आज बंगळुरुविरुध्द दिल्लीचा सामना
आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रभावशाली कामगिरी करणारे दोन संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स आज (सोमवारी) ज्यावेळी आमने-सामने येतील त्यावेळी श्रेयस अय्यरच्या कुशल नेतृत्वापुढे अनुभवी विराट कोहलीच्या रणनीतीमधील डावांचीही परीक्षा असेल. आरसीबी आणि दिल्ली दोन्ही संघ मजबूत दिसत आहेत. या दोघांनीही चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय नोंदविले आहेत. आता या दोघांचेही ध्येय आपली प्रभावशाली कामगिरी कायम राखण्याचे असेल.
अय्यर आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत तर कोहलीला राजस्थानविरूध्द सूर गवसला आहे. त्यामुळे श्रेयस-विराट दोघेही एकमेकांवर धोबीपछाड देण्यात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत. त्यामुळे हा सामना अधिकच रोमांचक होण्याची शक्यता आहे. दिल्लीला शिखर धवनचा फार्म चिंतेचा विषय आहे तर ऋषभ पंतने कलकाताविरूध्द 17 चेंडूंत 38 धावा काढून आपल्या आक्रमकतेची झलक दाखविली आहे. याशिवाय मार्कुस स्टोइनिस आणि शिरॉन हेटमायरसारखे आक्रमक फलंदाजही त्यांच्याकडे आहेत तर गोलंदाजीत एन्रिच नॉर्जे, कागिसो रबाडासारखे दिग्गज गोलंदाज आहेत.
आरसीबीचा युवा देवदत्त पड्रिकल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंतच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. अॅयरोन फिंचही चालला तर ही सलामीची जोडी रोखणे दिल्लीला जड जाणार आहे. कोहलीला सूर गवसल्याने एबी डिव्हिलियर्स, शिवम दुबे व गुरकीरत सिंह यांच्यावरचा दबाव कमी झालेला असेल तर गोलंदाजीमध्ये वॉशिंग्टन सुंदर व युझवेंद्र चहल चांगली भूमिका पार पाडत आहेत शिवाय इसुरू उडानानेही प्रभावी केले आहे.