शिवसेना-भाजप युतीने ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी दिली तर मी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून दाखवतो , असा दावा रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी केलाय.
ईशान्य मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेतून जोरदार विरोध आहे. जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात मतदान करण्याची किंवा शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा इशारा स्थानिक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
या कारणामुळे ईशान्य मुंबईतीत उमेदवार कोण असेल हे ठरत नाहीये. तर दुसरीकडे रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतून लढण्याची इच्छा बोलून दाखवली असून, मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष आहे. त्यामुळे हा मतदारसंघ रिपाईच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवेन. या मतदारसंघातील लोक मला ओळखतात. यापूर्वी मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली होती तेव्हा मला २.२५ लाख मते मिळाली होती, असे आठवले यांनी सांगितले आहे.
किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यामुळे शिवसैनिक प्रचंड रागात आहेत, सोमय्या यांना उमेदवारी दिली तर मतदान करणार नाही असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.