आजपर्यंत मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले, अशीही जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली. तसेच विशेष कायदा करुन राम मंदिर बांधण्याची मागणी केली. यावेळी मंचावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई असे अनेक नेते उपस्थित होते.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उद्देशून बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिर, धनगर आरक्षण, महायुतीची कारणं अशा विविध विषयांना हात घातला. तसेच सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करणाऱ्यांवर तोफ डागत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचसोबत ‘शिवसैनिकांच्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. कारण शिवसैनिक ही वाघनखं आहेत. प्रेमाने आलिंगन दिल्यावर पाठीत खंजिर खुपसणाऱ्याचा कोथळा बाहेर काढणारी ही वाघनखं आहेत’, असे त्यांनी ठणकावून सांगत इशारा दिला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवतीर्थावर जमले होते. लाखोंचा हा जनसमूदाय म्हणजे जणू शिवसागरच उसळल्याप्रमाणे भासत होता. पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी साऱ्याचे कान आसूसले होते. उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी सारे शिवतीर्थ दणाणून सोडले होते. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि प्रत्येक विषयावर त्यांनी खणखणीत भाष्य केले.
‘सत्ता तर पाहिजेच. आहे युती केली, कुणाला वाटलं असेल की शिवसेना झुकली असं वाटलं असेल. शिवसेना कधी झुकली नाही, झुकणारही नाही, लाचारही होणार नाही. शिवसेना फक्त शिवप्रभूंसमोर नतमस्तक होईल’, असं खणखणीत शब्दात त्यांनी सांगितले. ‘पण चंद्रकांत पाटील मध्ये म्हणाले होते आमची अडचण समजून घ्या. तुमची अडचण समजून घेतली, आता तुम्ही महाराष्ट्राची अडचण समजून घ्या. आम्ही आहोत तुमच्यासोबत’, असेही ते म्हणाले.
‘आज शस्त्र पूजनाचा दिवस आहे. समोर जे शिवसैनिक बसले आहेत ही माझी तलवार आहे. ही अन्यायाविरुद्ध वार करणारी तलवार आहे. गोरगरीबांचं अन्यायापासून रक्षण करणारी ही माझी ढाल आहे. आणि प्रेमाने आलिंगन दिल्यावर पाठीत खंजिर खुपसणाऱ्याचा कोथळा बाहेर काढणारी ही वाघनखं आहेत. कुणी कुणी कशाचा अनुभव घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वाघ नखाने गुदगुल्या नाही करता येत, वाघनखं ही कोथळा बाहेर काढतात. म्हणून मी सांगतोय की बाबांनो आमच्या शिवसैनिकाच्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका, असं म्हणत त्यांनी दगाफटका करणाऱ्यांना खणखणीत इशारा दिला. चांगला कारभार करण्यासाठी आपणसोबत आलो आहोत. का नाही करायचा चांगला कारभार? शिवसेना – भाजपची युतीमध्ये मधल्याकाळात जे काही चाललं होतं त्यावर बोलताना ते म्हणाले, मी एकूण लोकसभेच्यावेळी विचार केला, जे वातावरण होतं या देशात की कुणाचं सरकार येईल हे सांगता येत नाही. मग कुणाचं सरकार आपल्याला चाललं असतं? शरद पवार पंतप्रधान चालले असते, का मुलायम सिंग चालले असते का चंद्राबाबू चालले असते की मुफ्ती महम्मद, नितीश कुमार आणखी कोण चाललं असतं तुम्हाला. मायावती चालल्या असत्या. म्हणून मी विचार केला की त्यावेळेला अस्थिर लोकसभा आली असती आणि मग आपण काय केलं असतं. मग तेव्हा आपली जी काय ताकद आहे ती नक्कीच मी काँग्रेसच्या मागे कदापी उभी राहू दिली नाही, देणार नाही. त्यालाही कारण आहे. मग आपण भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी युती करायची मग आधीच करून मजबूत सरकार का आणायचं नाही? जे आपण आणलं. करायचं ते उघड उघड करायचं. लपून छपून करायची औलाद शिवसेनेची नाही. करू ते उघड करू. प्रेमही उघड करू आणि वैर सुद्धा आम्ही उघड करू’, असे त्यांनी स्पष्ट केले.