स्टेट बँकेने कर्जाच्या व्याजदरांमध्ये 0.15 टक्के इतकी कपात केली असून प्रमाण व्याजदर 9.10 टक्के केला आहे. यामुळे वाहन कर्जे व गृहकर्जासारखी कर्जे स्वस्त होतील आणि आधीच्या कर्जदारांचाही हप्ता कमी होईल अशी आशा आहे. या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेची ही व्याजदर कपात सूचक मानण्यात येत आहे. स्टेट बँकेचा कर्ज देण्यासाठी असलेला आधार दर किंवा प्रमाण दर 9.25 टक्के होता जो आता 1 एप्रिलपासून 9.10 टक्के झाला आहे. प्रमाणदरात कपात केल्यामुळे या आधी कर्ज घेतलेल्या ग्राहकांनाही व्याजदर कपातीचा लाभ मिळणार आहे. स्टेट बँकेने पाच सहयोगी बँका व भारतीय महिला बँक स्वतात विलीन केल्यामुळे जगातल्या टॉप 50 बड्या बँकांमधली एक झाली आहे. स्टेट बँकेची ग्राहक संख्या 37 कोटी झाली असून एकूण 24 हजार शाखा आणि 59 हजार एटीएमच्या नेटवर्कचे जाळे देशभरात आहे. एकत्रीकरणानंतर बँकेच्या ठेवी 26 लाख कोटी असून 18.50 लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेने आपल्या लोगोमध्येही बदल केले आहेत.