मोदी सरकारने चार वर्षांत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाचा वापर करत सर्व प्रकारच्या जाहिरातींवर एकूण ४ हजार ३४३ कोटी २६ लाख रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊट रिच ऍण्ड कम्युनिकेशन विभागाने माहिती अधिकाराखाली दिली आहे.
मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर होत असलेल्या उधळपट्टीबाबत चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर सरकारने या खर्चात २५ टक्क्यांची कपात करत ३०८ कोटी रुपये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी खर्च केल्याचे समोर आले आहे. १ जून २०१४ पासून ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत ४२४.८५ कोटी रुपये प्रिंट मीडिया, ४४८.९७ कोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ७९.७२ कोटी प्रचारावर खर्च करण्यात आला. २०१६-१७ या आर्थिक वर्षात प्रिंट मीडियावर ५१०.६९ कोटी, इलेक्ट्रॉनिक मीडियावर ५४१.९९ कोटी तर ११८.४३ कोटी रुपये प्रचारावर करण्यात आले. १ एप्रिल २०१७ पासून ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत ३३३.२३ कोटी रुपये प्रिंट मीडियावर तर १ एप्रिल २०१७ पासून ३१ मार्च २०१८ या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडियावर ४७५.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर प्रचारावर १ एप्रिल २०१७ पासून ३१ जानेवारी २०१८ पर्यंत खर्च करण्यात आले आहेत.
सडकून टीका झाल्यानतंर मोदी सरकारने २०१७-१८ या आर्थिक वर्षात खर्चात कपात केली. २०१६-१७ या वर्षात एकूण १२६३.१७ कोटी खर्च करण्यात आले. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ९५५.४६ कोटी खर्च केली. ३०८ कोटी कमी खर्च करत जवळपास २५ टक्क्यांची कपात केली.