राज्यात रक्ताची टंचाई देखील निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी राज्य शासन आता फेसबुकची मदत घेणार आहे. त्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. जागतिक रक्तदाता दिनाच्या दिवशीच शासनाने याची घोषणा केली आहे.
या उपक्रमासंदर्भात माहिती देताना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं की, “करोना बरोबरच अन्य आजारांतील गरजू रुग्णांच्या उपचारात रक्ताची गरज असणाऱ्यांना वेळेवर रक्त मिळणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबिरांसोबतच फेसबुकच्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील ७१ शासकीय रक्तपेढ्यांची फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करण्यात येणार आहे.
एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासल्यास ती पेढी फेसबुक पेजवर तशी मागणी करेल आणि शहरातील रक्तदात्यांना रक्तदानाबाबत संदेश जाईल.” आवश्यक त्या गटाचे रक्त वेळीच उपलब्ध झाल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमांचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा विश्वासही डॉ. व्यास यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या उपक्रमाबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, “राज्यात रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी फेसबुकचे सहकार्य घेण्यात येईल, अशी महाराष्ट्र शासन घोषणा करीत आहे. ७१ सरकारी रक्तपेढ्या या फेसबुकच्या रक्तदान व्यासपीठावर नोंदणीकृत होतील. याद्वारे त्या ४५ दशलक्ष रक्तदात्यांपर्यंत पोहोचतील. फेसबुकने ही सेवा सुरु केल्याबद्दल धन्यवाद!”