Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नाशिकच्या सुयश बनविलेल्या अ‍ॅपची दखल अ‍ॅपलच्या सीईओंनी घेतली

apple stores
, सोमवार, 27 जून 2022 (18:39 IST)
नाशिक माणसांमध्ये जिद्द असली आणि काही तरी वेगळे करून दाखवायची इच्छाशक्ती असली, तर सर्वच काही शक्य असते, हे नाशिकच्या एका तरूणाने इटली येथे जाऊन सिद्ध केले. त्याने थेट अ‍ॅप्पल कंपनीच्या सीईओंशी संवाद साधण्याचा मान मिळवला आहे. त्याने एक अ‍ॅप डेव्हलप करून वर्ल्डवाईड डेव्हलपर कॉन्फरन्स 2022 मध्ये सुयश लुणावतने बनविलेल्या अ‍ॅपचे कौतुक करण्यत आले. जगभरातील साडेतीनशे विद्यार्थ्यांमधून त्याची बाराव्या क्रमांकावर निवड झाली. त्यात तो भारतातील एकमेव विद्यार्थी ठरला. इटली येथे जाऊन त्याने व त्याच्या सहकार्‍यांनी अंध-कर्णबधिरांसाठी अ‍ॅने नावाचे खास अ‍ॅप लॉन्च केले.
नाशिक शहरातील महात्मानगर भागात राहणार्‍या लुणावत कुटुंबीयांतील सुयश हा एक सदस्य आहे. आई, वडील आणि आपल्या दोन बहिणींसह नाशिक येथे राहतो.  साहजिकच इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलाने आपल्या व्यवसायातच हातभार लावावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांची होती. परंतु त्याला आवड असल्याने कॉम्प्युटर कोडींग प्रोग्राममध्ये शिक्षण घेण्यासाठी इटलीला जाण्याचा निर्णय त्याने बोलून दाखविला. साहजिकच एकुलता एक मुलगा असल्यामुळे पहिल्यांदा या निर्णयाला घरातूनच विरोध झाला, मात्र सुयशने या विषयाचे महत्त्व आणि आपल्याला त्या विषयात काय काय करावयाचे आहे, हे सांगितल्यावर कुटुंबीयांनी सुद्धा त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यानंतर या शिक्षणासाठी परदेशात जायचे परंतु त्याच काळात कोरोनाची पहिली लाट जगभरात दाखल झाली. त्यामुळे एक वर्ष वाया गेले. दुसर्‍या वर्षी सुद्धा कोरोनामुळे शिक्षण घेता आले नाही.
आपल्या आयुष्यातील दोन वर्षे ही चक्क वाया गेल्याचे दुःख हे सुयशला होते. त्याच बरोबर ही दोन वर्षे वाया गेल्यामुळे काही प्रमाणात दबावतंत्र सुरू झाले होते. परंतु त्याने आपली पॅशन, आपली आवड जपण्याच्या हेतूने हे शिक्षण घेण्यावर तो ठाम राहिला. इटलीत गेल्यानंतर आपल्या चार ते पाच सहकार्‍यांच्या मदतीने त्याने अंध अपंगांसाठी खास एक अ‍ॅप लॉन्च केले. हे अ‍ॅप लॉन्च झाल्यानंतर अ‍ॅपल कंपनीच्या वतीने म्हणजेच अ‍ॅपल कम्प्युटर कोडींग या संस्थेच्या वतीने जगभरातील या क्षेत्रात काम करणार्‍या युवकांना त्यांचे प्रोजेक्ट सादर करण्यासाठी संधी दिली जाते. जगभरातून येणार्‍या लाखो विद्यार्थ्यांमधून केवळ साडेतीनशे विद्यार्थ्यांची निवड यात केली जाते. साडेतीनशे विद्यार्थ्यांमध्ये सुयश चा नंबर लागला होता. त्यानंतर त्याने त्याच्याविषयी माहिती दिल्यानंतर बारा विद्यार्थी निवडण्यात आले आणि या बारा विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भारतातील एकमेव विद्यार्थी म्हणून नाशिकच्या सुयशची निवड झाली. यामुळे त्याला थेट अ‍ॅपल कंपनीच्या सीईओंशी संवाद साधला.
एवढ्या मोठ्या प्रकारची गुणवत्ता मिळवणारा सुयश हा भारतातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. याबाबत बोलताना त्याने सांगितले की, अवघ्या आठ ते दहा महिन्यांपूर्वी त्याने हे काम सुरू केले. कोरोनामुळे दोन वर्ष वाया गेल्यामुळे स्वतःची मानसिकता आणि घरच्यांना याविषयी सकारात्मक करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. माझ्या निर्णयावर मी ठाम राहिल्यामुळे मी यात यशस्वी झालो आहे. घरचा व्यवसाय असतानासुद्धा आपण हा निर्णय घेतल्यामुळे त्यांना काही काळ वाईट वाटले होते, परंतु माझ्यावर असलेल्या विश्‍वासामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला आणि आज मी यशस्वी होऊ शकलो. यानंतर अजून काही मोठ्या प्रमाणावर काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.
अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी काही छायाचित्रे ट्विटरद्वारे प्रसिद्ध केली होती. त्यातील एक छायाचित्र हे सुयशचे होते. दरवर्षी वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कोडर्स कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मोठी संधी अ‍ॅपलच्या वतीने देण्यात येते. सुयशला ही संधी मिळाल्याने आपले स्वप्न एक प्रकारे साकार झाल्याची भावना त्याने व्यक्त केली. त्याने बनविलेले अ‍ॅने अ‍ॅप हे अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. एकंदरीतच भारतातील युवक हे त्यांचे ज्ञान किती चांगल्या प्रकारे जगाच्या पाठीवर सिद्ध करू शकता, याचे उदाहरणच सुयशच्या निमित्ताने समोर आले आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण रोमांचक गोष्टी करू शकतो; पण तुम्ही केलेल्या कामातून इतरांच्या आयुष्यात आलेला आनंद जास्त महत्त्वाचा आहे, असे मत सुयश लुणावत यांनी व्यक्त केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार यांना कोरोनाची लागण