बकर्यांचा बळी घेणारी शिवबाबाची यात्रा
सातपुड्याच्या डोंगररांगांमधील घनदाट जंगलात भरणारी शिवाबाबाची यात्रा ग्रामीण भागात भरणार्या यात्रेसारखीच आहे. खेळणी, खाण्या-पिण्याची दुकानं, इतर वस्तूंची दुकानं, खरेदी करण्यासाठी आलेले लोक असे एरवी कुठल्याही यात्रेत दिसणारं चित्र याही यात्रेत दिसतं. पण तरीही ही यात्रा थोडीशी वेगळी आहे. मध्य प्रदेशातील खांडव्यापासून ५५ किलोमीटरवर ही यात्रा भरते. यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे नवस पूर्ण झाल्यानंतर शिवाबाबाला बकरे वाहिले जातात. एक, दोन पासून ते अगदी पाच, दहा अशा प्रमाणात हे बकरे देवाला वाहिले जातात.
या भागात शिवाबाबा यांना संत मानतात. त्यांचे चमत्कार या भागात बरेच प्रसिद्ध आहेत. लोक शिवाबाबांना परमेश्वराचा अवतार मानतात. मंदिराच्या जवळच बाबा जोगीनाथ रहातात. त्यांच्या मते शिवाबाबांकडे काहीही मागितलं तरी ते मिळतं. नवस पूर्ण झाल्यानंतर लोक इथे आपल्या सग्या सोयर्यांना घेऊन येतात. त्यांच्याबरोबर बकराही असतो. त्याला सजवून त्याची पूजा केली जाते. मग त्याला शिवाबाबांच्या मंदिरात नेलं जातं. तिथं या मंदिरातील देवीच्या मूर्तीसमोर उभं करतात. तिथला पूजारी या बकर्यावर पवित्र पाणी शिंपडतो आणि त्याला देवाला अर्पण करतो.
देवाला वाहिलेल्या बकर्यांपैकी अनेकांचा नंतर देवालाच बळी दिला जातो. त्यातील काहींना जंगलात सोडण्यात येते. पूर्वी मंदिराच्या समोरच बकर्याला बळी दिले जात असे. पण नंतर त्यावर बंदी घातल्यामुळे यात्रेसाठी आलेले लोक जिथे उतरले असतात, तिथे बळी दिला जातो. बळी दिल्यानंतर बकर्याचे मांस प्रसाद म्हणून वाटले जाते. हा प्रसाद घरी नेता येत नाही. म्हणून तो तेथेच वाटून संपविण्यात येतो. या पूर्ण यात्रेत किमान दोन लाख बकर्यांचा बळी दिला जातो. जत्रेत आलेल्या एका खाटकाशी चर्चा केली असताना त्यानेही या आकड्याला दुजोरा दिला. त्यादिवशी सकाळपासून दुपारपर्यंत पाच हजार बोकडांचा बळी दिला गेल्याचेही त्याने सांगितले. या यात्रेच्या काळात या भागात माशा, चिलटे अजिबात नसतात. ही शिवाबाबांची कृपा असल्याचा येथील लोकांचा समज आहे. आम्ही येथील सगळी दुकाने पालथी घातली पण आम्हालाही या भागात एकही माशी किंवा चिलट दिसले नाही. असे असले तरी देवाच्या नावावर बळी देऊन निष्पाप प्राण्याचा जीव घेणे योग्य आहे काय? अशा कृत्यामुळे परमेश्वर प्रसन्न होतो काय याबाबत तुम्हाला काय वाटते? ते आम्हाला जरूर कळवा.फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...