Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाऊडी मोदी आणि बॅकस्टेज वर्कर्स

Webdunia
गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (15:41 IST)
नुकताच, मी ह्यूस्टन ला सहा महिने राहिलो होतो. अमेरिकेतील, टेक्सास राज्यातील 'ह्युस्टन' या महानगरात झालेल्या 'हौडी मोदी' या ऐतिहासिक कार्यक्रमाची, संपूर्ण जगाप्रमाणे मलाही उत्सुकता होती. माझी मुलगी अश्विनी आणि जावई 'ह्युस्टनवासी' असल्याने या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मला सतत माहिती मिळत होती. कार्यक्रम यशस्वी झाला, आणि याबाबत सविस्तर माहिती, टीव्ही, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियातून सर्वांनाच मिळाली. पण आपल्याला माहीत नसलेली आयोजनातील माहिती इथे मुद्दाम, द्यावीशी वाटते. 
 
कार्यक्रमाची यशस्विता योग्य आयोजनावर अवलंबून असते,आणि हा तर सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांचा आणि दुसऱ्या बलशाही देशाच्या अध्यक्षांचा एकत्रित असा सर्वात मोठा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे पूर्ण नाव 'हौडी मोदी:शेअर्ड ड्रीम्स+ ब्राईट फ्युचर' असे होते. चार महिन्यापासून याची ह्युस्टनमध्ये पूर्वतयारी सुरू होती. सर्वप्रथम पन्नास हजार प्रेक्षकांची उपस्थिती हे उद्दिष्ट ठरल्यावर योग्य आयोजन आणि अंमलबजावणी यासाठी २५०० स्वयंसेवकांची निवड प्रक्रिया 'टेक्सास इंडिया फोरम'ने केली. बायोडाटा आणि मुलाखतीतून हे स्वयंसेवक निवडले गेले. अश्विनी नृत्य कलाकार व चित्रकार असल्यामुळे कल्चरल टीम मध्ये निवडली गेली. प्रतीक रजिस्ट्रेशन टीम मध्ये होते. याशिवाय सुमारे १००० कलाकार आणि १००० एन आर जी स्टेडियम कर्मचारी व इतर कर्मचारी या सर्व प्रक्रियेत सामील होते. निवडलेल्या स्वयंसेवकांच्या नियमित मीटिंग सुरू झाल्या. त्यात वेगवेगळ्या समित्या, टीम्स, कामाच्या जबाबदाऱ्या ठरवण्यात आल्या.कार्यक्रमाबाबत विविध इन्स्ट्रक्शन्स (मार्गदर्शी सूचना) निवडलेल्या स्वयंसेवकांना ईमेलवर येत होत्या. सर्व सुरळीत चालू असताना दोन महिन्यापूर्वी एक संघर्षपूर्ण अडचण निर्माण झाली. ह्युस्टन मध्ये, कार मधले रेडिओ सुरू केले की अनेक लोकल पाकिस्तानी चॅनेल्स सुरू होतात. या चॅनेल्सवरून पाकिस्तानी व्यक्तींना आवाहने सुरू केली गेली. "जर ५०००० भारतीय, हौडी मोदी कार्यक्रमासाठी एकत्र येणार असतील तर एन आर जी स्टेडियम समोर १लाख पाकिस्तानी नागरिकांनी एकत्र जमावे आणि भारतीय पंतप्रधानांचा कार्यक्रम उधळून लावावा."
अमेरिकेत मूळ पाकिस्तानी नागरिकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.आयोजन समिती त्वरित सतर्क झाली. ह्यूस्टन पोलीस फोर्स आणि यु एस आर्मी दक्ष झाली. आयोजन समिती, सर्व स्वयंसेवकांना ईमेलवर आयोजना संबंधी वारंवार सूचना देत होती. त्यांनी आणखी एक महत्वाची सूचना दिली. स्वयंसेवकांनी व्हाट्सॲप, इमेल वरील दिलेल्या इन्स्ट्रक्शन इतरत्र, कुठेही, कोणालाही, पाठवायच्या नाहीत .सूचनांची अंमलबजावणी झाली की ईमेल डिलीट करावयाचा. अस्सल देशप्रेमी भारतीय स्वयंसेवकांनी, सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली. या दक्षतेमुळे आयोजनात काय चालू आहे ते, बहिष्कार घालणाऱ्यांना कळणे कठीण झाले. विरोधकांना चितपट करण्यासाठी दुसरी नीती ठरवली गेली.५००००, भारतीयांना स्टेडियममध्ये प्रवेश पत्रिका दिल्यानंतरही हजारो भारतीयांना कार्यक्रम स्थळी उपस्थित राहण्याची इच्छा होती. प्रत्यक्ष स्टेडियम मधला कार्यक्रम चालू असतानाच बाहेरच्या प्रेक्षकांसाठी, वेगळ्या स्टेजवर, वेगळा भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता व अनेक भारतीय, ज्यांना आत प्रवेश मिळाला नाही ते, स्क्रीनवर मुख्य प्रोग्राम लाईव्ह बघत होते. या भारतीयांना स्वयंसेवकांना मार्फत सूचना दिल्या होत्या, जर पाकिस्तान समर्थक जमले व घोषणा देऊ लागले तर असंख्य जमलेले भारतीय मोठ्याने घोषणा देतील आणि पाक समर्थकांच्या घोषणा विरुन टाकतील. (याला 'टीम आर्मी' असे नाव होते). अमेरिकन प्रेसिडेंट ही या कार्यक्रमाला आले आणि ह्यूस्टन पोलीस व युएस आर्मीने पाक धार्जिण्यांना, कार्यक्रमाच्या जवळपासही फिरकू दिले नाही. सुमारे एक किलोमीटर अंतरावर २५/३०पाकिस्तानी, आणि त्यांना घेरून शेकडोच्या संख्येने ह्यूस्टन चे पोलीस ही वस्तुस्थिती होती. परिणाम, आवाजी बंद, पाकिस्तानी रेडीओ चॅनल ची मुस्कटदाबी, आणि विरोध नेस्तनाबूद. कारण,मोदी या व्यक्तीपेक्षा, माझ्या भारत देशाचा पंतप्रधान! ही अमेरिकन भारतीयांसाठी स्वाभिमानाची गोष्ट होती. 
एक आठवडा आधी, सर्व टीमच्या रंगीत तालीमी झाल्या आपले काम सांभाळून प्रत्येक जण शंभर टक्के योगदान देत होते. सर्व टिमनी(Teams), स्टेडियम मध्ये वाटपासाठी, भारतीय झेंडे, पोस्टर्स, लेटर्स ,खाद्य पॅकेट्स, पाणी बॉटल, या साऱ्याची पूर्ण तयारी केली, कारण स्टेडियम मध्ये मोबाईल आणि क्लिअर पाऊच पासेस व्यतिरिक्त काहीही नेण्याची सुरक्षिततेसाठी, परवानगी नव्हती. 
 
स्टेडियमचे आवार फार मोठे आहे. पहिल्या मजल्यावर चक्कर मारली तरी एक किलोमीटर अंतर होते. प्रत्येक मजल्याचे, दिशावार, अनेक विभाग केले होते. प्रत्येक विभागात स्वयंसेवक नेमले होते. त्यांना दुसर्‍या विभागात जायला परवानगी नव्हती, इतकी कडक सुरक्षा व्यवस्था होती. काही निवडक स्वयंसेवकांना जे टीम लीडर आणि कॉर्डिनेटर होते त्यांनाच फक्त सर्व ठिकाणी प्रवेश होता, आणि तसे स्पेशल बँड त्यांच्या मनगटावर मानलेले होते. अश्विनी त्यापैकी एक होती, त्यामुळे कुठे काय घडतंय याची माहिती तिला मिळत होती. 
 
मुख्य कार्यक्रम, रविवारी सकाळी१०.३० वाजता होता. पण सारे स्वयंसेवक आदल्या रात्री तीन वाजेपासून स्टेडियममध्ये एकत्र आले. प्रेक्षक पहाटे सात वाजेपासून जमू लागले. ठरल्याप्रमाणे, सार्‍या गोष्टी घडत गेल्या. ८.३० ते १०.३० संगीत नृत्य वादनाचा भारतीय आणि अमेरिकन कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. अगदी 'मिनीट टू मिनिट' कार्यक्रम ठरला होता. पहाटे तीन वाजेपासून आलेले स्वयंसेवक, तहान भूक विसरून दिलेले काम पूर्ण करत होते. ठरलेल्या कार्यक्रमात नसलेली एक घटना मात्र आयत्या वेळी घडली आणि स्वयंसेवकांची धावपळ झाली. ही घटना म्हणजे, कार्यक्रम संपल्यावर मोदी ट्रम्प समवेत समारंभ स्थळावरून बाहेर जाता जाता, अचानक थांबले आणि त्यांनी ट्रम्प यांना विनंती केल्यानंतर, दोघांनी स्टेडियमच्या कडेने संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली. यामुळे सर्व प्रेक्षकांना, दोघांना जवळून बघता आले. उस्फुर्त पणे घडलेल्या या घटनेमुळे प्रेक्षक उत्साहीत झाले आणि स्वयंसेवकांची गोड धावपळ झाली. 
अमेरिकन वासी भारतीय सुशिक्षित असल्याने भारतातील घटना, विकास प्रक्रिया, मोदींचे कार्य याविषयी त्यांना पूर्ण माहिती आहे आणि त्यांचे स्वतःचे याबाबतचे विचारही स्पष्ट आहेत. मोदींच्या भाषणातील त्यांना आवडलेली पहिली बाब म्हणजे, मोदींनी ट्रम्प यांना ओळख करून देताना प्रेक्षकांकडे हात दाखवून सांगितले की," ही माझी फॅमिली आहे". दुसरी बाब म्हणजे, हौडी चे उत्तर देताना, "सारे काही छान आहे !" हे सांगताना मोदींनी केलेला भारतातील विविध 10 भाषांचा वापर !. मोदी प्रत्येक भाषेतून बोलत होते, त्या त्या वेळी, त्या-त्या राज्यातील भारतीय अत्यंत आनंदाने प्रतिसाद देत होते. सारी राज्ये, त्यांची अस्मिता सांभाळत, एक देश म्हणून, परदेशात एकत्रित झाली होती. 
 
स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन प्रेक्षक करीत होते. "शिस्त पाळा "या सूचनांच्या एका बाबतीत मात्र प्रेक्षक उल्लंघन करत होते. कॅमेरा सर्व बाजूने फिरत असताना ते बसलेल्या भागावर कॅमेरा आला आणि त्याचे चित्रण भल्या मोठ्या स्क्रीनवर दिसू लागले की, अतिउत्साहाच्या भरात तिथले प्रेक्षक उठून उभे राहत होते. हात हलवत होते. जल्लोष करत होते. आपल्या देशातील आपल्या नातेवाईकांनी पहावे यासाठीचा त्यांचा हा उत्साह होता, पण यामुळेच सार्‍या वातावरणात जिवंतपणा आला होता, आणि सातासमुद्रापलीकडे जाऊन माय देशाशी नाते जोडले जात होते. हे सारे, स्वयंसेवकही आनंदाने सहन करत होते. 
 
प्रत्यक्ष कार्यक्रमापूर्वी तीन महिने अविरत कार्यमग्न असणाऱ्या या स्वयंसेवकांत, गुजराथी, मराठी, पंजाबी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतातील, सर्व राज्यातील भारतीय होते. सर्व टीम, राज्यवार नसून मिक्स होत्या हेही महत्त्वाचे. माझ्या देशाच्या पंतप्रधानांचा कार्यक्रम, या नात्याने सारे एकत्र आले होते ...पाकिस्तानवाद्यांचा कार्यक्रम न होऊ देण्याचा हेतू सफल होऊ नये, यासाठी झटणारे ते अस्सल भारतीय होते. पडद्यामागच्या या साऱ्यांना अभिवादन.!  
 
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वयंसेवक, कलाकार, आणि स्टेडियम कर्मचारी यांच्या मदतीने ह्युस्टन मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या, 'टेक्सास इंडिया फोरम' चे एकही बॅनर स्टेजवर किंवा जवळपास नव्हते. 
बॅनर बाजी नाही?..... कमाल आहे?....
Whatsup वरुन साभार
लेखक : प्रमोद टेमघरे, पुणे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात महाआघाडीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार शरद पवार म्हणाले-

Donald Trump: डोनाल्डट्रम्प यांनी सात स्विंग राज्य जिंकून इतिहास रचला

पाकिस्तान दौऱ्यासाठी बीसीसीआयला भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही?

Maharashtra Assembly Election 2024: व्होट जिहाद'चा 'व्होट धर्मयुद्ध'ने मुकाबला करावा फडणवीस म्हणाले

Maharashtra Live News Today in Marathi व्होट जिहाद'चा 'व्होट धर्मयुद्ध'ने मुकाबला करावा फडणवीस म्हणाले

पुढील लेख
Show comments