मंगळवारी (7 नोव्हेंबर) सकाळी मनोज जरांगे यांनी छ. संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी मनोज जरांगेंनी मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप केला आहे.
जरांगे जेव्हा दुसऱ्यांदा उपोषणाला बसले होते, तेव्हा बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याने काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
"मराठा आंदोलकांनी तोडफोड केली नाही. त्यांच्यावर विनाकारण डाग लावला जातोय. आम्ही शांततेत आंदोलन केलं आणि शांततेमध्येच आंदोलन करू", असं ते म्हणाले.
जरांगे यांच्या मते, 'मराठा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.'
“मला बीडमधील काही मराठा बांधव भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितलं की बीडमध्ये (छगन) भुजबळ साहेबांच्या पाहुण्याचं हॉटेल फोडलं. त्यामागे त्यांचीच माणसे होती. त्यांच्यातील जुन्या भांडणातून हे घडलं आहे, अशी ऐकीव माहिती मला मिळालीय. मला मिळालेली माहिती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईन. पण यावर विचार व्हायला पाहिजे,” असं जरांगे यांनी म्हटलं.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दुसऱ्यांदा आंदोलन केलं. पण सरकारने आणखी वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं उपोषण काही दिवसांसाठी मागे घेतलं आहे.
या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजातील बांधवांनी आंदोलनं केली.
गावागावात साखळी उपोषण करण्यात आली. तसंच मराठा समाजातील खासदार, आमदार आणि काही सरपंचांनी राजीनामे दिले.
शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला बीड, नांदेड सोलापूर आणि आणखी काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांनी संशयित व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा आंदोलनात हिंसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असं म्हटलं आहे.
पण मनोज जरांगे यांच्या मते, 'मराठा समाजातील तरुणांना विनाकारण अडकवलं जातं आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातायत. त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांना वाचवलं पाहिजे.'
“मराठा समाजातील पोरांविरोधात षड्यंत्र रचलं जातय. आमची पोरं शांततेत आंदोलन करत आहेत. पण ओबीसी नेते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मराठ्याच्या पोरांना गुंतवत आहेत. याकडे मराठा समाजाच्या नेत्यांनी लक्ष द्यावं. मराठ्यांच्या पाठीशी उभं राहावं. आम्ही तुम्हाला मोठं केलंय. तुम्हाला सत्तेत राहायचं असेल तर आता या पोरांची मदत करा. नाही तर मराठे तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील.
“जर मराठा समाजातील नेत्यांनी आता मदत केली नाही. तर आम्ही आमच्या पोरांचं वाटोळ होऊ देणार नाही. आम्ही आमच्या हक्कांसाठी आरक्षण मागत आहे. त्यांचं वाटोळ व्हावं यासाठी नाही. तुम्ही उभे नाही राहिला. तर आम्ही संघर्ष करू आणि आमच्या पोरांना वाचवू.”
'मराठा समाजातील आंदोलकांवर खोट्या केसेस टाकण्यासाठी बीड, नांदेडमधील पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जातोय', असा आरोपही जरांगेंनी केली आहे.
"मराठा आंदोलनवरील लक्ष विचलित करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचं खच्चीकरण करण्यासाठीच या गोष्टी केल्या जातायत. "असा आरोप त्यांनी केला.
भुजबळ साहेब मराठ्यांचा राग का करता?
जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मंत्री छगन भूजबळ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
“भुजबळ साहेबांना मराठा समाजाविषयी जळजळ होतेय. त्यांच्या वक्तव्यांमुळे मराठा आणि ओबीसी समाजात तणाव वाढला आहे. त्यांनी असं बोलू नये हे मला ओबीसी समाजातील इतर लोक सांगतायत,” असं जरांगे म्हणाले.
छगन भुजबळ यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देणे म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखे आहे, अशी टीका केली आहे.
बीडमध्ये मराठा आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या आमदारांच्या घरांची त्यांनी सोमवारी (6 ऑक्टोबर) पाहणी केली. या वेळी त्यांनी आपल्याच सरकारच्या अनेक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
समाजकंटकांनी हिंसाचार करायचा आणि सरकारने गुन्हे मागे घ्यायचे यावर नक्कीच विचार करावा लागेल, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.
भुजबळांच्या या भूमिकेवर जरांगे यांनी नाराजी व्यक्ती केली आहे.
भविष्यात संघर्ष होऊ द्यायचा नसेल तर…
सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात ओबीसी आणि मराठे यांच्यात संघर्ष होईल का? असा प्रश्न जरांगे यांना विचारला. तेव्हा त्यांनी असा कोणताही संघर्ष टाळण्यासाठी गृहमंत्री आणि मराठा समाजातील नेते यांनी प्रयत्न करायला पाहिजेत असं म्हटलं आहे.
ते म्हणाले, "बीडमध्ये ओबीसी नेत्यांच्या सांगण्यावरून मराठा समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळे भविष्यात संघर्ष होऊ नये म्हणून गृहमंत्र्यांनी बीडमध्ये काल काय काय घडलं ते तपासावं.
"ओबीसी बांधवांच्या लक्षात आलाय की मराठ्यांच्या हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे. पण ओबीसी नेते यामध्ये विनाकारण तणाव वाढवत आहेत. गृहमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे.