Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गझल दरम्यान जगजीत सिंग जोक्स का सांगत?

गझल दरम्यान जगजीत सिंग जोक्स का सांगत?
, बुधवार, 4 डिसेंबर 2019 (14:58 IST)
रेहान फजल
जालंधरमधील डीएव्ही कॉलेज त्यावेळी जालंधर टाऊनशिपच्या बाहेर होतं. या कॉलेजचं होस्टेल कॉलेजच्या समोरच्या रस्त्यावर होतं.
 
जगजीत सिंग या होस्टेलमध्ये राहत असत. जगजीत सिंग पहाटे 5 वाजता उठून 2 तास रियाज करायचे. त्यामुळं इतर मुलं त्यांच्या रूमच्या जवळपास राहणं टाळत असत.
 
ते स्वतः ही झोपत नसत आणि इतरांनाही झोपू देत नसत.
 
ऑल इंडिया रेडिओनं त्यांना उपशास्त्रीय गायनात नापास केलं होतं, तर शास्त्रीय गायनात बी ग्रेडचे गायक म्हणून दर्जा दिला होता, हे फार कमी जणांना माहीत आहे.
 
प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आणि जगजीत सिंग आपापल्या कॉलेजकडून बेंगलुरू इथे झालेल्या एका अंतरराज्य युवा महोत्सवात सहभागी झाले होते.
 
जगजीत सिंग यांच्यावर पुस्तक लिहिणारे सत्या सरन यांनी घई यांचा संदर्भ देत ही आठवण सांगितली आहे.
webdunia
"घई यांना हा दिवस चांगलाच लक्षात आहे. ते म्हणतात, रात्री 11 वाजता जगजीतचा नंबर आला. निवेदकानं पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थी शास्त्रीय गायन गाणार, अशी घोषणा करताच उपस्थित हसू लागले. त्यांच्या दृष्टीनं पंजाब भांगडासाठी प्रसिद्ध होतं."
 
ते जेव्हा स्टेजवर आले, तेव्हा लोक शिट्या वाजवू लागले. जगजीत फ्लॉप होतो की काय असं घईंच्या मनात आलं होतं. त्या कोलाहलात ते गाऊ लागले. डोळे बंद करून त्यांनी आलाप सुरू केला.
 
30 सेकंदांनंतर त्यांनी गायला सुरुवात केली. हळूहळू जादूच झाली. उपस्थित श्रोते शास्त्रीय गायनाचे दर्दी होते. थोड्याच वेळात सभागृहात टाळ्या वाजू लागल्या. थांबून थांबून वाजणाऱ्या टाळ्यांनी नंतर सभागृहच डोक्यावर घेतलं.
 
"जेव्हा त्यांनी गायन थांबवलं तेव्हा टाळ्यांचा पाऊस पडत होता. इथे जगजीत सिंग यांना पहिला पुरस्कार मिळाला," असं घई म्हणाले.
 
1965 ला जगजीत सिंह मुंबईत आले. तेव्हा त्यांची ओळख त्यावेळची उद्योन्मुख गायिका चित्रा सिंग यांच्याशी झाली.
 
चित्रा सिंग म्हणतात, "जेव्हा मी पहिल्यांदा जगजीत सिंगना बाल्कनीत पाहिलं, तेव्हा त्यांनी टाईट पॅंट परिधान केली होती. त्यामुळं त्यांना चालताना अडचण होत होती."
 
"ते माझ्या शेजारी गाण्यासाठी आले होते. माझे शेजारी म्हणाले होते, काय सुंदर गातात ते! काय सुरेख आवाज मिळाला आहे!," चित्रा सांगतात.
 
त्या म्हणतात, "जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला त्यांचा आवाज आवडला नाही. एका मिनिटांतच मी टेप बंद करण्यास सांगितलं."
webdunia
2 वर्षांनंतर जगजीत आणि चित्रा योगायोगानं एका स्टुडिओत गाणं रेकॉर्ड करण्यासाठी आले होते.
 
चित्रा म्हणतात, "रेकॉर्डिंगनंतर मी जगजीतना लिफ्ट दिली. मला घरी सोडून माझा ड्रायव्हर तुम्हाला घरी सोडेल असं मी त्यांना सांगितलं."
 
आणि मी त्यांच्या गायनाची वेडी झाले
"जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा मी त्यांना चहासाठी बोलवलं. मी किचनमध्ये चहा बनवत होते. त्यावेळी बाहेरच्या खोलीतून मी हार्मोनियमचा आवाज ऐकला. जगजीत गात होते. सारा आसमंत भारून गेला होता. तेव्हापासून मी त्यांच्या गायनाची वेडी झाली." चित्रा सांगतात.
 
हळूहळू चित्रासमवेत त्यांची मैत्री वाढत गेली आणि त्यांनी एकत्र गायन सुरू केलं.
 
चित्रासाठी जगजीत सिंग कठोर शिक्षकही होते. द्वंद्व गीत गाताना चित्राची काही चूक झाली तर त्यांना चालत नसे.
 
"माझा आवाज बासरीसारखा आणि उंच स्वरांचा होता. तर त्यांचा आवाज धीरगंभीर होता. त्यांनी गाण्याचं उत्तम प्रशिक्षण घेतलं होतं. ते एखाद गाणे 40-45 मिनिटही लांबवू शकत होते," त्या म्हणाल्या.
 
मला मात्र हे जमत नव्हतं. त्यांचा गाताना बंधनं आवडत नसत, असं त्या सांगतात.
 
जगजीत सिंग यांची देशाला ओळख झाली ती 'द अनफरगेटेबल'मुळं.
 
जगजीत सिंग यांचे लहान भाऊ करतार सिंग म्हणतात, "मधूर संगीत आणि गीतांची उत्तम निवड, हे त्यांच्या यशाचं कारण ठरलं."
webdunia
गझलला दिला नवा आयाम
ते म्हणतात, "त्यांच्या पूर्वी गझलचा अंदाज वेगळा आणि शास्त्रीय होता. संगीतसाज म्हणून तबल्याच्या जोडीनं हार्मोनियम आणि सारंगीचा वापर व्हायचा. पण जगजीत सिंग यांनी पाश्चात्य वाद्य आणि स्टिरिओफोनिक रेकॉर्डिंगचा वापर करत गझलला काळानरूप बनवलं."
 
1979 ला त्यांचं 'कम अलाईव्ह' हे रेकॉर्डिंग आलं. यात बऱ्याच बाबी नव्या होत्या. संगीत रजनीचं लाईव्ह रेकॉर्डिंग, गझल ऐकवत असतानाच जगजीत यांची श्रोत्यांशी चर्चा आणि विनोदाची फोडणी असं बरंच काही यात होतं.
 
मैफलीत जगजीत सिंग विनोद का सांगायचे?
करतार सिंग सांगतात "मी त्यांना विचारलं होतं तुम्ही गझल सुरू असताना मधूनमधून विनोद का करता? त्यांचं उत्तर होतं, श्रोत्यांशी कनेक्ट करण्यासाठी ते असं करतात."
 
"फक्त गायनानं श्रोते कनेक्ट होणार नाहीत. जड गझल ऐकल्यानंतर श्रोत्यांना पुन्हा आधीच्या मूडमध्ये आणता येणं आवश्यक असतं. श्रोत्यांना सोबत घेऊन जाण्याची गरज त्यांनी फार लवकर ओळखली होती." असं ते सांगतात.
 
चित्रा सांगतात, "संगीतसाथ करणाऱ्यांना थोडी उसंत मिळावी यासाठी जगजीत सिंग मैफलीमध्ये विनोदी किस्से ऐकवत असत."
 
'कम अलाईव्ह'चं रेकॉर्डिंग स्टुडिओत करण्यात आलं होतं. काल्पनिक संगीतरजनी आणि श्रोत्यांच्या काल्पनिक रूपातील प्रतिक्रिया यांच्या सहाय्यानं कम अलाईव्हमध्ये श्रोत्यांसाठी लाईव्ह अनुभव देण्यात आला होता. अर्थात हे फार कमी लोकांना माहीत होतं.
 
जगजीत यांचं नाव गाजलं होत ते गुलजार यांच्या 'मिर्जा गालिब'मुळं.
 
अर्थात जगजीत सिंग यांच्यासाठी हे मोठ आव्हान होतं. तलत मेहमूद, लता मंगेशकर, बेगम अख्तर, मेहंदी हसन, सुरैयापर्यंत सर्वांनी गालिब गायला आहे. पुन्हा गालिबला या सर्वांपेक्षा वेगळ्याप्रकारे सादर करणं सोपं नव्हतं. पण जगजीत सिंग यांनी इतिहास रचला.
 
गुलजार आणि जगजीत यांच्यातील मतभेद
 
सत्या सरन म्हणतात, "गुलजार आणि जगजीत दोन्ही दिग्गजच आणि प्रतिभासंपन्न. दोघांचा जसा ताळमेळ होता तशी स्पर्धाही होती."
 
"गुलजार म्हणतात की त्यांचे आणि जगजीत यांचे तीव्र मतभेद होते. जी वाद्यं गालिबच्या काळात नव्हती ती वापरू नयेत, असं मी त्यांना सांगत होतो. तर जगजीतचं मत होतं की तसं केलं तर संगीत नग्न वाटेल. त्यांनी प्रत्यक्षात तसे शब्द वापरले होते. अर्थात गुलजारने यावर कोणतीही तडजोड केली नाही." अशी आठवण सरन यांनी सांगितली आहे.
webdunia
1999 ला जेव्हा जगजीत पाकिस्तानला गेले होते तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या घरीही गेले होते. त्यावेळी दोघांनी पंजाबी गाणी गायली आणि मुशर्रफ यांनी तबलाही वाजवला होता.
 
भारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग सुद्धा जगजीत यांचे चाहते आहेत.
 
त्यांनी जगजीत आणि चित्रा यांना घरी बोलावलं होतं. आपलं कुटुंब फक्त त्यांचंच संगीत ऐकतं, असं त्यांनी मान्य केलं होतं.
 
करतार सिंग सांगतात "एकदा जगजीत सिंग इस्लामाबादवरून दिल्लीला येत असताना विमानातील कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक विमान अडीच तास हवेत ठेवलं होतं."
 
"आपल्या लाडक्या कलाकाराचा जास्त काळ सहवास लाभावा म्हणून त्यांनी असं केलं होत."
 
आपल्यासोबत संगीतसाथ करणाऱ्या कलाकारांची ते विशेष काळजी घेत असत. त्यांचा सन्मान राखला जावा, याबद्दल ते फार दक्ष असत.
 
सहकलाकारांची काळजी
सत्या सरन सांगतात, "विदेश दौऱ्यावर असताना रेकॉर्डिस्ट दमन सूद यांच्यासाठी त्यांनी बेड टी बनवला होता. तसंच त्यांच्या सूटला इस्त्रीही केली होती. सूद यांनी स्वतःच ही माहिती दिली होती."
 
जगजीत सिंग यांचं मत असं होतं की दर दोन वर्षांनी एक अल्बम बनवला पाहिजे कारण चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करायला लावली पाहिजे, असं त्यांचं मत होतं.
 
जगजीत सिंग यांना घोड्यांच्या रेसचा शौक होता. एकदा रेसमध्ये त्यांचा घोडा अचानक पुढे गेला. त्यावेळी त्यांचा आनंद गगनात पोहचला. उत्साहाच्या भरात ते जोरजोरात ओरडू लागले.
 
पण दुसऱ्या दिवशी त्यांचा आवाज बसला. पुढे त्यांचा आवाज गाण्यायोग्य होण्यासाठी चार महिने लागले होते.
 
दमन सूद म्हणतात, "त्यांच्या सिगरेटच्या व्यसनामुळं माझा त्यांच्याशी नेहमी वाद होत असे. गुलजार आणि तलत मेहमूद यांची उदाहरणं देऊन ते मला सांगत की सिगरेटमुळं त्यांच्या आवाजाला एक खोली आली आहे."
 
पहिल्यांदा हृदयविकारचा झटका आल्यानंतर त्यांना सिगरेट आणि इतर काही सवयी बंद कराव्या लागल्या होत्या, असं ते सांगतात.
 
घसा गरम ठेवण्यासाठी ते स्टीलच्या ग्लासमधून थोडीथोडी रम पीत असत. ही सवयही त्यांना सोडावी लागली होती.
 
जावेद अख्तर यांनी एकदा म्हटलं होतं की, "जगजीत सिंग भारतीय उपखंडातील गझल गायनाचे शेवटचे स्तंभ आहेत. त्यांच्या आवाजात एक प्रकारची 'चैन' आहे." जावेद यांनी अमिताभ बच्चन यांच्या घरी पहिल्यांदा त्यांना ऐकलं होतं.
 
त्यावेळची नज्म होती 'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी...'.
 
खरोखरंच 'बात निकली' आणि दूरवर पोहोचली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर