Publish Date: Wed, 23 Sep 2026 (15:45 IST)
Updated Date: Wed, 23 Sep 2026 (15:47 IST)
तीळ हे देशातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. कमी खर्चात आणि कमी पाण्यात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून तीळ लागवडीकडे पाहिले जाते. तीळ लागवडीची संपूर्ण माहिती जाणून घ्या....
१. हवामान आणि जमीन
हवामान: तिळाच्या पिकासाठी उबदार आणि उष्ण हवामान (२५°C ते ३५°C तापमान) योग्य असते.
जमीन: मध्यम ते भारी, उत्तम निचरा होणारी सुपीक जमीन योग्य ठरते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या किंवा पाणथळ जमिनीत तीळ चांगले येत नाही. जमिनीचा सामू (pH) ६.५ ते ७.५ असावा.
२. हंगाम आणि पेरणीची वेळ
खरीप हंगाम: जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा.
उन्हाळी हंगाम: जानेवारीचा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा.
३. सुधारित वाण
खरीप हंगाम: टी.सी. २५, जे.टी. ७, तापी (जे.टी.एल.टी. १०), पद्मा.
उन्हाळी हंगाम: एन.टी.आर. ५८, पी.के.व्ही.एन.टी. ११, श्वेता.
४. बियाणे व बीजप्रक्रिया
बियाण्याचे प्रमाण: प्रति एकरी १ ते १.५ किलो बियाणे लागते.
बीजप्रक्रिया: बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थिराम किंवा ट्रायकोडेर्मा ५ ग्रॅम चोळावे.
५. पेरणीची पद्धत
पेरणीचे अंतर: दोन ओळींत ३० ते ४५ सें.मी. आणि दोन रोपांत १० ते १५ सें.मी. अंतर ठेवावे.
महत्त्वाची टीप: तिळाचे बी खूप लहान असते, त्यामुळे समप्रमाणात पेरणी होण्यासाठी बियाण्यात ३ ते ४ पट बारिक वाळू/रॅक किंवा सुके शेणखत मिसळून पेरणी करावी. बी १ ते २ सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरून नये.
६. खत व पाणी व्यवस्थापन
खत व्यवस्थापन:
जमिनीची मशागत करताना प्रति एकरी २ ते ३ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
रासायनिक खते: पेरणीच्या वेळी प्रति एकरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी पुन्हा १० किलो नत्र द्यावे.
पाणी व्यवस्थापन:
खरीप: पावसाचा ताण पडल्यास गरज पडल्यास पाणी द्यावे.
उन्हाळी: जमिनीच्या आवश्यकतेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाळ्या द्याव्यात. फुलोरा येताना आणि गाठी (बोंडे) भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
७. अंतरमशागत आणि काढणी
विरळणी : पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी विरळणी करून एका जागी एकच सशक्त रोप ठेवावे.
काढणी: पाने आणि बोंडे पिवळी पडू लागताच आणि खालील पानांची गळत सुरू झाल्यावर पीक कापणीस तयार होते. झाडे मुळासकट उपटून किंवा कापून त्यांच्या पेंड्या बांधून उन्हात सुकवाव्यात व नंतर मळणी करावी.
उत्पादन: योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति एकरी ३ ते ५ क्विंटल (खरीप) तर ५ ते ७ क्विंटल (उन्हाळी) उत्पादन मिळते.
Edited By- Dhanashri Naik