Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कसबा-चिंचवड भाजप राखणार की विधान परिषदेसारखा ट्रेंड दिसणार?

Webdunia
शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (13:35 IST)
- मानसी देशपांडे
कसबा आणि चिंचवड या मतदारसंघांमध्ये 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी 24 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता संपला.
 
26 तारखेला मतदान झाल्यानंतर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.
 
नुकत्याच विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला बॅकफूटवर यावं लागल्याने, या पोटनिवडणुकांमध्ये कोणता ट्रेंड बघायला मिळेल याची उत्सुकता आहे.
 
तसंच, याच दरम्यान राज्यात मोठ्या राजकीय घडामोडीही झाल्या. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतले बारकावे आणि इथल्या मतदारांमधला ट्रेंड स्थानिक पत्रकारांकडून बीबीसी मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
कसबा आणि चिंचवडमधला प्रचार का वैशिष्ट्यपूर्ण ठरला?
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळे विधानसभेच्या या दोन जागा रिक्त झाल्या. त्यासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. कसबा आणि चिंचवड हे दोन मतदारसंघ भाजपच्या हातात होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीनेही उमेदवार दिले.
 
कसब्यात भाजपकडून हेमंत रासने यांना तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. तर चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी मिळाली.
 
या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पाहायला मिळाले.
 
कसबा मतदारसंघाची रचना कशी आहे?
कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना जोरदार लढत देत आहेत असं नॅरेटीव्ह सेट करण्यात महाविकास आघाडीला काही प्रमाणात यश आलं, असं ज्ञानेश्वर बिजले यांनी सांगितलं.
 
त्याचसोबत हेमंत रासने यांच्यासोबत भाजपचं संघटनात्मक पाठबळ असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
या लढाईत कसब्यात मतदान किती टक्के आणि कोण कोणत्या भागांमधून होईल हा एका महत्त्वाचा फॅक्टर ठरेल असं जाणकारांना वाटतं. कसब्यात एकूण 2 लाख 75 हजार 679 मतदार आहेत.
 
त्यामध्ये 1 लाख 36 हजार 984 पुरुष तर 1 लाख 38 हजार 690 महिला मतदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 51.54 टक्के इतकं मतदान झालं होतं. तसंच कसब्यात अठरापगड जातींचे नागरिक आहेत, असं विश्लेषक सांगतात.
 
“2009 साली कसबा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. 2009 ची निवडणूक गिरीश बापटांनाही कठीण गेली. ते फक्त आठ हजार मतांच्या फरकाने निवडून आले. कसबा मतदारसंघाचे दोन भाग पडतात.
 
पूर्व भागात अठरापगड जाती, उपजाती, वेगवेगळे समुह यांची मिश्र वस्ती दिसून येते. पश्चिम भागात मिश्र वस्ती दिसून येते. कसब्यात ब्राह्मण वर्गाची व्होट बँक दिसून येते. अशी जात नाही की ती कसबा मतदारसंघात नाही,” असं महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांनी सांगितलं.
 
“महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षांमधले मोठे नेते प्रचारात पाहायला मिळाले. शरद पवार, अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांसारखे सहभागी झाले. भाजपकडून मोठे नेते प्रचारात होते. पण त्याचसोबत भाजपने संघटनात्मक ताकद पणाला लावलेली दिसून आली. प्रभागांमध्ये त्यांनी नगरसेवकांवर जबाबदारी दिली. राज्यस्तरीय नेते जसे की देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे नेते सक्रीय होते. गिरिश महाजन आणि रविंद्र पाटील या हे ग्राऊंड लेवलवर काम करताना दिसले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार-पाच दिवस चिंचवड आणि पुण्यातच होते. याचसोबत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सात आठ दिवस मुक्कामी राहिले. रात्रंदिवस बैठका घेतल्या जात होत्या. यामुळे गेल्या पन्नास वर्षात कसब्याची निवडणूक चुरशीची झाली,” असं दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे चिफ रिपोर्टर ज्ञानेश्वर बिजले यांनी सांगितलं.
 
याचसोबत आजारी असलेले गिरिश बापटही पाहायला मिळाले. यावरून विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात आली.
 
कसब्यात कोणाचं वर्चस्व?
कसब्यात कोणत्या पक्षाला किती मतदान होतं याचा अंदाज मागच्या काही निवडणुकांच्या निकालावरुन बांधता येतो. कसब्यात भाजपला मतं देणारा जसा वर्ग आहे तसं काही भागांमधून काँग्रेसलाही मतदान होतं.
 
“मागच्या काही निवडणुकांचे निकाल पाहिले तर कसब्यात भाजपला सरासारी 63 हजार ते 64 हजार मतं मिळाले आहेत. काँग्रेसला 43 हजार – 45 हजार मतं मिळतात. गेल्या तीन निवडणुकांमध्ये मनसेला सरासरी 27 हजार मतं मिळाली. 2009 आणि 2014 ची निवडणूक रविंद्र धंगेकर यांनी स्वत: लढलेल्या आहेत.
 
या निवडणुकीत मनसेने भाजपला जरी पाठींबा जाहीर केला असला तरीही मनसेचं बेसिक केडर हे फार भाजपसोबत दिसत नाहीयेत,” असं महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांनी सांगितलं.
 
कसबा-चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवारांना सहानुभूतीचा फायदा मिळेल?
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होते आहे. चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. पण कसब्यात तसं झालं नाही. मुक्ता टिळक यांच्या कुटूंबात तिकीट दिलं गेलं नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यावर टिळक कुटूंबातून नाराजीसुद्धा पाहायला मिळाली. आमदारांच्या निधनामुळे लोकांची सहानुभूती भाजपच्या उमेदवाराला फायदेशीर ठरेल का हा एक प्रश्न आहे.
 
विश्लेषकांच्या मते चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांना सहानुभूतीचा काही प्रमाणात फायदा होऊ शकेल. पण कसब्यात मात्र सहानुभूती हा मुद्दा आता मागे पडला आहे.
 
“विद्यमान आमदारांच्या निधनानंतरची पोटनिवडणूकीत सहानुभुती फॅक्टर मोठा असतो. पुण्यात कसबा आणि चिंचवड या पोटनिवढणुका त्या अनुषंगाने नेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. भाजपने त्या अनुषंगाने प्रयत्नही केला की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. पण मागच्या काही पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीच. एकंदरीत सध्या राज्यातलं जे वातावरण बघितलं तर स्वतःच्या पक्षाची ताकद तपासून बघण्याची गरज सगळ्यांना वाटली असेल. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. राज्यात सत्तांतर झाले.
महाविकास आघाडीचं सरकार गेलं. शिंदे-फडणवीस सरकार आलं. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना मिळालं. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते आहे. यामुळे सहानुभुतीचा मुद्दा या निवडणुकीत सुरुवातीपासूनत मागे पडला. चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांना ती कदाचित ती मिळेल. पण कसब्यात तसं चित्र नाही. सहानुभुती असती तर भाजपला ज्या पद्धतीने कसब्यात ताकद लावावी लागत आहे ती लावावी लागली नसती,” दैनिक ’पुढारी’चे प्रतिनिधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं.
 
कसबा आणि चिंचवड राखणं भाजपसाठी का महत्त्वाचं आहे?
“कसबा आणि चिंचवड हातातून गेलं तरीही भाजपच्या सत्तेवर काहीही परिणाम होणार नाही. पण त्यांना पुढचा काळ हे टोमणे मात्र ऐकावे लागतील की तुमच्या हातातून कसबा आणि चिंचवड गेलं. या निकालाचे विश्लेषण पुढच्या राजकारणात होत राहणार. कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांमधले मुद्दे वेगळे आहेत,” असं ‘सकाळ’ वृत्तपत्राचे प्रतिनिधी ब्रिजमोहन पाटील यांनी सांगितलं.
 
त्यांनी पुढे म्हटलं, “कसबा हा सामाजिक, राजकिय आणि वैचारिकदृष्ट्या प्रभावशील मतदारसंघ आहे. त्यामुळे कसबा ताब्यात ठेवणं हे भाजपला जास्त आवश्यक वाटू शकतं. या सगळ्या निवडणुकीचं भाजपकडून नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. ते सांगतात तसं होतं. महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे फडणवीस सरकार आल्यावर कसबा निवडणूक जिंकणं हे फडणवीसांसाठीही महत्त्वाचं असेल. पण धंगेकरांचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे.
 
जर धंगेकरांच्या जागी दुसऱ्या कुणाला उमेदवारी दिली असती तर कदाचित भाजपसाठी ही निवडणूक सोपी झाली असती. पण भाजपचं सुक्ष्म नियोजन आहे. यंत्रणा राबवली जातेय. नेते गल्लोगल्ली फिरत आहेत. काहींना काम करण्यासाठी प्रेमाने तर काहींना दरडावून सांगितलं जातंय. यामुळे भाजप साठी ही फार महत्त्वाची वाटतेय.”
 
कसबा, चिंचवड मधल्या मतदारांचे प्रश्न प्रचारातून अधोरेखित झाले का?
कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचारासाठी मोठे मोठे रोड शो झाले. तसेच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची फौजही कामाला लागली होती. पण हा पुर्ण प्रचारात कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या प्रश्नाभोवती फिरला का?
 
‘प्रभात’ वृत्तपत्राच्या प्रतिनिधी अंजली खमितकर यांनी सांगितलं की, मतदारसंघातल्या रहिवाशांचे प्रश्न प्रचारात जास्त अधोरेखित होताना दिसले नाहीत.
 
“तसं झालं नाही. ही निवडणूक धंगेकर विरुद्ध रासने न राहता भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली. यामुळे मूळ मतदारसंघाचे प्रश्न यामध्ये कमी पाहायला मिळाले. राज्यातल्या इतर राजकीय घडामोडींवर जास्त फोकस पाहायला मिळाला,” अंजली खामिटकर यांनी सांगितलं.
 
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा
प्रचार संपण्यासाठी एक दिवस बाकी असताना, भाजपकडून कसब्याच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी मुद्दा मांडला गेला.
कसब्यात रोड शो दरम्यान त्यांनी पुण्येश्वर मंदिराचा उल्लेख केला.
 
तसंच प्रचाराचा कालावधी संपल्यावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची पुण्येश्वर महादेवाबद्दल काय भूमिका आहे? असा प्रश्न करत त्यांच्या भाषणातला व्हीडीओसुद्धा ट्वीट केला.
 
त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हिंदूत्व आणल्याने भाजपला फायदा होईल का हे बघावं लागेल.
 
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांचे निकाल महापालिका निवडणुकांमध्ये महत्त्वाचे ठरतील?
कसबा आणि चिंचवड हे दोन्ही मतदारसंघ अनुक्रमे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये येतात. यामुळे या पोटनिवडणुकांच्या निकालाचा परिणाम महापालिका निवडणुकांमध्येही दिसू शकतो, असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं. यासाठी अजून बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.
 
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळात कधीही जाहीर होऊ शकतात. पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पण काम करतेय. पण ही निवडणूक जिंकणं काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीसोबत जर पुणे पालिकेत सत्तेत यायचं असेल तर ही निवडणूक महत्त्वाची ठरेल.
 
महापालिका जिंकण्यासाठी पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं मानसिक बळ वाढवायचं असेल तर ही निवडणूक जिंकणं महत्त्वाचे ठरेल. चिंचवडची पोटनिवडणूक अश्विनी जगताप यांच्यासाठी काहीशी सोपी आहे. पण तरिही तिथे राष्ट्रवादीने त्यांची ताकद पणाला लावली आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच हे केलं असावं,” असं दैनिक पुढारीचे प्रतिनीधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

झारखंड निवडणूक: 43 विधानसभा जागांवर मतदान सुरु

महायुतीने मुंबई राहण्यायोग्य केली-अमित शाह

अचलपूरमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसला योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर

सत्तेसाठी भाजपने ठाकरे आणि पवारांचे कुटुंब तोडले-खासदार प्रमोद तिवारी

Maharashtra Live News Today in Marathi बुधवार 13 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

पुढील लेख
Show comments