आयपीएल 2022 मध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या 10व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सला गुजरात टायटन्सकडून 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने सहा विकेट्सवर 171 धावा केल्या. पण प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 157 धावाच करू शकला.
दिल्लीसाठी कर्णधार ऋषभ पंतने एकाकी झुंज दिली. या सामन्यात त्याने 29 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 43 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. मात्र, संघाच्या पराभवानंतरही कर्णधार पंतने स्वत:साठी मोठी वैयक्तिक कामगिरी केली आहे.
पंतने दिल्लीसाठी असा पराक्रम केला आहे, जो आतापर्यंत संघातील कोणत्याही फलंदाजाने केला नाही. कर्णधार ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी 2500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
पंतशिवाय, आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्ससाठी कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही. गेल्या हंगामातही पंत दिल्ली संघाचा कर्णधार होता, तर 2020 मध्ये दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्याला मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.