Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा अजिंक्य; गुजरातवर केली मात

चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा अजिंक्य; गुजरातवर केली मात
, मंगळवार, 30 मे 2023 (07:17 IST)
पावसामुळे तिसऱ्या दिवसापर्यंत गेलेल्या चुरशीच्या आयपीएल फायनल मुकाबल्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. अहमदाबाद इथे रविवारी फायनलचा मुकाबला होणार होता. पावसामुळे रविवारऐवजी सोमवारी हा सामना सुरू झाला. गुजरातच्या डावानंतर जोरदार पावसाचं आगमन झालं. दोन तास खेळ स्थगित करावा लागला. सुधारित लक्ष्यानिशी खेळणाऱ्या चेन्नईने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत पाचव्या जेतेपदाला गवसणी घातली. चेन्नईने याआधी 2010, 2011, 2018, 2021 या वर्षी जेतेपदावर कब्जा केला होता.
 
गुजरातने चेन्नईसमोर 215 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकात तिसऱ्या चेंडूनंतर पावसाचं आगमन झालं. जोरदार पाऊस असल्याने दोन तास खेळ खंडित झाला. खेळपट्टीजवळचा भाग ओलसर असल्यामुळे तो वाळवण्यासाठी ग्राऊंडस्टाफला मेहनत करावी लागली. चेन्नईला 15 षटकात 171 धावांचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं.
 
डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या बिनीच्या जोडीने 6.3 षटकात 74 धावांची खणखणीत सलामी देत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. चेन्नईला षटकामागे 12 धावांची आवश्यकता होती. पण या दडपणाने खचून न जाता कॉनवे-गायकवाड जोडीने गुजरातच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं.
 
डावखुरा फिरकीपटू नूर अहमदने ऋतुराजला बाद करत ही जोडी फोडली. त्याने 16 चेंडूत 26 धावांची खेळी केली. पाचच मिनिटात नूरने कॉनवेला चतुराईने फसवलं. कॉनवेने 25 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 47 धावांची खेळी केली. थोड्या अंतरात दोघेही सलामीवीर माघारी परतले. पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने षटकारानेच सुरुवात केली. रहाणेच्या पवित्र्याने गुजरातचा संघ बॅकफूटवर गेला. शिवम दुबेला मोठे फटके मारण्यात अडचण येत असल्याने रहाणेने ती जबाबदारी उचलली.
 
मोहित शर्माला मोठा फटका मारण्याचा रहाणेचा प्रयत्न विजय शंकरच्या हातात जाऊन विसावला. आयपीएल फायनल हा शेवटचा सामना असेल असं जाहीर करणाऱ्या अंबाती रायुडूने 8 चेंडूत 19 धावांची अतिशय वेगवान आणि महत्त्वपूर्ण खेळी केली. धावगतीचं दडपण वाढत असताना रायुडूने षटकारांची लयलूट केली. बॅकफूटवर जात एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात रायुडूने लगावलेला षटकार डोळ्यांचं पारणं फेडणारा होता.
 
रायुडूच्या आक्रमणाने दुबेलाही स्फुरण चढलं आणि त्याने गुजरातचं प्रमुख अस्त्र असलेल्या रशीद खानविरुद्ध दोन षटकार वसूल केले. 13व्या षटकात रायुडूने षटकार, चौकार, षटकार मारत आव्हान सोपं केलं. पण मोहित शर्माच्या उसळत्या चेंडूवर आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. रायुडू बाद होताच चाहत्यांना ज्याची प्रतीक्षा होती तो महेंद्रसिंग धोनी मैदानात अवतरला. 14 चेंडूत 22 धावा असं समीकरण होतं. पण मोहित शर्माच्या चेंडूवर धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मिलरने त्याचा अचूक झेल टिपला. धोनी बाद होताच मैदानात शांतता पसरली.
 
मोहम्मद शमीने टाकलेल्या 14व्या षटकात रवींद्र जडेजा-शिवम दुबे जोडीला केवळ 8 धावाच करता आल्या. यामुळे 15व्या आणि शेवटच्या षटकात चेन्नईला 13 धावांची आवश्यकता उरली. मोहित शर्माच्या पहिल्या चेंडूवर दुबेला एकही धाव घेता आली नाही. दुसऱ्या चेंडूवर दुबेने चेंडू तटवून काढत कशीबशी एक धाव मिळवली. तिसऱ्या चेंडूवर जडेजाने एक धावा चोरली. चौथ्या चेंडूवर दुबेने एक धाव मिळवली. 6 चेंडूत 13 हे समीकरण 2 चेंडूत 10 असं झालं.
 
चौथ्या चेंडूनंतर मोहित शर्मासाठी एनर्जी ड्रिंक घेऊन राखीव खेळाडू जयंत यादव मैदानात आला. यात थोडा वेळ गेला आणि मोहितची लय हरवली. पाचव्या चेंडूवर जडेजाने खणखणीत षटकार खेचला मैदानात जल्लोषाला उधाण आलं. आता शेवटच्या चेंडूवर चेन्नईला जिंकण्यासाठी चौकार हवा होता. सामना बरोबरीत संपून सुपर ओव्हरही होऊ शकली असतील. सहावा चेंडू स्वैर लेगस्टंपवर पडला आणि जडेजाने बॅट लावली. चेंडू फाईनलेगच्या दिशेने गेला आणि जडेजाने विजयी जल्लोष केला. जडेजाने 6 चेंडूत 15 धावांची निर्णायक खेळी केली. दुबेने 21 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 32 धावा केल्या. सलामीवीर कॉनवेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
साई सुदर्शनची तडाखेबंद खेळी; गुजरात दोनशेपार
गुजरात विरुद्ध चेन्नई या आयपीएलच्या बहुप्रतीक्षित अंतिम मुकाबल्यात 21वर्षीय साई सुदर्शनच्या 96 धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर गुजरातने 214 धावांचा डोंगर उभारला. चेन्नईने या लक्ष्याचा पाठलाग सुरू केला पण लगेचच पावसाचं आगमन झालं आणि खेळ थांबला.
 
सुरुवातीच्या 19 चेंडूत 23 धावा काढणाऱ्या साईने पुढच्या 20 चेंडूत 73 धावा चोपल्या. साईने 47 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 96 धावांची मॅरेथॉन खेळी केली. अनुभवी वृद्धिमान साहाने अर्धशतकी खेळीसह साईला चांगली साथ दिली.
 
प्रत्येक लढतीत नवा नायक या सूत्राने खेळणाऱ्या गुजरातला साई सुदर्शनच्या रुपात तारणहार मिळाला. अंतिम लढतीचं दडपण बाजूला सारत सुदर्शनने अर्धशतकी खेळी साकारली आहे.
 
तीन शतकांसह झंझावाती फॉर्मात असलेल्या शुबमन गिल आणि अनुभवी विकेटकीपर फलंदाज वृद्धिमान साहा यांनी सावध सुरुवात केली.
 
दुसऱ्याच षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर गिलने मारलेला फटका दीपक चहरच्या दिशेने गेला. त्याला हा सोपा झेल टिपता आला नाही.
 
गिल त्यावेळी ३ धावांवर खेळत होता. या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत गिलने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पॉवरप्लेच्या षटकांचा उपयोग करुन घेत गिलने गुजरातला अर्धशतक पूर्ण करुन दिलं.
 
पॉवरप्ले संपल्यानंतरच्या षटकात रवींद्र जडेजाला पुढे जाऊन मारण्याचा गिलचा प्रयत्न फसला.
 
स्टंप्सच्या मागे अनुभवी महेंद्रसिंग धोनीने त्वरित बेल्स उडवत गिलला माघारी परतावलं. गिलने 20 चेंडूत 7 चौकारांसह 39 धावांची खेळी केली. गिल-साहा जोडीने 42 चेंडूत 67 धावांची खणखणीत सलामी दिली.
 
गिल बाद झाल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंची देहबोली बदलली. गिल तंबूत परतल्यानंतर गुजरातचा वेग मंदावला. साहाने साई सुदर्शनच्या साथीने धावफलक हलता ठेवला.
 
आयपीएलचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक असलेल्या साहाने अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतर दीपक चहरने त्याला बाद केलं.
 
साहाने 39 चेंडूत 5चौकार आणि 1षटकारासह 54 धावांची खेळी केली. साहा-साई जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 42चेंडूत 64 धावांची भागीदारी केली.
 
पावसामुळे सोमवारी ढकलल्या गेलेल्या अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
 
पावसाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचं धोनीने सांगितलं. पावसामुळे पुढच्या दिवशी सामना जाऊनही पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे धोनीने आभार मानले. अंतिम लढतीसाठी धोनीने संघात कोणताही बदल केला नसल्याचं सांगितलं.
 
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजी करायला आवडेल असं सांगितलं. गुजरातने संघात कोणताही बदल केला नाही.
 
चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये जेतेपदाची कमाई केली आहे. गुजरातने गेल्या वर्षी पदार्पणाच्या वर्षातच जेतेपदावर नाव कोरलं होतं. सलद दुसऱ्या वर्षी त्यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
 
प्राथमिक फेरीत गुजरातने 14 लढतींपैकी 10 सामने जिंकत 20 गुणांची कमाई केली आणि गुणतालिकेत अव्वल स्थानासह प्लेऑफसह स्थान पटकावलं. दुसरीकडे चेन्नईने 14पैकी 8 सामन्यात विजय मिळवला. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यांचे 17 गुण झाले. त्यांनी दुसरं स्थान पटकावलं.
 



Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CSK vs GT : अहमदाबादमध्ये पाऊस थांबला, साडे अकरा वाजता पंच पुन्हा पाहणी करतील