आयपीएल 2022 मध्ये मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सुरु आहे. या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सचा डाव सुरूच होता. गेल्या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावणाऱ्या बटलरने आणखी एक कामगिरीही आपल्या नावावर केली आहे. बटलरने आयपीएलमध्ये षटकारांचे शतक पूर्ण केले आहे.
सलामीवीर बटलरने अवघ्या 67 डावात आपल्या आयपीएलमधील 100 षटकार पूर्ण केले आहेत. बंगळुरूविरुद्धच्या मोसमातील 13व्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
आयपीएलमध्ये 100 षटकार लावणारा बटलर आता 25 वा फलंदाज ठरला आहे. त्याने या प्रकरणात वीरेंद्र सेहवागचा 99 षटकारांचा विक्रमही मोडला आहे. त्याने आतापर्यंत IPL च्या 67 सामन्यात 2103 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर दोन शतके आणि 11 अर्धशतके आहेत. बटलरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 200 हून अधिक चौकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आयपीएलमध्ये 142 सामन्यांच्या 141 डावांमध्ये 357 धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ 169 सामन्यांत 239 षटकारांसह एबी डिव्हिलियर्स आणि 215 सामन्यांत 230 षटकारांसह रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे.