इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामावर कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ही याबाबत गंभीर आहे. बोर्डाने शनिवारी (२२ जानेवारी) सर्व फ्रँचायझींसोबत बैठक घेतली. व्हर्च्युअल बैठकीत या स्पर्धेचे सर्व सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरात घेण्यावर सहमती झाली आहे.
वृत्तसंस्था एएनआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आयपीएलचा १५ वा हंगाम २७ मार्चपासून (रविवार) सुरू होऊ शकतो. बीसीसीआयला ही स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करायची असून पहिला सामना मुंबईत होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
मुंबई आणि पुण्यावर एकमत का?
मुंबई आणि पुण्यातील चार मैदाने एकमेकांच्या अगदी जवळ असल्याने तेथे कार्यक्रम सहज होऊ शकतात. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम व्यतिरिक्त मुंबईचे वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (ब्रेबोर्न स्टेडियम) आणि डीवाय पाटील स्टेडियम येथे सामने होऊ शकतात. यावेळी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मुंबई आणि पुण्यातील सामन्यांसाठी खेळाडूंना विमानतळावर जावे लागणार नाही. ते बसने प्रवास करू शकतात. अशा परिस्थितीत बाहेरील लोकांपासून अंतर राखले जाईल.
UAE,दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे काय झाले?
कोविड-19 चा त्रास वाढल्यास UAE मध्ये IPL पुन्हा एकदा होऊ शकते. दक्षिण आफ्रिकेसाठी बोर्ड तयार नाही. युएईमध्ये दोन मोसमात होणार्या सामन्यांमुळे तेथे बोर्डाला आराम मिळेल. माध्यमांमध्ये पर्याय म्हणून श्रीलंकेचे नाव घेतले जात होते, मात्र बैठकीत त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
लिलावासाठी 1214 खेळाडूंनी नोंदणी केली
IPL या लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंबाबत शनिवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. आयपीएलचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यापैकी 350 ते 400 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले जाईल. "आयपीएल 2022 लिलावासाठी एकूण 1214 खेळाडूंनी (896 भारतीय आणि 318 परदेशी) नोंदणी केली आहे," असे आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे.