अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये दातांची रचना माणसासारखी असलेला एक मासा आढळून आला आहे.
या माशाचा फोटो आता सर्वत्र व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे.
गेल्या आठवड्यात या माशाचा फोटो फेसबुकवर सर्वप्रथम शेअर करण्यात आला. नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका नाग्स नामक मासेमारीच्या ठिकाणी हा मासा आढळून आला होता. या माशाचे दात पाहून लोक अत्यंत आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं.
एका युझरने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या माशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
या माशाला शिपहेड फिश म्हणून नाव देण्यात आलं आहे. मेंढीच्या दातांची रचनाही काहीशी अशाच प्रकारची असते. या दातांच्या साहाय्याने मेंढी आपलं अन्न खाते. त्यामुळेच माशाला वरील नाव देण्यात आलं आहे. शिवाय या माशाचं तोंड काहीसं मेंढीप्रमाणेच आहे.
नॅशन मार्टिन या हौशी मच्छिमाराने या माशाला आपल्या जाळ्यात पकडलं होतं.
या माशाला पकडल्यानंतर आपण एखादं मेंढीचं पिल्लू पकडल्याप्रमाणे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया मार्टिन यांनी यावेळी दिली.