Shri Kanakaditya Temple सूर्यदेवाची पूजा भारतात अनादी काळापासून प्रचलित आहे. भारतात अनेक सूर्य मंदिरे आहेत, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कोणार्कचे सूर्य मंदिर (ओडिशातील) आणि मोढेरा सूर्य मंदिर (गुजरात) आणि अनंतनाग (जम्मू आणि काश्मीर) जवळील मार्तंड आहेत. परंतु महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कनकादित्य मंदिराविषयी अनेकांनी ऐकले नसेल. श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे.
मंदिर कधी बांधले गेले याची कोणतीही नोंद नसली तरी स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर 800 वर्षांहून अधिक जुने आहे. मंदिराचे मूळ एका दंतकथेत आहे. 1293 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या 12 सूर्यमूर्ती होत्या जे 12 महिन्याचे प्रतीक होते. हल्ल्याची आगाऊ माहिती मिळाल्यावर तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. येथील परिस्थिती शांत झाल्यावर त्या मूर्ती परत आण्याची सुचना पुजारीने व्यापाऱ्याला केली. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले आणि पुढे जाण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा असावी म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले.
कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिकेच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्य नारायण कनकेला म्हणाले की तू मला येथून घेऊन जा आणि तुझ्या गावात मंदिर बांधून त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली आणि त्यांच्या मदतीने सूर्य मूर्ती गावात आणून त्याची प्रतिष्ठा केली. त्या कनकाबाई मुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हनून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले.
मंदिर स्थापत्य
मंदिर कोकणी कौलारू स्थापत्य शैलीचे असून मंदिरात लाकडी खांबावर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देव-देवता कोरलेले आढळतात. यामध्ये प्रमुख देव आणि पौराणिक प्रसंग चित्रीत केलेले आहे. मंदिरात कनकादित्याची मूर्ती काळ्या पाषाणातील आणि अत्यंत सुभक आणि देखणी आहे.
रथसप्तमी उत्सव
कनकादित्य मंदिरात माघ शु.सप्तमी ते माघ शु.एकादशी असे पाच दिवस रथसप्तमी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सर्वात आकर्षण म्हणजे कनकादित्य आणि कालिकादेवी यांचा लग्नसोहळा. कालिकादेवी ही कशेळी गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या काळीकावाडीची देवी ज्यांना पाच बहिणी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, भगवतीदेवी आणि जाखादेवी आहेत. कालिकादेवी ही या सर्व बहिणीत धाकटी ज्यांना जाखादेवीसाठी वर शोधत असताना कनकादित्यला पाहताचक्षणी त्यांच्या प्रेमात पडल्या. त्याचं लग्न ठरलं पण यामुळे जाखादेवीला आपल्या धाकट्या बहिणीचा खूप राग आला आणि त्यांनी तिचं तोंड न बघण्याची प्रतिज्ञा घेतली आणि लग्नालाही उपस्थित नव्हती.
या परंपरेनुसार रथसप्तमी उत्सवात लग्नसोहळावेळी मोठी बहिण महाकालीला मानाचे सरंजाम पाठवले जाते. भगवतीदेवी पाठराखन म्हणून येते. कालिकादेवीची पालखी ज्यावेळी कशेळीकडे कनकादित्य मंदिराकडे जात असते त्यावेळी वाटेत जाखादेवीचे मंदिर लागते. पण मंदिरासमोरून पालखी जात असताना जाखादेवी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तोंड न बघण्याची प्रतिज्ञा ही प्रथा आजही पाळली जाते.
ह्या लग्न सोहळ्याचं अजून एक खास वैशिष्ट म्हणजे हुंडा जो मुलीकडील देत नसून वर पक्ष म्हणजे कनकादित्याकडच्या मंडळींना वधुकडच्या म्हणजे कालिकादेवीच्या मंडळींना हुंडा म्हणून शिधा द्यायचा असतो.
कशेळी गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस 40 किलोमीटर तर पावस पासून दक्षिणेस 24 किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस 32 किलोमीटर अंतरावर वसले आहे.
रत्नागिरी श्री कनकादित्य मंदिराच्या वेळा:
सकाळी 5.00 ते दुपारी 12.00
संध्याकाळी: 4.00 PM ते 8.00 PM
पूर्ण पत्ता-
सूर्य मंदिर रोड, कशेळी
राजापुर तालुका, रत्नागिरी जिल्हा