सध्या भाजप व शिवसेनेत नेत्यांचे इनकमिंग जोरात सुरु आहे. त्यात अजून एक आमदाराची भर पडली आहे.
बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरेंनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. शिवतारे मागील दोन टर्म बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेची वाट धरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तरे यांच्या हातात शिवबंधन बांधले आणि भगवा झेंडा दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की शिवसेनेत अजून कोण कोण येणार हे लवकरच सर्वाना समजणार आहे. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार आहे. मी, मुख्यमंत्री आणि अमित शाह लवकरच जागावाटप करणार आहे. चांगले काम करण्यासाठी सहकारी मिळत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करत आहे. शिवसेनेत एक मोठा नेता लवकरच प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा आहे.