Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

धोनी सेना प्लेऑफमध्ये; ऋतुराज-कॉनवे चमकले

धोनी सेना प्लेऑफमध्ये; ऋतुराज-कॉनवे चमकले
, रविवार, 21 मे 2023 (14:12 IST)
रणरणत्या उन्हात, पाऱ्याने चाळिशी ओलांडलेली अशा वातावरणात चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत चेन्नईने दिल्लीवर 77 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
 
आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये आगेकूच करण्याची चेन्नईची 12वी वेळ आहे. चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं आहे. गुजरात आणि चेन्नई या संघांनी प्लेऑफसाठी पात्र होण्याचा मान पटकावला आहे. प्लेऑफमध्ये खेळणारे उर्वरित दोन संघ उद्यापर्यंत स्पष्ट होतील.
 
41वर्षीय धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असू शकतो या भावनेतून सामना कुठेही असला तरी चाहते धोनीला आणि पर्यायाने चेन्नई सुपर किंग्सला पाठिंबा देत आहेत. शनिवारी दुपारी प्रचंड उन्हात झालेल्या लढतीत धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी सावध सुरुवात आली. कोरडया स्वरुपाची खेळपट्टी असल्याचं लक्षात आल्यानंतर ऋतुराजने दिल्लीच्या फिरकी आक्रमणावर जोरदार हल्ला केला.
 
ऋतुराज-कॉनवे जोडीने 141 धावांची दमदार सलामी दिली. चेतन सकारियाने ही जोडी फोडली. ऋतुराजने 50 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 79 धावांची अफलातून खेळी केली. ऋतुराजच्या जागी आलेल्या शिवम दुबेने कॉनवेला चांगली साथ दिली.
 
या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 22 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. फटकेबाजीच्या प्रयत्नात असणाऱ्या दुबेला खलील अहमदने बाद केलं. शिवमने 9 चेंडूत 3 षटकारांसह 22 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा या सगळ्यांना बाजूला सारत खुद्द महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. शतकाकडे कूच करणारा कॉनवे अँनरिक नॉर्कियाची शिकार ठरला.
 
त्याने 52 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह 87 धावांची मॅरेथॉन खेळी केली. धोनीने 5 धावा केल्या तर जडेजाने 7 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह 20 धावांची खेळी केली. चेन्नईने 223 धावांचा डोंगर उभारला.
 
या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ झटपट तंबूत परतला. गेल्या काही सामन्यात चांगला सूर गवसलेल्या फिल सॉल्टसाठी महेंद्रसिंग धोनीने स्टंप्सपाशी येत यष्टीरक्षण करण्याचा निर्णय घेतला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात झेल देऊन सॉल्ट माघारी परतला. पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता रायली रुसो बाद झाला. 26/3 अशा स्थितीतून वॉर्नरने संघाला सावरलं. यश धूल आणि अक्षर पटेल यांनी वॉर्नरला साथ देण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरने एकाकी झुंज देत 58 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 86 धावांची खेळी केली. दिल्लीने 146 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहर, महेश तीक्षणा आणि मथीशा पथिराणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.
 


Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरात उभी असलेली स्कूटर बनली आगीचा गोळा, झाला मोठा स्फोट