सर्व साधारण बाजारात कांद्याच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही
राजस्थान व मध्यप्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा तेजीत असल्याचे दिसून येतो आहे. त्याचा परिणाम म्हणून आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कांदा भाव वाढ कायम असून लासलगाव येथे १५ हजार क्विंटल आवक झाली आहे. यामध्ये जवळपास १०० रु इतकी वाढ दिसून आली असून कमीत कमी ५०० रु. जास्तीत जास्त १३२१ रु. तर सर्व साधारण ११७५ रु भाव लासलगाव येथे मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे.
मात्र या भाव वाढीमुळे कोणत्याही प्रकारे खुल्या बाजारपेठेत कांदा भाव वाढणार नाही असे तज्ञ सांगत असून, सोशल मिडीयावर फिरत असलेल्या कांदा दर बाबत विश्वास ठेवू नये असे आव्हान बाजार समिती करत आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीच्या लासलगाव येथे पहिल्याच दिवशी सोमवारी सरासरी ९२० रुपये इतका होता. तर मंगळवारी सोमवारच्या भावाच्या तुलनेत १०० रुपयांनी वाढ दिसून आली होती. सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल, तर कमाल दरात १३०० रुपयांच्या आसपास पोहचला होता. त्यामुळे सध्या कांदा तेजीत असून,त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक लाभ होणार आहे.