी सक्रियतेवर केंद्रित आहेत आणि त्यांचा प्रिगोझिनशी काहीही संबंध नाही."
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

सरकार बनताच 'लाडक्या बहिणींना' मिळणार 2100 रुपये-अमित शाह

महाराष्ट्रात निवडणूक उड्डाण पथकाने गाडी अडवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले, 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

प्रेम आणि राजकारणात सर्वकाही न्याय्य असते', नितीन गडकरी शरद पवारांबद्दल असे का बोलले?

कोण होणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री?, अमित शहांनी केला खुलासा

पुढील लेख
Show comments