जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. यादरम्यान आंदोलनस्थळी गोंधळ निर्माण झाला. यात आंदोलक आणि पोलीस दोघेही जखमी झाले आहेत.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात ही घटना एक सप्टेंबरला दुपारी घडली. सदर घटनेचे व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.तसंच, राजकीय पक्षांकडूनही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येतं.
पोलिसांच्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन चिघळले आहे. आंदोलकांनी 4 बसेस पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे.
नेमके कसे घडले हे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने अंतरवली येथे त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता.
या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते.
उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला.
तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला.
पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी दोनदा हवेत गोळीबार केला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले.
पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर मराठा आंदोलकांकडून धुळे- सोलापूर महामार्गावर जाळपोळ करण्यात आली. मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांना पोलिसांना ताब्यात घेतलं असून त्यांना अज्ञान स्थळी नेण्यात आलं आहे.या प्रकरणी राजकीय नेत्यांकडून निषेध करण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत सातत्याने भूमिका मांडणारे संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत ट्विट करून निषेध व्यक्त केला.
ते म्हणाले, “अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
हे आंदोलन चिघळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.