Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

IPL 2020: ही आयपीएल आहे की इंडियन इंज्युरी लीग?

IPL 2020: ही आयपीएल आहे की इंडियन इंज्युरी लीग?
, शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (15:29 IST)
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दुखापतग्रस्त होणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंचा घेतलेला आढावा.
 
मिचेल मार्श-सनरायझर्स हैदराबाद
 
खेळण्यापेक्षा दुखापतींमुळे मॅचेस खेळू न शकणं हा शाप मिचेल मार्शच्या नशिबी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत मिचेलला सातत्याने दुखापतींचं ग्रहण असतं. डेक्कन चार्जर्स, पुणे, हैदराबाद अशा संघांसाठी मिचेल खेळला. मात्र कुठल्याच संघाकडून नियमितपणे खेळू शकला नाही.
 
हैदराबादने यंदाच्या आयपीएलसाठी त्याला संघात घेतलं मात्र पहिल्याच मॅचमध्ये पहिला बॉल टाकल्यावर मिचेल दुखापतग्रस्त झाला. पायाला गंभीर दुखापत होऊनही केवळ संघाची गरज म्हणून तो बॅटिंगला आला.
 
ही दुखापत गंभीर असल्याने मिचेल स्पर्धेतील उर्वरित मॅचेस खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. हैदराबादने मार्शऐवजी जेसन होल्डरची संघात निवड केली.
 
अमित मिश्रा-दिल्ली कॅपिटल्स
 
पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी प्रयत्नशील दिल्ली कॅपिटल्स संघाकरता मिश्रा नसणं हा मोठा धक्का आहे. 37 वर्षीय मिश्रा हा दिल्ली संघाचा अविभाज्य भाग होता.
 
3 ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत स्वत:च्या बॉलिंगवर कॅच घेताना मिश्राच्या बोटाला दुखापत झाली. बॉलिंग टाकण्याच्या उजव्या हातालाच ही दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याचं एक्सरे चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं.
 
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलच्या दीडशे मॅचेसमध्ये मिश्राच्या नावावर 160 विकेट्स आहेत.
 
स्पर्धेचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये अमित मिश्राचा समावेश होतो. आयपीएल स्पर्धेत तब्बल तीन हॅट्ट्रिकचा दुर्मीळ विक्रम मिश्राच्या नावावर आहे.
 
2008 मध्ये रवी तेजा, प्रग्यान ओझा, आरपी सिंग यांना आऊट करत त्यानं विक्रम केला होता. 2011 मध्ये रायन मॅकलरेन, मनदीप सिंग आणि रायन हॅरिस यांना आऊट करत धमाल उडवून दिली होती. 2013 मध्ये भुवनेश्वर कुमार, राहुल शर्मा आणि अशोक दिंडा यांना आऊट करत मिश्राने अनोखा विक्रम नावावर केला.
 
दिल्लीच्या ताफ्यात रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, संदीप लमाचीने, ललित यादव हे फिरकीपटू आहेत. मात्र तरीही त्यांना मिश्राची उणीव भासणार आहे. दिल्लीने अद्याप तरी बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.
 
यंदाच्या हंगामात चेन्नईविरुद्धच्या लढतीत मिश्राने 4 ओव्हर्समध्ये फक्त 23 रन्स दिल्या. हैदराबादविरुद्ध खेळताना मिश्राने 4 ओव्हर्समध्ये 35 रन्सच्या मोबदल्यात डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे या तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध बॅट्समनला आऊट केलं. कोलकाताविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त होण्याआधी मिश्राने 2 ओव्हर्समध्ये 14 रन्सच्या मोबदल्यात शुभमन गिलला आऊट केलं.
 
बॉलर्सची कत्तल होणाऱ्या या स्पर्धेत सलग तेरा हंगाम विकेट्स मिळवणं आणि धावांची लूट रोखणं हे काम मिश्राने समर्थपणे केलं आहे.
 
मिश्राने दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
 
भुवनेश्वर कुमार-सनरायझर्स हैदराबाद
 
अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला.
 
दुखापत गंभीर असल्याने भुवनेश्वरच्या टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्याविषयी साशंकता आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
 
साईड स्ट्रेन आणि हॅमस्ट्रिंगच्या दुखापतींमुळे भुवनेश्वर यंदा दुखापतग्रस्त होता. यामुळेच त्याला न्यूझीलंड दौऱ्यात खेळता आलं नव्हतं.
 
बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत असल्याने भुवनेश्वरला दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया बीसीसीआयतर्फे राबवली जाईल.
 
सनरायझर्स हैदराबादच्या भुवनेश्वरला चेन्नईविरुद्धच्या लढतीत दुखापत झाली होती. 19वी ओव्हर टाकताना भुवनेश्वर दुखापतग्रस्त झाला. फिजिओंच्या उपचारानंतर त्याने तीनदा ओव्हर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मात्र दुखापत गंभीर असल्याने त्याने मैदान सोडलं.
 
हैदराबादसाठी भुवनेश्वर हुकूमी एक्का होता. रन्स रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्या तो यशस्वीपणे सांभाळत होता. त्याचवेळी युवा बॉलर्सना मार्गदर्शन करण्याचंही कामही करत होता. भुवनेश्वर खेळू शकणार नसल्याने हैदराबादसाठी मोठा धक्का आहे.
 
भुवनेश्वरने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 121 मॅचेसमध्ये 136 विकेट्स घेतल्या आहेत. 2016 आणि 2017 अशा सलग दोन वर्षी भुवनेश्वर पर्पल कॅपचा मानकरीही ठरला होता. हैदराबादने 2016 मध्ये आयपीएल जेतेपदावर कब्जा केला होता. हैदराबादला जेतेपद मिळवून देण्यात भुवीच्या बॉलिंगची भूमिका निर्णायक होती.
 
भुवनेश्वर आतापर्यंत बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या संघांसाठी खेळला आहे.
 
इशांत शर्मा-दिल्ली कॅपिटल्स
 
अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मा दुखापतीमुळे यंदाच्या हंगामातील उर्वरित मॅचेस खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 7 ऑक्टोबरला दुबईत संघाच्या सराव सत्रादरम्यान इशांतला डाव्या बरगडीत त्रास जाणवला. फिजिओ आणि डॉक्टरांच्या तपासणीनंतर इशांतच्या मसल टिअर झाल्याचं स्पष्ट झालं.
 
दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने इशांत हंगामातील उर्वरित मॅचेस खेळू शकणार नाही. यंदाच्या हंगामात इशांत केवळ एक मॅच खेळू शकला.
 
इशांतने आयपीएल स्पर्धेत 90 मॅचेस खेळल्या असून, त्याच्या नावावर 72 विकेट्स आहेत. इशांतने पाच विकेट्स घेण्याची करामत केली आहे. दिल्लीपूर्वी इशांतने डेक्कन चार्जर्स, कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.
 
रवीचंद्रन अश्विन-दिल्ली कॅपिटल्स
 
दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना रवीचंद्रन अश्विनच्या खांद्याला दुखापत झाली. मयांकर अगरवालच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने थरारक विजय मिळवला.
 
रवीचंद्रन अश्विनला क्रिकेट मैदानावर पाहताना नेहमीच एक झुंजार आणि कामाशी पराकोटीची बांधिलकी असणारा खेळाडू हीच प्रतिमा मनात येते. दुबईत दिल्ली कॅपिटल्सकडून पहिलीच मॅच खेळताना अश्विनने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. त्या ओव्हरमध्ये आणखी एक विकेट घेतली.
 
शेवटच्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेलने बॉल तटवला. दूर जाणारा बॉल अडवताना अश्विन खांद्यावर आपटला. पुढच्याच क्षणी मैदानावर आडवा होऊन डोळ्यात पाणी आलेला अश्विन अख्ख्या जगाने पाहिला.
 
दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी तातडीने मैदानात धाव घेतली. जर्सीच्या साह्याने त्यांनी अश्विनचा खांदा लपेटला. उंचपुऱ्या अश्विनला वेदना सहन होत नव्हत्या. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.
 
एक्सरेमध्ये अश्विनची दुखापत गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं. आठवडाभरानंतर अश्विन पुन्हा दिल्लीसाठी खेळायला उतरला.
 
अंबाती रायुडू-चेन्नई सुपर किंग्स
 
सलामीच्या लढतीत मुंबईविरुद्ध रायुडूने अर्धशतकी खेळी केली. मात्र खेळीदरम्यान मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे रायुडू पुढच्या काही मॅचेस खेळू शकला नाही.
 
केन विल्यमसन-सनरायझर्स हैदराबाद
 
न्यूझीलंडचा कर्णधार आणि भरवशाचा बॅट्समन केन विल्यमसन मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. या दुखापतीमुळे केन हैदराबादसाठी पहिले काही सामने खेळू शकला नाही. मात्र यातून सावरत केनने झटपट पुनरागमन केलं.
 
अली खान-कोलकाता नाईट रायडर्स
 
आयपीएल स्पर्धेत सहभागी होणारा अमेरिकेचा फास्ट बॉलर अली खान दुखापतग्रस्त झाला. पाकिस्तानात जन्मलेला अली अमेरिकेत खेळतो. त्याला नेमकी कोणती दुखापत झाली याबाबत कोलकाता व्यवस्थापनाने माहिती दिली नाही. हॅरी गुर्नेऐवजी अली खानची निवड करण्यात आली होती. कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती.
 
ऋषभ पंत-दिल्ली कॅपिटल्स
 
दिल्ली कॅपिटल्सचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये दुखापतग्रस्त झाला. वरुण आरोनचा कॅच पकडताना ऋषभला दुखापत झाली.
 
ऋषभच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. त्याचं स्वरुप ग्रेड 1 टिअर असल्याने ऋषभला सावरण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. दिल्लीकडे ऋषभला पर्याय म्हणून राखीव भारतीय कीपर नसल्याने त्यांना ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरेला संघात घ्यावं लागलं.
 
कॅरेला घेतल्याने शिमोरन हेटमायरला वगळावं लागलं कारण अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू खेळू शकतात.
 
श्रेयस अय्यर-दिल्ली कॅपिटल्स
 
दिल्ली-राजस्थान लढतीदरम्यान दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर डाव्या खांद्यावर आदळला. दुसऱ्या इनिंग्जमध्ये चौथ्या ओव्हरदरम्यान हा प्रकार घडला.
 
दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने उपचारांसाठी श्रेयस ड्रेसिंगरुममध्ये परतला. श्रेयसच्या अनुपस्थितीत अनुभवी शिखर धवनने दिल्लीचं नेतृत्व केलं. श्रेयसच्या दुखापतीबाबत दिल्ली कॅपिटल्सने माहिती दिलेली नाही.
 
माघार घेतलेले खेळाडू
इंग्लंडच्या हॅरी गुर्ने (खांदा) आणि जेसन रॉय (साईड स्ट्रेन) या दुखापतींमुळे यंदाच्या आयपीएल हंगामातून माघार घेतली. गुर्ने कोलकाता तर रॉय दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होते.
चेन्नई सुपर किंग्स संघाचा भरवशाचा बॅट्समन आणि आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली.
अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. हरभजन चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. चेन्नईने रैना तसंच हरभजनच्या जागी बदली खेळाडूची निवड केली नाही.
वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाच्या केन रिचर्डसनने माघार घेतली. केन हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणार होता. बेंगळुरूने रिचर्डसनऐवजी त्याचा मित्र आणि फिरकीपटू अॅडम झंपाला संघात समाविष्ट केलं.
वैयक्कित कारणांमुळेच श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मलिंगा हा मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग होता. मुंबई इंडियन्सने मलिंगाऐवजी जेम्स पॅटिन्सनला संघात समाविष्ट केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॅडमिंटन: श्रीकांत डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत सलग गेममध्ये जिंकला