Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शिवसेना आणि भाजपा युतीचा वाद शिगेला, राष्ट्रपती राजवटीची धमकी देवू नका

शिवसेना आणि भाजपा युतीचा वाद शिगेला, राष्ट्रपती राजवटीची धमकी देवू नका
, शनिवार, 2 नोव्हेंबर 2019 (15:32 IST)
राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्या सत्ते स्थापनेचा तिढा अजून काही संपण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे अजूनही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजपने मागच्या वेळी काही दिवसात कोणाची वाट न पाहता सरकार स्थापन केले होते. मात्र येळी संख्या बळ कमी असल्याने ते शक्य झाले नाही. आता शिवसेना मुख्यमंत्री पदावर आपला हक्क सांगत असून, रोज भाजपवर दबाव वाढवताना दिसत आहे. त्यामुळे दोघे पक्षात जोरदार दबाव तंत्र सुरु झाला आहे. आता शिवसेनेच्या मुखपत्र असलेला सामना मधून भाजपवर जोरदार टीका केली असून, राष्ट्रपती राजवटीची धमकी आम्हाला देवू नका असे स्पष्ट केले आहे.
 
काय म्हणते आहे शिवसेना वाचा पुढील प्रमाणे  
 
राष्ट्रपती राजवटीची सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली धमकी लोकशाहीविरोधी तसेच घटनाबाह्य आहे. हा महाराष्ट्राचा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे. सत्तेचा अमरपट्टा आपण जन्मतःच घेऊन आलो आहोत व बहुमताचा आकडा असो अगर नसो दुसर्‍या कोणी सत्ता स्थापनच करू नये या मग्रुरीचा महाराष्ट्रात पराभव झाला आहे. तेच लोक राष्ट्रपती राजवट लावण्याचे इशारे देत आहेत. राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देणार्‍यांनी आधी सरकार स्थापनेचा दावा तरी करावा! मग पुढचे पुढे. राष्ट्रपती ही घटनेतील सर्वोच्च संस्था आहे. तेथे व्यक्ती नाही तर देश आहे. देश कुणाच्या खिशात नाही.  
 
महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे एक विनोदी शोभायात्राच बनली आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राची अशी विनोदी शोभायात्रा झाली असेल तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? सध्याचा गोंधळ म्हणजे ‘शिवशाही’ नाही. राज्यात सरकार नाहीच, पण मावळत्या सरकारातील विझलेले काजवे रोज नवे विनोद घडवून महाराष्ट्रास अडचणीत आणू पाहत आहेत. धमक्या, तपास यंत्रणांची जोरजबरदस्ती याचा काही एक परिणाम न झाल्याने मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या धमकीचा पाद्रा पावटा सोडला आहे. ‘‘7 नोव्हेंबरपर्यंत सत्तेचा तिढा न सुटल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल.’’ श्री. मुनगंटीवार व त्यांच्या पक्षाच्या मनात नेमके कोणते विष उसळते आहे ते या वक्तव्यावरून दिसते. कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास कमी पडला की हे व्हायचेच किंवा कायदा अथवा घटनेची गळचेपी करून हवे ते साध्य करायचे ही भूमिकासुद्धा त्यामागे असू शकते. एक तर राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील ‘भाजप’ कार्यालयातच पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात
 
राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी
 
लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का? राष्ट्रपती राजवटीची सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली धमकी लोकशाहीविरोधी तसेच घटनाबाह्य आहे. हा महाराष्ट्राचा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे. ‘संविधान’ नामक घरात राहणार्‍या रामदास आठवले यांनी डॉ. आंबेडकरांच्या घटनेचा असा अपमान सहन करू नये. प्रश्न इतकाच आहे की महाराष्ट्रात सरकार का बनत नाही याची कारणे कोणी द्यायची? भाजपचाच मुख्यमंत्री पुनः पुन्हा होईल असे ज्यांनी जाहीर केले त्यांनी सरकार स्थापनेचा दावा पेश केला नसेल तर त्यास काय महाराष्ट्राच्या जनतेस जबाबदार धरायचे? आणि सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे. हिंदूंनी सरळ स्वतःची सुंता करून घ्यावी, धर्मांतरे करावीत, नाही तर देव, धर्म, प्रजा बुडवून ‘मोगलाई’चा वरवंटा फिरवू असा जुलूम करणार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्रात शिवरायांची तलवार तळपली होती. ही तलवार तळपली व रक्ताने भिजली ती स्वाभिमानासाठी. हा इतिहास ‘पुन्हा शिवशाही’ची घोषणा करणार्‍यांनी विसरावा? त्यामुळे महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोहित पवारांची फेसबुक पोस्ट 30 जेसीबीवरुन गुलालाच्या उधळणीवर