येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील श्री सद्गुरू संत सखाराम महाराज वेदपाठशाळेत सरस्वती वंदना व संतश्री प्रसाद महाराजांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करुन मंगल बाल संस्कार केंद्राचा शुभारंभ झाला. काळाची नितांत गरज असलेल्या या उपक्रमात्मक चळवळीला संतश्री प्रसाद महाराजांनी आशीर्वाद दिले.
कार्टून ,गेम्स, व्हिडिओ ,मोबाईल या नव्या माध्यमांच्या वर्तुळात वाढणाऱ्या लहान मुलांना काहीसे कठीण झाले आहे.पूर्वी आजी आजोबांच्या संस्कारातून जगण्याची दिशा आणि शिस्त मुलांमध्ये रुजवली जात असे. हल्ली हे सारेकाही कालबाह्य तथा दुर्मिळ झाले आहे. या पार्श्वभुमीवर बोधकथा ,आरत्या, भावगीते,संस्कार आणि एकूणच मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास साधण्याचा प्रयत्न मंगळ ग्रह सेवा संस्था मंगल बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून करीत आहे. त्याचप्रमाणे मुलांमध्ये पाणीबचत, जंगलसंवर्धन, वृक्ष लागवड , प्रखर राष्ट्रभक्ती , चांगल्या सवयी , व्यायाम , योग , प्राणायाम यांचेही महत्व बिंबविण्यात येणार येणार आहे.
मंगल बालसंस्कार चळवळ सुरवातीला येथील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यानंतर अन्यत्रही ही चळवळ राबविण्याचा प्रयत्न होईल .
कळी उमलताना तिला जसे जपावे लागते तसेच मुले मोठी होताना त्यांचे बालमन जपून त्यांच्या कलेने संस्कार मूल्य रुजवावी लागतात .
नियमित चालणारी शिस्त व्यवस्था, प्रार्थना ,व्यायाम , संस्कारक्षम विचारांची बौद्धिके यातून संस्कारित विद्यार्थी तयार व्हावेत हाच मुख्य उद्देश मंगल बाल संस्कार केंद्राचा आहे.
दरम्यान उद्घाटन प्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले , उपाध्यक्ष एस .एन .पाटील ,सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम ,खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त डी .ए .सोनवणे , विठ्ठल रुख्मीणी संस्थानचे विश्वस्थ राजू नेरकर (नाशिक),जयंत मोडक,येवले आप्पा, महेश कोठावदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री मंगळग्रह मंदिराचे पुजारी जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी पौराहित्य केले.