मुंबईसह राज्यातील ओला-उबेरचे चालक व मालक त्यांच्या कंपनीविरूध्द संपावर गेले आहेत. त्यामुळे पर्यायाने सामान्य प्रवाशांचीही गैरसोय होत असून, या संपात सरकारने हस्तक्षेप करावा व ओला-उबेर चालक, मालक यांना न्याय मिळवून देण्यासोबतच सामान्य प्रवाशांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर , धनंजय मुंढे यांनी आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली ओला-उबेरचे चालक, मालक त्यांच्या व्यवस्थापनाविरुध्द दि.२२ ऑक्टोबर पासून संपावर गेले आहेत. या संपकऱ्यांनी संपावर जाण्याआधी व्यवस्थापनाला मागण्यांचे निवेदन देऊनही व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हा संप सुरू असून, गरीब ओला-उबेर चालक, मालकासोबतच प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. ओला-उबेरचे व्यवस्थापन या चालक मालकांची आर्थिकदृष्ट्या पिळवणूक करीत आहेत, प्रवाशांकडून आकारले जाणारे भाडे आणि प्रत्यक्षात या चालक, मालकांना मिळणारे भाडे यात मोठी तफावत असल्याने या चालक, मालकांवर शेतकऱ्यांप्रमाणेच आत्महत्याची वेळ आली असल्याचे मुंडे व अहिर यांनी परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
ओला-उबेर व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर सरकारचा अंकुश रहावा यासाठी तातडीने व्यवस्थापनाला बोलावून संप मिटवण्यासाठी सरकारने पुढाकर घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या मागणीबाबत रावते यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यात सरकार हस्तक्षेप करेल असे सांगितले. त्याचबरोबर ही वाहने सिटी टॅक्सी म्हणून चालवण्याबाबत आदेश काढला आहे, मात्र न्यायालयाने त्याला स्थगिती दिली असून, ही स्थगिती उठावी यासाठी परिवहन विभाग तातडीने दाद मागणार असल्याचेही रावते यांनी सांगितले. या शिष्टमंडळात इंटक प्रणित महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते, सचिन बोरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.