महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – 2021 मधील कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
खेळाडूसाठी आरक्षित पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यांचा अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
दिव्यांग, माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.
अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी न्यायालय, न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्र्यरित्या कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor