मकर संक्रांत 14 जानेवारीला असते की 15 जानेवारीला? पूर्वी ती 14 तारखेला असायची मग कधीकधी ती 15 तारखेला का येते?
भारतीय पंचागांमध्ये मकर संक्रात हा एकमेव सण सूर्याच्या संक्रमणाशी निगडीत आहे. मग सूर्यानुसार चालणाऱ्या इंग्रजी (ग्रेगोरियन) कॅलेंडरनुसार त्याची तारीख बदलायला नको. पण ती बदलत आली आहे आणि बदलत राहणार आहे. ज्येष्ठ विज्ञान लेखक मोहन आपटे यांनी 'मला उत्तर हवंय' या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे 21व्या शतकाच्या अंतिम काळात सूर्य 15 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करू लागेल.
पुढे ते लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मकर संक्रांत 8 किंवा 9 जानेवारी या तारखांना येत असावी. (अर्थात तेव्हा भारतात कुणी ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत नसावे, हा भाग निराळा.) याचाच अर्थ संक्रातीच्या दिवशी 1761 साली जेव्हा मराठ्यांचं पानिपत झालं, तेव्हा तारीख 10 किंवा 11 जानेवारी असावी.
मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यावर मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. काही वर्षी 14 जानेवारी रोजी संध्याकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.
सूर्यास्तानंतर ही घटना घडल्यास त्याचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानला जातो. त्यामुळेच त्यावर्षी 15 जानेवारीस मकर संक्रांत साजरी केली जाते, असं खगोल आणि पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात.
खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "अवकाशात स्थिर असं काहीच नसतं. मकर संक्रमणाची तारीख बदलत जाणार. 2080च्या आसपास वसंत संपात (सूर्य विषुववृत्तावर येण्याचा दिवस) आणि भारतीय मेषारंभ (राशिचक्राला सुरुवात होण्याचा दिवस) यांच्यात 25 अंशांचा फरक असेल आणि तेव्हा संक्रांत 15 जानेवारीस येऊ लागेल".
पुढे ती 16 जानेवारीला येईल!
संक्रांत आणि उत्तरायण यांचा संबंध संपला
14 जानेवारीला काय होतं, असा प्रश्न विचारल्यावर कुणीही सहज म्हणेल, 'उत्तरायण सुरू होतं'. महाराष्ट्रात जशी या सुमारास संक्रात साजरी केली जाते, तसं गुजरातमध्ये 'उत्तरायण' साजरं करतात.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे उत्तरायण आणि मकर संक्रांत एकाच दिवशी येणं 1728 वर्षांपूर्वी बंद झालं! उत्तरायण 22 डिसेंबरला होतं. तो सगळ्यांत छोटा दिवस. त्यानंतर दिवस मोठा होत जातो आणि सूर्य उत्तरेकडे कलताना दिसतो.
उत्तरायण आणि मकरसंक्रांत यांच्यामध्ये 22 दिवसांचा फरक पडला असल्यामुळे या दोन्ही दिवसांचा आता संबंध उरलेला नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा फरक आता वाढतच जाणार आहे. हे असं का होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामागे एक मोठी गंमत दडली आहे. पृथ्वी 23.5 अंशांनी कललेली आहे. अशाच अवस्थेमध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असे म्हणतात. हे आपण भूगोलात शिकलो आहोत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीचा अक्ष कलला असल्यामुळेच आपल्याकडे ऋतूंची निर्मिती होते. अतिप्राचीन काळी पृथ्वीवर धूमकेतू आदळल्यामुळे पृथ्वीचा अक्ष कलला असावा, असं जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे संशोधन करणाऱ्या डॉ. करण जानी यांनी बीबीसीला सांगितलं.
हा 23.5 अंशात कललेला अक्षही स्थिर नसून तोसुद्धा गोल फिरत असतो. त्याला एक वर्तुळ पूर्ण करण्यासाठी 26,000 वर्षे लागतात त्याला परांचन गती (प्रोसेशन मोशन) असे म्हणतात. म्हणजे एकाच वेळी पृथ्वी 3 पद्धतींनी फिरतेय. एक - स्वतःभोवती. दोन - सूर्याभोवती. तीन - स्वतःच्याच तिरप्या अक्षाभोवती. या कललेल्या अवस्थेत पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे वर्षातील काही काळ तिचा उत्तरेकडचा भाग सूर्याच्या जवळ येतो तर काही काळ दक्षिणेकडचा भाग सूर्याच्या जवळ येतो. सूर्याच्या बाजूच्या जवळ असणाऱ्या भागावर उन्हाळा तर त्याच्या विरुद्ध बाजूला हिवाळा असतो. 21 किंवा 22 डिसेंबर रोजी पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध सूर्याच्या बाजूला जाणं कमी व्हायला सुरू होतं. त्यानंतर उत्तरायण सुरू होतं.
टिळकांनी केला होता परांचन गतीचा अभ्यास
खगोल आणि पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी टिळकांच्या पंचांगाबद्दलच्या मतांबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं: "टिळकांनी परांचन गतीचा अभ्यास करून 'ओरायन' आणि 'आर्क्टिक होम इन वेदाज' या ग्रंथांमध्ये त्यांनी यांचे उल्लेख केले आहेत.
रघुनाथशास्त्री पटवर्धन यांच्या आग्रहावरून एक पंचांग तयार करण्यात आले होते. त्याला टिळक पंचांग असे नाव देण्यात आले. रत्नागिरीतील काही ब्राह्मणांनी हे पंचांग वापरण्यास सुरुवात केली होती.
ते पुढे म्हणतात, "सध्या भारतात असणाऱ्या इतर पंचांगांना निरीयन पंचांग म्हणतात. ही पंचांगे चित्रा ताऱ्याच्या समोरील 180 अंशावर सूर्य आल्यावर त्या बिंदूपासून नव्या वर्षगणनेची सुरुवात करतात. हा केवळ बिंदू आहे. तेथे कोणताही तारा नाही.
मात्र टिळक पंचांग चित्रा नक्षत्रातील झिटा ताऱ्याला प्रमाण मानून गणना करते. त्यामूळे टिळक पंचांग आणि इतर निरीयन पंचांगांमध्ये थोडा फरक आहे. टिळक पंचांगानुसार सूर्याने 10 जानेवारी रोजीच मकर राशीत प्रवेश केला आहे"