पिवळ्या धमक रंगाने न्हालेली मार्तंडाची जेजुरी सोन्याची भासू लागते. भाविक लोक हळद-बुक्का उधळतात. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा गजर करतात. हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो भक्तीचे श्रद्धास्थान आहे. हे स्थळ पुरंदर तालुक्यात आहे.
‘जेजुरी’ खंडोबा देवस्थानाकडील डोंगर काही वर्षातच सुजलाम सुफलाम् होणार आहे. खंडोबाच्या अस्तित्वाने पुनीत झालेला हा परिसर वृक्षवल्लीनी फुलून येणार आहे. तसा हा डोंगर कित्येक वर्षे उजाड होता, पण आता वनविभागाने यात लक्ष घातले आहे.
जेजुरीत आता हिरवळ दिसू लागली आहे. या ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे. हा भाग खडकाळ आहे. उघडा डोंगर-उताराचा भूभाग अशी सर्व परिस्थिती प्रतिकूलच म्हणावी लागेल. आता पुण्यातील सासवड वनक्षेत्रातील प्रादेशिक वनविभागाच्या अधिकार्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे.
जेजुरीच डोंगरावर हिरवाईची शाल पांघराची, या एकच ध्येयाने हे सेवक कामाला लागले. थोड्याचं दिवसात 7500 वृक्षांची पाळेमुळे या डोंगराच्या कुशीत घट्ट रुतली. प्रत्यक्ष या डोंगरावर 20 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट या खात्याने आपल्या नजरेसमोर ठेवले आहे. विशेष म्हणजे निसर्गाशी असलेल्या आत्मितेतून काम सुरू झाले. गेल्या एक वर्षापासून या डोंगरात निसर्ग फुलण्यासाठी वनविभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसे हे काम अवघड असल्यामुळे अनेक वनकर्मचार्यांचे हात या कार्यात उपयोगी पडले. जेजुरीच्या डोंगरावर आता हिरवा अंकुर फुलू लागला आहे. आतापर्यंत उद्दिष्टांपैकी साडेसहा हजार वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. त्यामुळे जेजुरीत निसर्गरम्य वातावरण भाविकांना आणि पर्यटकांना अनुभवाला मिळणार आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य डोंगरउतारामुळे वाहून जाणारी माती, डोंगरमाथा असूनही न अडणारे ढग, कमी पाऊस अशी सर्वत्र परिस्थिती प्रतिकूल होती. प्रथम या खात्याने दगड मातीचे भक्कम आणि वळणदार बंधारे बांधले. त्यामुळे वाहून जाणार्या मातीला आधार मिळाला. त्यानंतर वृक्षवल्लींची लागवड करण्यात आली. उंच रोपांची लागवड करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. शिवाय हे वृक्ष जगविण्यासाठी कातळावर ड्रिल, ब्लास्टिंग करून खड्डे बांधले गेले. पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनावर भर देण्यात आला. डोंगरावर फुलवण्यासाठी वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, गुलमोहोर अशा वृक्षांची निवड करण्यात आली.