मुंबई : राज्यात मराठा कुणबी आरक्षणावरुन वातावरण तप्त असताना राज्य सरकारने मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र मराठा-कुणबी जातीच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केल्यानंतर समोर आलेली आकडेवारी अचंबित करणारी आहे. राज्य सरकारने गेल्या 15 दिवसांत मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी तपासल्या. त्यात पूर्वीही ज्यांना आरक्षणाचा लाभ होत होता त्यांचाही तपास करण्यात आला.
दरम्यान ज्या मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरुवात झाली तिथे कुणबी जातीच्या 23 हजार728 सापडल्या आहेत. तर विदर्भात सर्वाधिक तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सर्वात कमी कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून 8 कोटी 99 लाख 33 हजार 281 नोंदींपैकी कुणबी-मराठा जातीच्या 29 लाख 1 हजार 121 नोंदी सापडल्या आहेत.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी उपोषण केले होते. राज्य सरकारने त्यांना मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात मराठा-कुणबी जातीच्या नोंदी तपासण्याचे आश्वासन दिले होते.
मागील पंधरा दिवसात राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये या कामासाठी जास्तीचा कर्मचारी वर्ग देऊन या नोंदी तपासण्यास सुरुवात केली असून ही छाननी या महिन्यातही सुरुच राहणार आहे. मात्र मागील पंधरा दिवसात राज्यात 29 लाख 1 हजार 121 नोंदी सापडल्या आहेत.
सर्वात जास्त विदर्भामध्ये 13 लाख 3 हजार 885 नोंदी सापडल्या आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार 792 नोंदींचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 5 लाख 66 हजार 964 नोंदी तपासल्यानंतर देखील सर्वात कमी 118 कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत.
16.11.2023 अखेर नोंदीची सद्यःस्थिती
विभाग - तपासलेल्या नोंदी - कुणबी नोंदी
कोकण - 1,27,12,775 - 1,47,529
पुणे - 2,14,47,51 - 2,61,315
नाशिक - 1,88,41,756 - 4,70,900
छत्रपती संभाजीनगर - 1,91,51,408 - 23,728
अमरावती - 1,12,12,700 - 13,03,885
नागपूर - 65,67,129 - 6,93,764
तपासलेल्या नोंदी - 8,99,33,281
एकूण कुणबी नोंदी - 29,01,121
Edited By- Ratnadeep Ranshoor