Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लातूर लोकसभा : मातब्बर काँग्रेस नेत्यांच्या मतदारसंघात भाजप हॅटट्रिक साधणार का?

लातूर लोकसभा : मातब्बर काँग्रेस नेत्यांच्या मतदारसंघात भाजप हॅटट्रिक साधणार का?
, शनिवार, 16 मार्च 2024 (14:58 IST)
एकेकाळी विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासारख्या मातब्बर काँग्रेस नेत्यांचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख होती.1977 ला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि लातूर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला.
 
पुढे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी 5 ऑगस्ट 1982 ला स्वतंत्र लातूर जिल्ह्याची निर्मिती केली आणि मागच्या 28 वर्षांमध्ये लातूरने स्वतःची एक स्वतंत्र ओळख बनवली आहे.
शिक्षणातला 'लातूर पॅटर्न' राज्यभर प्रसिद्ध असला तरी दुष्काळात ट्रेनने पाणी आणावा लागलेला जिल्हा म्हणूनही लातूरला ओळखलं जातं.मांजरा नदीच्या खोऱ्यातल्या या जिल्ह्यात पाऊस तसा जेमतेमच पडतो, जवळपास दरवर्षी या जिल्हयावर दुष्काळाचं सावट घोंगावत असतं पण राजकारणाच्या बाबतीत मात्र लातूर हा अत्यंत सुपीक जिल्हा म्हणून ओळखला जातो.
 
लातूरने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री आणि एक मातब्बर केंद्रीय मंत्री दिले आहेत. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात या तीनही मातब्बर नेत्यांना मतदारांनी पराभवाची धूळ देखील चाखायला लावली आहे.त्यामुळे लातूरच्या मतदारांकडे 'राजकीय बॅलन्स' साधण्याचं एक उत्तम कसब आहे.
 
मुख्यमंत्री राहिलेल्या विलासरावांचा, शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा आणि देशाचे गृहमंत्री राहिलेल्या शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव करण्याची किमया लातूरच्या मतदारांनी साधली आहे.
एकेकाळी काँग्रेसला साथ देणाऱ्या या जिल्ह्यात मागच्या दहा वर्षांपासून मात्र काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकलेला नाही.विलासराव देशमुखांच्या मृत्यूनंतर दोन विधानसभा वगळता काँग्रेसला फारसं काहीही करता आलेलं नाही. लातूर आणि शेजारच्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भाजपवासी होण्याचा निर्णय घेतलेला आहे.
 
लातूरचे आमदार आणि माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. पण एका कार्यक्रमात स्वतः अमित देशमुख यांनी मी कुठेही जाणार नसल्याची घोषणा केली आहे.दुसरीकडे भाजपने खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा तिकीट जाहीर केलं आहे.
 
आणीबाणीनंतर तयार झाला लातूर लोकसभा मतदारसंघ
आणीबाणीनंतरची निवडणूक ही लातूर लोकसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक होती. संपूर्ण देशात इंदिरा गांधींवर असलेल्या नाराजीमुळे काँग्रेसची पीछेहाट झाली होती, लातूरही त्याला अपवाद ठरलं नाही. लातूरच्या मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते उद्धवराव पाटील यांना खासदार म्हणून निवडून दिलं.
 
त्या निवडणुकीत भाई उद्धवराव पाटील यांनी काँग्रेसच्या जे. पी. पाटलांचा 80,500 मतांनी पराभव केला. त्यानंतरच्या सात निवडणुकांमध्ये काँग्रेसने लातूरवर एकहाती वर्चस्व राखलं.त्यावेळी काँग्रेसवर चांगली पकड असणाऱ्या शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी चाकूरच्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारख्या सुशिक्षित आणि नवख्या उमेदवाराला तिकीट दिलं आणि 1980 ते 1999 याकाळात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर सातवेळा खासदार म्हणून निवडून आले.याकाळात चाकूरकरांच्या विरोधात भाजप आणि इतर पक्षांनी चांगले उमेदवार तर दिले होते पण लातूर लोकसभा मतदारसंघाच्या जातीय समीकरणांमुळे शिवराज पाटील चाकूरकरांना अगदी सहज खासदार होता आलं.सातवेळा खासदार बनलेल्या शिवराज पाटील चाकूरकरांच्या निवडणुकांचे किस्से आजही लातूरमध्ये मोठ्या चवीने सांगितले जातात.
 
अटलबिहारी वाजपेयींनी कौतुक केलं होतं, तेंव्हा...
शिवराज पाटील चाकूरकर यांनी लढलेल्या सातपैकी एका निवडणुकीत भाजपने गोपाळराव पाटील यांना उमेदवारी दिली होती.त्याकाळी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी लातूरमध्ये गोपाळरावांच्या प्रचारार्थ एक सभा घेतली होती.
या सभेत बोलताना वाजपेयी म्हणाले की, "शिवराज पाटील आदमी तो अच्छे है लेकिन उनकी पार्टी गलत है." आता विरोधी पक्षातला राष्ट्रीय नेताच शिवराज पाटलांचं कौतुक करतो म्हणल्यावर मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि भाजपच्या गोपाळराव पाटील यांचा पराभव झाला.
लातूर लोकसभा मतदारसंघाची संरचना शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विजयासाठी कारणीभूत होती. त्याकाळी लातूरमध्ये समाविष्ट असलेल्या औसा, उमरगा आणि निलंगा या तीन तालुक्यांमध्ये लिंगायत मतांचं प्राबल्य होतं.या मतांच्या जोरावर शिवराज पाटील चाकूरकर आरामात निवडून येत होते.
 
2004 च्या निवडणुकीत मात्र हे गणित बदललं. भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी केंद्रीय मंत्री राहिलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा तीस हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. त्यावेळच्या निवडणुकीत भाजपने मराठा आणि ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवलं होतं.
 
2008 नंतर हा मतदारसंघ राखीव झाला
2004 पर्यंत लातूर हा सर्वसाधारण मतदारसंघ होता. 2008च्या पुनर्रचनेत लातूर मतदारसंघ राखीव झाला.
2009ला लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा या विधानसभा मतदारसंघाचा लातूर लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला.
औसा आणि उमरगा या विधानसभा उस्मानाबाद लोकसभेला जोडण्यात आल्या.सध्या लातूर शहर आणि ग्रामीण वगळता एकही मतदारसंघ काँग्रेसकडे नाही.
 
संभाजी पाटील निलंगेकर हे निलंग्याचे आमदार आहेत. उदगीर आणि अहमदपूर हे दोन्ही मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तर नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे अपक्ष आहेत.2009 च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जयवंतराव आवळे यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वतः विलासराव देशमुखांनी उचलली होती.
 
लातूरकरांनी 2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपच्या डॉ. सुनील गायकवाड यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं.2019 च्या निवडणुकीत भाजपने सुनील गायकवाड यांचं तिकीट कापून जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या सुधाकर शृंगारे यांना तिकीट दिलं आणि शृंगारे यांनी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांचा 89 हजार 111 मतांनी पराभव केला.
 
मागच्या चार वर्षांत काय घडलं?
लातूरमध्ये भाजपचा एकच आमदार असला तरी मागच्या चार वर्षांमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपने त्यांची ताकद वाढवली आहे.
 
भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी खासदार म्हणून लातूरचं नेतृत्व केलं आहे. भाजपने याही निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर केलीय.
 
निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औश्याचे आमदार अभिमन्यू पवार आणि विधानपरिषदेचे आमदार रमेश कराड यांनी मागच्या चार वर्षांमध्ये भाजपचा विस्तार केला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी लातूर शहर आणि लातूर ग्रामीणचे आमदार म्हणून काम केलेलं आहे.
 
या दोन विधानसभा वगळता काँग्रेसची फारशी वाढ झालेली नाही.
 
अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी लातूरच्या शेजारी असणाऱ्या नांदेड आणि उस्मानाबादमधील काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला त्यांचा खासदार निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे.
 
काँग्रेसने 2014 ला दत्तात्रय बनसोडे आणि 2019 ला मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली होती. 2024 च्या निवडणुकीत हे दोघेही उमेदवारीच्या शर्यतीत दिसत नाहीयेत.
 
आता महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार? त्या उमेदवाराला पारंपरिक काँग्रेस नेत्यांची कशी साथ लाभणार आणि अंतर्गत गटबाजीची चर्चा असलेल्या पण लोकसभेला मोदींच्या झेंड्याखाली गपगुमान एकत्र येणाऱ्या भाजपच्या नेत्यांना मतदार कशी साद देणार यावर या निवडणुकीत लातूरचा खासदार कोण होणार हे ठरेल.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश