जव्हार-डहाणूपासून ते गोंदियापर्यंतचा आदिवासी पट्टा 'महाशिवरात्री' हा आपला प्रमुख उत्सव मानतात. ते शिवाला डोंगरदेव तर पृथ्वीला पार्वती मानतात. सातपुड्यातील डोंगरदेवाचा जत्रोत्सव म्हणजे आदिवासीचा प्रमुख सण होय. आपल्या लाडक्या डोंगरदेवाला अर्थात शिवशंकराला आपल्या गावाजवळच्या नदीच्या पाण्याची, तळ्यातल्या वा विहिरीतल्या पाण्याची कावड वाहातात. आदिवासी पट्टातील प्रत्येक लहान मोठ्या गावातून 'हर हर महादेव'च्या जयघोषात कावडी निघतात.
''मी सदैव माझी कांता पार्वती हिच्यासह पर्वतात, अरण्यात असेन. तुमचा मी सांभाळ करीन.'' असा वर सार्या आदिवासींना महादेवाने दिला आहे. त्यामुळे आदिवासी बांधव महादेवाला आपले कुळदैवत मानतात. नवा हंगाम ते आपल्या महादेवाच्या चरणी अर्पण करतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी आदिवासी बांधव नवे कपडे घालून जत्रांना जातात. आदिवासींमध्ये महादेवाच्या बाबतीत विविध कथा आढळतात. त्यातून निसर्ग आणि माणूस यांचे अतूट नात्याचे दर्शन घडताना दिसते.
एकदा आपल्या पती परमेश्वराला अर्थात शिवशंकराला पार्वतीने फळे आणायला सांगितले. शिव अरण्यात गेले. शिवाच्या प्रखर तेजाने अरण्यात फळे दिसेनासी झालीत. शिवाने तेव्हा आपला तिसरा डोळा उघडला. संपूर्ण अरण्य प्रकाशात न्हाऊन निघाले. एवढा लख्ख प्रकाश पाहून वाराही घाबरला व त्याने तेथून पळ काढला. झाडे हलायला लागली. फळे पटापट जमिनीवर पडायला लागली. शिवाने नंदीला फळे गोळा करायला सांगितली. नंदीने त्याप्रमाणे फळे पार्वतीला आणून दिलीत.
मात्र पार्वती नंदीला म्हणाली, ''मी शिवाला फळे आणायला सांगितली. तू का आणलीस?'' नंदी म्हणाला, 'मला आज्ञा झाली. मी आणली.'' पार्वतीने विचारले, ''यातली महादेवाने कोणती फळे उचलली?'' नंदी चतुर. तो म्हणाला, ''मला माहित नाही.'' तेवढ्यात महादेव आले. व्याघ्रझोळीतून फळ काढले. पार्वतीच्या हातावर ठेवीत म्हणाले, ''हे घे.'' पार्वती खुलली. ''फळ आणायला एवढा वेळ लागला? यावर शिव हसून म्हणाले, ''फळ मिळायला तप करावा लागतो. झाडांना त्रास न देता, त्यांच्या इच्छेनं फळ हातात पडायला सहनशीलता लागते. तुझ्या तपाचे हे फळ. अरण्याला त्रास न देता तप करायचा नि फळही त्याला विचारून खायचं.'' पार्वती म्हणाली, ''माझं चुकलं. मी फुलं उगाच तोडली.'' शिव म्हणाले, ''यापुढे लक्षात ठेव. पृथ्वीवर आपसूक फुलं पडली ती आपली. झाडावर असलेली ती अरण्याची.'' शिवाने पार्वतीला बेलफळ दिले. उमा बेलफळासह शिवात गुंगली.
या कथेने पर्यावरणाचा संदेश दिला असून झाडांवरली फुले, फांद्या ताणून धसमुसळेपणे तोडायची नाहीत. महाशिवरात्रीच्या दिवशी आदिवासी स्त्रिया डोक्यात फुले खोवत नाहीत. मोकळ्या केसांनी शिवदर्शनास त्या जातात. पांढरी फुले-बेल शिवाला वाहातात. शिव हा त्यांना आपला पालक वाटतो. संरक्षक वाटतो. काही आदिवासी अनवाणी दर्शनास येतात. जत्रेत मुलांना डमरू घेतात. कडेवर पोरांना घेऊन फेर धरून डोंगरदेवाची गाणी गातात.