मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर जरांगे पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. राज्यातला मराठा एकच आहेत. सरसकट आरक्षण द्यावे लागेल. फक्त ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनाच आरक्षण देणं हे बरोबर नाही. पुरावे असललेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार असल्याचं सांगत अर्धवट आरक्षण घेणार नसल्याचे जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोन आला होता.
उद्याच्या उद्या बैठक लावून ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना प्रमाणपत्र देतो, असे त्यांनी सांगितले. फक्त पुरावे असलेल्यांनाच आरक्षण द्याल तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असे त्यांना सांगितल्याचं जरांगे पाटील म्हणाले. समितीचा प्रथम अहवाल आम्ही स्वीकारला आहे, त्यानुसार दाखले देण्यास आम्ही सुरूवात करतो, असे विखेंनी सांगितले. त्यावर प्रथम अहवाल स्वीकारा नाहीतर दुसरा स्वीकारा पण सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण द्या, त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी तुमच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे चर्चेला बोलावलं आहे, जाणार आहात का? या प्रश्नावर जरांगे म्हणाले, आमचे कोणीही जाणार नाही. त्यांचं खायचं आणि गुणगाणही त्यांचं गायचं हे जमणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण पाहिजे, त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे जरांगेंनी निक्षून सांगितले.
Edited By - Ratnadeep ranshoor