बाजार स्थिरीकरण योजनेतून सुरू असलेली केंद्राची नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी २.५ लाख टन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याचे माहिती येताच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दर घसरले आहे. उन्हाळ कांद्याला सरासरी ११४० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.
नाफेडचे कांदा खरेदी शनिवारपासून थांबविण्यात आली आहे. याचा परिणाम कांद्याच्या बाजार भावावर झाला असून मागील सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात ३५० रु. प्रति क्विंटलची घसरण झाली. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची १३९४ वाहनातून सुमारे २०११२ क्विंटल कांद्याची आवक होऊन बाजार भाव किमान ५०१ रु., कमाल १४५१ रु तर सरासरी ११४० रु प्रती क्विंटल होते. कांदा दरात घसरण झाल्याने शेतकरी नाराज आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बाजार समितींमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती. नाफेडच्या कांदा खरेदीमुळे शेतकर्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र, आता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद करण्यात आली आहे.