जळगाव: “मी सत्तेत असताना आणि विरोधी पक्षात असतानाही पक्षाची कामे केली. मी अत्यंत प्रमाणिकपणे पक्षासाठी काम केले. मला अनेक प्रलोभने आली. पण मी कधीही पक्षाची साथ सोडली नाही. पक्षाशी प्रामाणिक राहणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केली आहे,” अशी खंत व्यक्त करत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षाचा एबी फॉर्म नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे साहजिकच खडसे यांच्या बडखोरीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यांनी, आज मुहूर्त चांगला होता त्यामुळे अर्ज भरल्याचे पत्रकारांना सांगितले.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकासाठी उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर केली. पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासहित अनेक विद्यमान आमदार तसेच नव्याने पक्षात आलेल्यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश नाही आहे.
दरम्यान एकनाथ खडसे यांनी यादीत नाव नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळेच एकनाथ खडसे बंडखोरीच्या तयारीत तर नाहीत ना अशी चर्चा सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बोलताना एकनाथ खडसे यांनी आणखी एक यादी येणार असून त्यामध्ये नाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगितले.