Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युट्युबवर पेज लाईक करून पैसे मिळवता येतात का? हा नवीन घोटाळा काय आहे?

youtube whatsapp
, गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (22:53 IST)
मुरलीधरन काशी विश्वनाथन
  
तुम्हाला व्हॉट्सॲपवर एक मेसेज येतो.
 
ज्यात असं लिहिलेलं असतं की इन्स्टाग्रामवर आणि युट्यूबवर असणारे सोशल मीडिया पेज लाईक करून तुम्ही पैसे कमवू शकता.
 
तुम्ही जर का या मेसेजवर विश्वास ठेवला आणि चुकून सोशल मीडिया पेज लाईक केले तर तुमच्या खात्यातून हजारो रुपये गायब होऊ शकतात.
 
"हा काय प्रकार आहे?" असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडू शकतो.
 
तामिळनाडू पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा एक नवीन घोटाळा आहे आणि सध्या तो वेगाने फोफावत चाललाय.
 
या आर्थिक फसवणुकीपासून स्वतःला नेमकं कसं वाचवलं पाहिजे?
 
हा घोटाळा नेमका कसा केला जातो?
या बनवाबनवीची सुरुवात होते तुमच्या हातातल्या मोबाईलमध्ये असणाऱ्या व्हॉट्स ॲपवरून
 
'पूलोका रागसियाम याना माडी मोसक कलंजियम' नावाचं एक तामिळ पुस्तक सुमारे 100 वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेलं होतं. या पुस्तकाच्या लेखकांनी सुमारे 140 वेगवेगळे घोटाळे यामध्ये उलगडून सांगितले होते.
 
माणसाच्या इच्छेचे भांडवल करून यापैकी बहुतांश घोटाळे करण्यात आले होते.
 
इंटरनेटचा शोध लागल्यानंतर जर अशा मानवी इच्छांवर आधारित असणाऱ्या घोटाळ्यांची यादी बनवायची ठरवली तर यासारखी किमान दोन ते तीन पुस्तकं लिहावी लागतील. आता या घोटाळ्यांच्या यादीत 'लाईक करून पैसे मिळवा' या नवीन घोटाळ्याचा समावेश करता येईल.
 
व्हाट्सॲपवरून या घोटाळ्याची सुरुवात
 
एका मुलीचा फोटो असलेला एक व्यक्ती व्हॉट्स ॲपवरून तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. ती व्यक्ती तुम्हाला सांगते की ती एका डिजिटल मार्केटिंग कंपनीची प्रतिनिधी आहे आणि तुमच्यासाठी त्याच्याकडे एक ऑफर आहे.
 
ती ऑफर अशी की सध्या तुम्ही एखादी नोकरी शोधत असाल तर तुम्हाला त्यासोबतच आणखीन एक नोकरी शोधण्यासाठी मदत करू शकेल आणि अधिकच्या कमाईसाठी तुम्हाला ती व्यक्ती संधी देईल.
 
तुम्ही त्याच्या पहिल्या मेसेजला रिप्लाय केला नाही तरीही ती व्यक्ती एकामागोमाग एक मेसेज तुम्हाला पाठवत राहील. ती व्यक्ती तुम्हाला सांगेल की, त्याच्याकडे युट्यूबवर छोटी छोटी कामं करून पैसे मिळवण्याची एक संधी आहे आणि जर का तुम्ही ते काम केलं तर तुम्हाला किमान 50 ते 100 रुपये मिळतील.
 
सुरुवातीला यासाठी कसलेही शुल्क लागत नाही तुम्हाला केवळ एखाद्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल असं ती व्यक्ती सांगते. ती व्यक्ती तुम्हाला रोज 20 ते 25 युट्युब चॅनलला फॉलो करायला सांगते आणि दिवसाच्या शेवटी त्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळेल असंही सांगितलं जातं.
 
तुम्हाला दाखवलेल्या आमिषाला बळी पडून तुम्ही जर का सुरुवातीला सोपं वाटणारं हे काम करू लागलात तर हळूहळू तुम्ही या मोठ्या जाळ्यात ओढले जाता.
 
या घोटाळ्याचा पुढचा टप्पा काय आहे?
या व्यक्तीने म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला काही युट्युब चॅनलना फॉलो आणि लाईक केल्याचा मोबदला म्हणून काही पैसे तुम्हाला दिलेही जातात. या प्रत्येक चॅनेलसाठी किमान 20 ते 200 रुपये तुमच्या खात्यात जमा केले जातात.
 
दोन ते तीन दिवसानंतर या फसवणुकीच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात होते. या दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय घडतं हे सायबर सुरक्षा तज्ज्ञ हरिहरसूदन थांगावेलू सांगतात.
 
ते म्हणतात की, "या दुसऱ्या टप्प्यात एक आर्थिक विभागातला अधिकारी स्वतःची ओळख तुम्हाला करून देईल. तू तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर आणि इतर तपशील तुम्हाला विचारून घेईल. इतर आर्थिक फसवणुकीमध्ये ज्याप्रमाणे अतिशय वाईट इंग्रजी भाषेत संवाद साधला जातो तसा हा संवाद असणार नाही त्याची भाषा शुद्ध असेल आणि इंग्रजीही चांगलं असेल.
 
त्यानंतर तुम्हाला एका टेलिग्राम ग्रुपचा भाग बनवलं जाईल ज्यामध्ये अनेक ओळखीचे चेहरे असतील. अगदी तुम्हाला माहिती असणाऱ्या अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींचे फोटो वापरणाऱ्या प्रोफाइलही त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये असतील."
 
त्यानंतर त्या ग्रुपमधील काही लोक त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाल्याचे मेसेज तिथे टाकतात. ते तुम्हाला धन्यवाद म्हणू लागतील. त्यानंतर या ग्रुपचा मॉडरेटर एक पोस्ट करतो, ज्यात असं लिहिलेलं असतं की त्यादिवशी त्या ग्रुपमधल्या फक्त पाच ते सहा जणांनाच देता येईल असं एक काम त्यांच्याकडे आहे.
 
थांगावेलू म्हणतात की, मग त्या ग्रुपमधला प्रत्येकजण ते काम त्यांना मिळावं म्हणून स्पर्धा करू लागतात.
 
पाच हजार रुपये जमा केले तर तुम्हाला कित्येक पट फायदा
आता या टप्प्यावर तुम्ही काही पैसे मिळवलेले असतात त्यामुळे मग या ग्रुपचा संचालक एक मेसेज टाकतो ज्यामध्ये एक एक्सएल फाईल दिलेली असते. त्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जर तुम्हाला अधिक पैसे कमवायचे असतील तर केवळ पाच हजार रुपये भरून तुम्ही त्या समूहाचा सदस्य होऊ शकता.
 
ते असंही म्हणतात की तुम्ही गुंतवलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसे तुम्हाला लगेच परत दिले जातील.
 
त्यानंतर तुम्ही थोडेसे साशंक होता आणि ग्रुपमधल्या इतरांकडे याची चौकशी करता. काही फसवणूक झाल्यास तुमचे पैसे परत मिळतील का हे विचारता. ते अर्थातच म्हणतात की, 'हो तुमचे पैसे तुम्हाला मिळतील' तसंच त्यांना मिळालेल्या पैशांचे पुरावेदेखील तुम्हाला दिले जातात.
 
त्यानंतर तुम्ही 5,000 रुपये त्यांना देता आणि त्याबदल्यात ते तुम्हाला सुरुवातीला अगदीच छोटी छोटी कामे देतात. त्यानंतर ते तुम्हाला म्हणतील की तुमच्या खात्यात त्यांनी 7,000 रुपये जमा केले आहेत.
 
त्यानंतर ते एक वेबसाईटची लिंकही पाठवतात. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेच्याच वेबसाईटप्रमाणे हुबेहूब वेबसाईट तुमच्यासमोर उघडली जाते. त्या वेबसाईटवर तुमच्या खात्यावर सात हजार रुपयांची शिल्लक रक्कम असल्याचं दिसतं. पण त्यात असं लिहिलेलं असतं की, एक लाख रुपये जमा झाल्याशिवाय तुम्ही ते पैसे काढून घेऊ शकत नाही.
 
त्यानंतर तुम्हाला ते युट्युब चॅनलच्या वेगवेगळ्या लिंक पाठवत राहतात. तुम्ही ते चॅनल किंवा पेज लाईक केले तर तुम्हाला 5 रुपये मिळतात आणि जर सबस्क्राईब केले तर त्याबदल्यात 10 रुपये दिले जातात.
 
ते म्हणतात की त्या टेलिग्रामग्रुपवर त्यानंतर अनेक लोक त्यांना पैसे मिळाल्याचे फोटो शेअर करत असतात.
 
त्यानंतर ते पुन्हा पुन्हा तुम्हाला अधिकचे पैसे भरून जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत जातात. कधी पाच तर कधी दहा हजार रुपये ते तुमच्याकडून उकळतात आणि काही दिवसांतच तुम्ही 25,000 रुपये गमावलेले असतात. त्यांनी पाठवलेल्या बँकेसारख्या लिंकवर मात्र तुमच्या खोट्या खात्यात एक लाख रुपये जमा झाल्याची माहिती दिलेली असते.
 
पैसे देणारा आणि मिळवणारा असे दोघेही याला बळी पडतात
आता तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले दिसतात आणि त्यानंतर तुम्ही ते पैसे काढू पाहता पण तसं होत नाही. ती वेबसाईट तुम्हाला वेगवेगळी कारणं देत असते. ज्यामध्ये तुम्हाला जीएसटी क्रमांकासाठी नोंदणी करावी लागेल असं सांगितलं जातं आणि तुमचं खातं गोठवल्याचंही ते सांगतात. त्यानंतर काही दिवसांनी अचानक तुम्हाला एक मेसेज येतो ज्यात असं सांगितलं जातं की तुम्ही लगेच दहा हजार रुपये दिले तर किमान 99,000 रुपये तुम्हाला काढता येतील. असं करून ते तुम्हाला अजून पैसे द्यायला भाग पाडू शकतात.
 
असं करण्यामागे एक कारण आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाटले की त्याची फसवणूक झाली आहे आणि त्याने पैसे दिल्याच्या दोन ते तीन दिवसांनंतर त्यांनी सायबर गुन्हे विभागाकडे किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली तर या प्रकारची माहिती लगेचच पेमेंट गेटवे कंपनीला दिली जाऊ शकते आणि त्यानंतर पेमेंट गेटवे कंपनी फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील पैसे आपोआप काढून घेऊन तक्रार करणाऱ्याच्या खात्यात जमा करू शकते.
 
पण तुम्ही पैसे दिल्याच्या काही दिवसांमध्येच तुम्हाला ही तक्रार करावी लागते. त्यामुळेच तुमची फसवणूक करणारी ही टोळी किमान दोन ते तीन महिने गुंतवून ठेवते, तुम्ही त्यांच्याशी बोलत राहता आणि तक्रार करणं विसरून जाता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चॉकलेटमध्ये दबलेलं माणसाचं बोटं, एका महिलेकडून ते खाल्लं गेलं आणि